>> विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल; प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी, मतदार मात्र 9.7 कोटी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनेक अनियमितता असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल केला. या संदर्भात राहुल गांधी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे, तर निवडणूक आयोगाच्या मते 9.7 कोटी मतदार आहेत, हे कसे शक्य आहे, असा गंभीर सवाल राहुल गांधी यांनी केला. याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत देखील मोदी सरकारने मनमानीपणे बदलली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
काल राहुल गांधी यांनी सविस्तर आकडेवारी सादर करत निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती करत गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात आमची मते कमी झाली नाहीत, उलट भाजपची मते वाढली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्रात 32 लाख मतदार जोडले गेले, पण 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमधील 5 महिन्यांच्या कालावधीत नवे 39 लाख मतदार कसे जोडले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी इतके मतदार आले कुठून? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली.
मतदार याद्या तात्काळ द्या
यावेळी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या देण्याची मागणी केली आहे. आम्हाला महाराष्ट्रातील मतदारयाद्या हव्यात. त्यात मतदारांची नावे, पत्ते आणि फोटो हवे आहेत. आम्हाला लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या हव्यात. आम्हाला हे पाहायचे आहे की हे नवे मतदार कोण आहेत? असे ते म्हणाले.
निवडणूक आयुक्त निवडही मनमानीपणे
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राहुल गांधींनी ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त बदलण्याची प्रक्रियाच बदलल्याचा मुद्दा उपस्थित केला. मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश देत मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी सरन्यायाधीश, पंतप्रधान व विरोधी पक्षनेते यांची समिती नेमण्याची सूचना केली होती. मात्र मोदी सरकारकडून त्यात बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फिरवण्यासाठी मोदी सरकारने तात्काळ अध्यादेश आणला आणि ह्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळून त्या जागी केंद्रीय मंत्र्यांची वर्णी लावण्यात आली, ही बाब देखील राहुल गांधींनी निदर्शनास आणून दिली.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात 5 वर्षांत जेवढे मतदार
वाढले नाहीत, त्यापेक्षा जास्त मतदार 5 महिन्यांतच वाढले
राज्य 5 महिने 5 वर्षे
महाराष्ट्र : 39,63,359 32,23,493
मध्यप्रदेश : 5,37,380 55,62,702
राजस्थान : 4,35,951 51,41,186
छत्तीसगढ : 2,45,623 18,24,287
झारखंड : 2,67,890 27,75,011
हरयाणा : 3,86,332 16,90,086
तेलंगणा : 5,98,091 45,42,345