महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार

0
4

>> 39 नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर काल रविवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी 39 नेत्यांनी शपथ घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीला 288 पैकी तब्बल 235 जागा मिळाल्या तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सत्तास्थापन केली. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, सत्तास्थापनेनंतर 10 दिवसांनी काल झालेल्या विस्तारामध्ये महायुतीच्या एकूण 39 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

यात भाजपच्या 20, शिवसेनेच्या (शिंदे) 12 व राष्ट्रवादीच्या (9) मंत्र्यांचा समावेश आहे. 33 कॅबिनेटमंत्र्यांनी शपथ घेतली. तर सहा आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

यापूर्वीदेखील राज्यात महायुतीचे सरकार होते. मात्र, नव्या सरकारमध्ये काही नवे चेहरे असून नव्या सरकारमध्ये भाजपने नऊ, शिवसेना (शिंदे) सहा व राष्ट्रवादीने (अजित पवार) पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. त्यामुळेच या तिन्ही पक्षांनी 42 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ निश्चित केले
आहे.

आठवले नाराज

या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला संधी मिळाली नाही. यावरून रामदास आठवले यांनी महायुतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मी नाराज आहे आणि माझे कार्यकर्तेही नाराज असल्याचे आठवले यांनी सांगितले.