- कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
सुलेमानीच्या हत्येनंतर इराणमध्ये राष्ट्रपतींपासून सेनाध्यक्षांपर्यंत सर्वांनी अमेरिकेला कठोर उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. आपणावर काहीही किटाळ येऊ नये या उद्देशाने शत्रूंवर इतरांद्वारे हल्ले करवणे हे इराणचे मूलभूत भौगोलिक व राजकीय धोरण आहे. इराण हा इराक आणि लिबीयाप्रमाणे सामरिकदृष्ट्या कमकुवत नसल्यामुळे त्याच्याशी सर्वंकष युद्ध अमेरिका व दोस्त राष्ट्रांसाठी अतिशय महागडे ठरेल.
इराकमध्येे इराणचे अमेरिका विरोधी गनिमी सैनिक कार्यरत असल्यामुळे अमेरिकेने बगदादमधील इराकच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोनचा हल्ला करून, इराण रिव्होल्यूशनरी गार्ड कोअर (आयआरजीसी) मधील कुद फोर्स या अतिजहाल गनिमी शाखेचा सर्वेसर्वा लेफ्टनन्ट जनरल कासीम सुलेमानी आणि इराकी संघटना कताईब हेझबुल्लाच्या अबु महदी अल मुहंदीस व मोहम्मद रेधा अल जबरी या नेत्यांसह सात लोकांना ड्रोनच्या अचूक फायरिंगने कंठस्नान घातले. जागतिक संरक्षणतज्ज्ञांनी याला ‘टार्गेटेड किलिंग’चे नामाभिधान दिले आहे. १९४१ मध्ये एका जपानी ऍडमिरलची हत्या केल्यानंतर जवळपास ८० वर्षांनंतर अमेरिकेने पहिल्यांदा एका कार्यरत अतिवरिष्ठ सैनिकी अधिकार्याला लक्ष्य करून त्याची हत्या केली आहे.
या हल्ल्यानंतर इराणने तात्काळ इस्माईल कानी यांना कुद फोर्सचा कमांडर म्हणून नियुक्त केले आहे. सुलेमानीच्या हत्येनंतर इराणमध्ये आधी धक्का, मग चीड आणि सरते शेवटी अमेरिकेबद्दल तिरस्कार व बदल्याची ज्वलंत भावना निर्माण झाली. राष्ट्रपतींपासून सेनाध्यक्षांपर्यंत सर्वांनी अमेरिकेला कठोर उत्तर देऊ असा इशारा दिला, तसेच अमेरिकेच्या इराकमधील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला करुन पुढील भूमिकेची चुणूकही दिली.
सुलेइमानीच्या हत्येमुळे इराणमधील जनता इराण सरकार व आर्मीमागे ठामपणे उभे ठाकली. याच कारवाई बरोबर अमेरिकन जहाजांनी इस्लामिक स्टेट आर्मीशी लढ्यात सक्रिय मदत करणार्या कताईब हेझबुल्लावर हल्ला केला. आयआरजीसीच्या कुद फोर्सनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे इराकच्या सरकारी सेनेने इस्लामिक स्टेट आर्मीला इराकमधून हुसकावून लावले होते.
इराणजवळ अमेरिकेसारखे अतिशय लांबवर जाऊन शत्रूचा मारा करणारे, अत्याधुनिक ड्रोन्स नसले तरी त्यांच्या गुप्तचर शाखेत आणि सैन्यामध्ये प्रशिक्षित स्नायपर्स, स्फोटतज्ज्ञांची कमतरता नाही. त्यामुळे अमेरिकी जनरल्स, राष्ट्रपती किंवा इतर लोकांना आपल्या मर्जीनुसार मारणे हा इराणी जिहाद्यांच्या डाव्या हातचा मळ आहे.
इराण हा इराक आणि लिबीयाप्रमाणे सामरिकदृष्ट्या कमकुवत नसल्यामुळे त्याच्याशी सर्वंकष युद्ध अमेरिका व दोस्त राष्ट्रांसाठी अतिशय महागडे ठरेल. हे युद्ध जिंकण्यासाठी दोस्त राष्ट्रांना किमान दहा लाख सैनिक युद्धात झोकावे लागतील. या युद्धात चीन व रशियाने इराणतर्फे सक्रिय भाग घेतला नाही तरीसुद्धा यातील जीव आणि वित्तहानी, इराक व व्हिएतनाममधील यांच्या एकत्र संख्येपेक्षा जास्त असेल आणि जगाची अर्थव्यवस्था पार कोलमडून जाईल असे ब्रिटिश ऍडमिरल लॉर्ड वेस्ट यांचे मत आहे.
जनरल कासीम सुलेमानीच्या हत्येनंतर मध्यपूर्वेत तीन सामरिक रूपरेषा निर्माण होतात.
अ) तेहरान या घटनेची कशी मीमांसा करतो, त्याला कोणते पर्याय उपलब्ध आहेत, त्याची आंतरिक-बाह्य राजकीय, आर्थिक संकटांना तोंड देण्याची शक्ती यावर बदल्याची तीव्रता अवलंबून राहील.
