>> शरद पवार यांची माहिती, तिन्ही पक्षांची बैठकीत मान्यता
महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची सहमती झाली आहे. त्यामुळे आज शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये तशी घोषणा करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगतले. यामुळे राज्यातील राष्ट्रफती राजवट लवकरच उठणार असून राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत तिन्ही पक्षांची काल शुक्रवारी वरळी येथे बैठक झाली.
या बैठकीनंतर शरद पवार यांनी बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निर्णय झाल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वाबाबत आमच्या मनात कोणताच संदेह नसल्याचे स्पष्ट केले. अद्याप काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असून उद्या (शनिवारी) तिन्ही पक्ष एकत्रित येऊन संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देतील असे पवार यांनी स्पष्ट केले.
चर्चा सकारात्मक ः ठाकरे
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच नवीन सरकारबाबत माहिती देऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. विधानसभा अध्यक्षपदावर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कॉंग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.
कॉंग्रेसचे मौन
दरम्यान, उद्धव ठाकरे हे नव्या सरकारचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती शरद पवार यांनी दिली असली तरी कॉंग्रेसने त्याबाबत मौन पाळले आहे.
पवारांनी दिलेल्या माहितीबाबत आपण काहीच बोलत नसल्याचे कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. अहमद पटेल यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे म्हटले आहे.
उद्धवजींनी प्रस्ताव
स्वीकारला ः राऊत
दरम्यान, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत हा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला असल्याचे शइवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
सरकार ८ महिन्यात
गडगडेल ः गडकरी
दरम्यान, महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी जवळपास निश्चित झाली असून त्यांचे सरकार येणार हे निश्चित आहे. पण हे सरकार आठ महिन्यांत गडगडेल असे भाकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. तिन्ही पक्ष संधीसाधू असून त्यांची संधी आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहणं हा गुंतवणुकीच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा मानला जातो. असे सांगून गडकरी यांनी, या तिन्ही पक्षांत विचारधारेचे फार मोठे अंतर आहे. त्यामुळे हे सरकार पडेल व महाराष्ट्राला अस्थिर सरकार परवडणार नाही असे गडकरी म्हणाले.