महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी’च्या पाठिंब्यास भाजप तयार ?

0
92

आज विश्‍वासदर्शक ठराव
राज्याच्या विकासासाठी कॉंग्रेस वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य सर्व पक्षांच्या पाठिंब्याचे स्वागत करीत असल्याचे भाजपने काल म्हटले. दरम्यान, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतातील सरकारचा आज विश्‍वासमत सिद्ध करण्याचा दिवस आहे. सरकारला महाराष्ट्राच्या विकासाचे व लोकांच्या हिताचे काम करायचे आहे, त्यामुळे कॉंग्रेस सोडून अन्य पक्षांच्या पाठिंब्याचे स्वागत आहे, असे भाजप नेते राजीव प्रताप रुढी म्हणाले. कॉंग्रेस पक्षच सर्व गोष्टीस जबाबदार आहे, असे रुढी म्हणाले. शिवसेना भाजपला सुरुवातीपासून हवी होती, निवडणुकीनंतरही त्यांनी सरकारमध्ये यावे, अशी भाजपची इच्छा होती असे रुढी नवी दिल्ली येथे म्हणाले. रुढी हे भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी होते. दरम्यान, राष्ट्रवादीने आधीच देऊ केलेला पाठिंबा स्वीकारून भाजप विश्‍वासमत ठराव जिंकण्याची शक्यता आहे. शिवसेनेने विरोधी बाकांवर बसण्याचा इरादा याआधीच स्पष्ट केला आहे. विरोधी नेतेपदावर दावा करणारे पत्रही विधानसभा सचिवालयास पाठविण्यात आले आहे. मात्र सरकारच्याविरोधात मतदान करणार की नाही याबाबत शिवसेनेने काहीही अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही.
काल सभापतीपदासाठी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत.
२८७ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपकडे १२१ आमदारांचे बळ आहे. त्यांना ७ अपक्ष व ३ बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांनी सुरुवातीलाच आपल्या ४१ आमदारांचा भाजप सरकारला पाठिंबा असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, सरकारच्याबाजूने मतदान करायचे की, विश्‍वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहायचे हा निर्णय आमदार विश्‍वासदर्शक ठरावावेळी घेतील, असेही पवार यांनी म्हटले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदारांनी वरील दोन पैकी कोणताही पर्याय निवडला तरी सरकार तरेल. कारण शिवसेनेचे ६३ व कॉंग्रेसचे ४२ आमदार एकत्र आले तरी भाजप सरकार खाली खेचण्यास त्यांचे बळ अपुरे आहे.
दरम्यान, सभापतीपदासाठी भाजपने हरिभाऊ बागडे, शिवसेनेतर्फे विजय औती तर कॉंग्रेसतर्फे वर्षा गायकवाड उमेदवार आहेत.
दरम्यान, फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की, सभापती एकमताने निवडून यावा, यासाठी सर्व पक्षांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यावा.