महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज निकाल

0
5

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला आज (गुरुवार दि. 11 मे) लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी काल एका प्रकरणाची सुनावणी करत असतानाच गुरुवारी दोन महत्वाच्या प्रकरणांवर घटनापीठ निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागणार हे निश्चित झाले. दरम्यान, 16 आमदार अपात्र ठरणार का, शिंदे-फडणवीस यांचे सरकार टिकणार की जाणार, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्रात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यसभेची मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे 25 आमदारांसह सुरतला रवाना झाले. त्यावेळेस शिवसेनेत पडलेल्या ठिणगीची माहिती अवघ्या महाराष्ट्राला मिळाली. त्यानंतर एका पाठोपाठ एक महाराष्ट्राच्या राजकारणात अनाकलनीय घटना घडू लागल्या. ठाकरेंच्या गटात असणारे अनेक आमदार हळूहळू शिंदेंच्या गटात सामिल झाले. त्यामुळे शिंदे गटाला बळ मिळाले. या बळाच्या जोरावर त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले.

एकनाथ शिंदे यांच्या या बंडाला आणि महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालायत आव्हान देण्यात आले. 16 आमदार अपात्र ठरवण्यात यावे अशीही याचिका यावेळी करण्यात आली होती.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी झाली. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाबाबत गेल्या दोन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी काल हा निकाल गुरुवारीच लागणार असल्याचे जाहीर केले.

परिणामी 16 आमदार अपात्र ठरतात का? की विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालय नकार देते, याकडे राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्या घटनापीठासमोर
झाली सुनावणी?

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर झाली. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. आर. शाह 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे याप्रकरणी जलद निकाल येईल, असे बोलले जात होते. ती शक्यता खरी ठरली.

16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
अपात्र ठरवले जाण्याची शक्यता असलेल्या 16 आमदारांमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर या मंत्री व आमदारांचा समावेश आहे.