महामार्ग सोमवारपासून सुरू करण्याचे प्रयत्न

0
132

>> साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून पाहणी

केरये-खांडेपार येथे दरडी कोसळल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला गोवा – बेळगाव महामार्ग सोमवारपर्यंत खुला करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल कोसळलेल्या दरडीची पाहणी केल्यानंतर वरील माहिती दिली. धोकादायक दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून साबांखा मंत्र्यांनी काल घटनास्थळी भेट देऊन महत्त्वाच्या सूचना केल्या.
सोमवारपर्यंत राष्ट्रीय महामार्ग सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. स्थानिकांच्या सोयीसाठी महामार्ग बंद असलेल्या दोन्ही बाजूनी खास ३ कदंबा बसगाड्यांची सोय काल दुपारपासून करण्याचे आश्‍वासन बांधकाम मंत्र्यानी यावेळी ग्रामस्थांना दिले. जमीन ताब्यात देण्याच्या मुद्यावरून जमीनदाराने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे महामार्गाचे काम करताना उभी डोंगर कापणी करण्यात आली असून सध्या माती हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. पत्रकाराशी बोलताना मंत्री ढवळीकर यांनी ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी खास ३ कदंब बसेसची सोय करण्यात आली आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत माती हटविण्याचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, राजेश वेरेकर व अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मंत्री विजय सरदेसाई यांनी स्थानिकांसाठी कदंबा बसेस देण्यासाठी बोलणी सुरू केल्याचे दुर्गादास कामत यांनी सांगितले.

केरये येथील शाळा बंद
केरये, खांडेपार महामार्गावर जिथे दरड कोसळलेली आहे तिथून जवळच सरकारी प्राथमिक शाळा असून ती काल बुधवारी बंद ठेवण्यात आली. परिसरात माती हटविण्याचे काम जोरात सुरू असल्याने धोका ओळखून शाळा बंद ठेवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दरड कोसळल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात माती पसरली आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या दरडीही हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुर आहे. या कामात मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री कार्यरत असल्याने शाळेतील मुलांना ये-जा करण्यास समस्या निर्माण होणार असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रवासीवर्गाचे अनंत हाल
महामार्ग खांडेपार येथे बंद करून वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली असल्याने प्रवाशांचे हाल होत असून विद्यार्थी व कामगारवर्ग उशिरा पोचत आहेत. वाळपई, उसगाव, होंडा, डिचोली, धारबांदोडा, मोले या भागातील लोकांना १५ ते २० किलोमीटरचा वळसा घालून फोंडा गाठावे लागत आहे. बेतोडा – निरंकाल व सावईवेरेमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, अरुंद रस्त्यांमुळे चक्का जाम होत आहे. मोलेमार्गे फोंड्यात येणारी वाहने धारबांदोडा – कोडली जंक्शनवरून दाभाळ, निरंकाल – बेतोडामार्गे फोंडा शहरात वळविण्यात आली आहेत.