जर बदला यथायोग्य घ्यायचा असेल तर या क्षेत्रातील अमेरिकन जागर, आखातामधील अमेरिकी लष्करी तळ – बहरीनस्थित अमेरिकन फिफ्थ फ्लिट यांच्यावर इराणची गाज कोसळू शकते. पण इराण हा पर्याय अंगिकारणार नाही, कारण यावरील तीव्र अमेरिकन प्रतिसादामुळे इराणच्या लष्करी क्षमता व साधनसामुग्री पूर्णतः नष्ट होतील.
ब) अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांना तेहरान नेहमी सारखा प्रच्छन्न युद्धाद्वारे निवडक सामरिक धक्के लगावत राहील. मात्र यामुळे इराणची कट्टर, खंबीर राष्ट्राची प्रतिमा मातीमोल होईल. जर इराणने हा पर्याय अंगिकारायचे ठरवले तर तो निवडक, छोटे तीव्र हल्ले करून, अमेरिका व मित्रराष्ट्रांची मोठी हानी करेल आणि त्याचा मोठा प्रचार करून आपली प्रतिमा इराण जगात उज्ज्वल करेल.
आणि क) इराण बदला घेण्यासाठी योग्य त्या वेळ काळाची प्रतीक्षा करेल आणि योग्य वेळी कारवाई करील. या दरम्यान तो अमेरिकेच्या वरिष्ठ सैनिकी अथवा नागरी अधिकार्यांची हत्या करून कासीम सुलेमानीचा बदला घेण्याचा प्रयत्न करील. हा पर्याय अंगिकारल्यामुळे इराणची जीव व वित्तहानी तर कमीत कमी होईल; पण त्यामुळे त्याला सीरिया, इराक, येमन आणि इतरत्र जगातील आपल्या समर्थकांना वार्यावर सोडावे लागेल.
कासीम सुलेइमानीच्या हत्येमुळे अमेरिका व इराणमध्ये प्रचंड सामरिक तणाव निर्माण झाला असून जग सध्या तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे. इराणला रशिया, चीन, येमन, इराक, लेबनान, अफगाणिस्तान तसेच युरेशियन व आफ्रिकन राष्ट्रांचा पाठिंबा आहे तर अमेरिकेला ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरब, कुवेत, अरब अमिरात व नाटो देशांचा पाठींबा आहे. भारताला आपली भूमिका संदिग्धच ठेवणे भाग आहे. कारण
एक) भारताचे नागरिक असलेल्या २४ कोटी मुसलमानांपैकी ४८ टक्के शियापंथी मुसलमान असल्यामुळे अमेरिका इराण युद्ध झाल्यास भारतातील मुस्लिमांमध्ये शिया – सुन्नींची धार्मिक यादवी सुरु होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
दोन) या एयर स्ट्राईकनंतर अमेरिकेने पाकिस्तानला लष्करी प्रशिक्षण देण्याची पेशकश केली आहे, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. कारण या नंतरचे स्वाभाविक पाऊल, पाकिस्तानला अमेरिकेची आर्थिक व सामरिक मदत मिळण्याचेच असेल.
तीन) अमेरिका व पाश्चात्य देशांमध्ये भारताचे आर्थिक व सामरिक संबंध गुंतलेले आहेत, तर इराण व मध्यपूर्व देशांमध्ये त्याचे ७० लाख नागरिक कार्यरत असून ते दरवर्षी अंदाजे ७६ अब्ज डॉलर्सची विदेशी चलन गंगाजळी भारतात आणतात. यापैकी अर्ध्याच्या वर नागरिक इराण, सौदी अरब, कुवेत, संयुक्त अरब अमिरात व बहरिनमध्ये आहेत.
इराणने जर या देशांविरुद्ध कारवाई करायचे ठरवले, तर या भारतीय नागरिकांना तेथून बाहेर काढण्याचे काम भारतीय वायुसेना व विमान कंपन्यांना करावे लागेल. तसेच या नागरिकांकडून येणारी ४५ अब्ज डॉलर्स विदेशी गंगाजळी आटून आपल्या विदेशी चलन साठ्यावर त्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम होईल.
चार) इराणमधील छाबहार बंदर, इराण अफगाणिस्तान युरेशिया रेल्वे लाईन व इतर संसाधनीय उभारणी-बांधणीमध्ये गुंतलेली दोन अब्ज डॉलर्सची भारतीय गुंतवणूक पाण्यात जाईल.
पाच) युद्ध झाल्यास इराणकडून आपल्या मागणीच्या ६० टक्के होणारी खनिज तेलाची आयात पूर्णतः ठप्प पडून तेलाच्या किंमती गगनाला भिडून भारतात महागाईचा भडका उडेल. कदाचित भारतीय रुपयाचे अवमूल्यनही करणे आपल्याला भाग पडून भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल आणि
सहा) हे क्षेत्रीय युद्ध जर अणुयुद्धात अथवा तिसर्या महायुद्धात परिवर्तीत झाले तर होणार्या रेडिएशन व अण्वस्त्र धुळीमुळे एकूणच भारतावर अतिशय प्रतिकूल परिणाम होईल.