महाराष्ट्रात पुन्हा ‘देवेंद्रपर्व’; फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

0
5

>> अजित पवार यांच्याकडून सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; हो-नाही म्हणता एकनाथ शिंदेही उपमुख्यमंत्रिपदी विराजमान

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईतल्या आझाद मैदानावरील दिमाखादार सोहळ्यात शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवारांनी सहाव्यांदा, तर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते उपस्थित होते. तसेच भाजपशासित व एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील हजर होते. या भव्य सोहळ्याला मनोरंजन तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी देखील उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित झाल्यानंतर 5 वाजून 31 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते; पण नव्या सरकारचा शपथविधी लांबला होता. महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा प्रयत्नशील होते. 2022पासून दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी वाढलेली जवळीक शिंदेंसाठी आशादायक होती. गेला आठवडाभर शिंदे यांनी त्यादृष्टीने पुरेपूर प्रयत्न केले; मात्र भाजपचे 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपश्रेष्ठींनाही फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नव्हता. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने शिंदे यांना स्पष्टपणे तसे कळवले होते. त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले होते. शपथविधी सोहळा संपन्न झाल्याने अखेर महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्त्वात आले असून, पुन्हा एकदा देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे.