– डॉ. सोमनाथ कोमरपंत
अन्यायाची अनावर चीड त्यांच्या मनात निर्माण होई. कारण ती दाहक अनुभूती त्यांनी घेतली होती. त्यामुळे तीव्र मानसप्रतिक्रिया उमटणे ही अत्यंत स्वाभाविक बाब होती. त्यामुळेच दलितांवरील कलंक पुसून टाकणे हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनप्रवासात खडतर साधना केली आणि कर्तृत्वाची अनेक शिखरे गाठली. त्यांतील सगळ्याच तपशिलांचा उल्लेख न करता संक्षेपाने सांगायचे झाल्यास त्यांचे जीवन हा प्रयत्नवादाचा आदर्श वस्तुपाठ होता. संकटे अनेक होती. आव्हाने अनेक येऊन ठेपली. विमनस्क होण्याचे प्रसंग अनेक आले. त्यांच्या जागी अन्य कुणी असता तर डगमगला असता. दिशाहीन झाला असता. हिंदुधर्मातील जाचक रूढींमुळे त्यांनी जेव्हा धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अन्य धर्मियांनी अनेक आमिषे त्यांना दाखविली. पण त्या भुलथापांना बळी न पडता डॉ. आंबेडकरांनी भारताशी निगडित असलेला, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांवर अधिष्ठित असलेला बौद्ध धर्म विवेकपूर्वक स्वीकारला. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समतेसाठी लढा देणे ही बाब डॉ. आंबेडकरांच्या स्वाभिमानयुक्त चळवळीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या आयुष्यात घडून आलेल्या आणि त्यांनी घडवून आणलेल्या घटनांचा मागोवा घेतला तर त्यांच्या या जीवननिष्ठेचा नीट उलगडा होईल. त्याग आणि संघर्षावाचून सामर्थ्य प्राप्त होत नाही असे ते म्हणत. महात्मा गांधींच्या निवेदनाला उत्तर देताना ते म्हणाले होते ः
‘‘आम्ही कोणता धर्म स्वीकारणार हे अजून ठरलेले नाही. परंतु सर्वांगीण विचार करून आमची खात्री झाली आहे की, हिंदू धर्म आमच्या उन्नतीस पोषक नाही. विषमता हा या धर्माचा पाया आहे. धर्माची प्रत्येकाला आवश्यकता आहे, हे गांधींचे म्हणणे मला पटते. परंतु आपल्या पूर्वजांच्या धर्माला, तो पटत नसला तरी आणि तो विकासास बाधा आणीत असला तरी चिकटून राहावे ही गोष्ट मात्र मला मान्य नाही.’’
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी ऐतिहासिक परिषद सुरू झाली. डॉ. आंबेडकरांनी सुमारे दीड तास भाषण केले. दहा हजारांपेक्षा अधिक माणसे या परिषदेला उपस्थित होती. आपल्या दहा वर्षांच्या चळवळीचा आढावा घेणे आणि मॉंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणेच्या अनुषंगाने धोरण ठरविणे हा या परिषदेचा दुहेरी हेतू होता. या परिषदेत डॉ. आंबेडकरांनी प्रभावी भाषण करून दलितवर्गाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात किती अन्याय व अत्याचार सहन करावा लागतो याचे हृदयस्पर्शी वर्णन केले. काळाराम मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह करण्यात आपली शक्ती आणि वेळ वाया कसा गेला याची जाणीव त्यांनी करून दिली. हिंदुधर्म ताबडतोब सोडणे स्वाभिमान आणि आत्मोन्नती याकरिता आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले. ‘मी हिंदू धर्मात जन्मास आलो. कारण ते माझ्या हाती नव्हते. परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी त्यांनी प्रतिज्ञा केली.
कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपतींनी दलितांना गुलामगिरीतून मुक्त केले. त्यांना सर्व मानवी हक्क देऊन भारतात कधीही न झालेली समाजक्रांती त्यांनी आपल्या संस्थानात केली. डॉ. आंबेडकरांच्या पुरोगामी चळवळीतील यशःसिद्धीचा हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
डॉ. आंबेडकरांचे संघटनाकौशल्य अतुलनीय स्वरूपाचे होते. दलितांना त्यांनी स्वत्वाची जाणीव करून दिलीच, शिवाय शेतमजूर व कामगार यांच्या संघटना त्यांनी बांधल्या. सोबत औरंगाबादचे मिलिंद महाविद्यालय, मुंबईचे सिद्धार्थ महाविद्यालय यांसारख्या शिक्षणसंस्था उभारल्या. वसतिगृहे स्थापन केली. विचारजागृतीसाठी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ यांसारखी वृत्तपत्रे चालविली. विरोधकांच्या टीकेला त्यांनी एकट्याने तोंड दिले. त्यांचे अमोघ वक्तृत्व जनसमूहाच्या हृदयाचा ठाव घेई.
महात्मा जोतिराव फुले यांनी लोकशाहीचा पाया घातला. डॉ. आंबेडकरांनी लोकशाही तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे विशद केली. ते निग्रही व तत्त्वनिष्ठ होते. निर्भय व निःस्वार्थी होते. बुद्धिवादी आणि कर्मयोगी होते. इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आपल्या ध्येयावर अविचल निष्ठा ठेवून ते कार्यरत राहिले. ‘दैवायत्तं कुले जन्म| मदायत्तं तू पौरुषम्’ या महाभारतातील कर्णाच्या उक्तीनुसार त्यांची जीवननिष्ठा होती. सम्राट अशोकानंतर लक्षावधी लोकांना बौद्ध धर्मात नेणारे डॉ. आंबेडकर हे एकमेव महापुरुष होते. अहिंसेचे ते पुरस्कर्ते होते, परंतु सत्यावाचून अहिंसेला अर्थ नाही. सुप्तावस्था म्हणजे अहिंसा नव्हे असे त्यांचे मत होते. बलवंतांची अहिंसा त्यांना मान्य होती. महाडच्या सत्याग्रहात धैर्यवान अनुयायी पाठीशी असूनही व आपणावर नाहक हल्ले होऊनही त्यांनी त्यांना हिंसक प्रतिकारापासून परावृत्त केले. ते राजकारणातील द्रष्टे होते. राजकीय तत्त्वज्ञ होते.
आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेचे ते प्रमुख शिल्पकार ठरले. तिच्यातील उदारमतवादी मूलतत्त्वांमुळे भारताला स्वातंत्र्योत्तर कालखंडात नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू करता आली हे सत्य कुणीही नाकारू शकणार नाही.
राजकारण, समाजकारण, इतिहास व अर्थशास्त्र यांवर त्यांनी प्रक्षोभक, विचारप्रवर्तक आणि चिंतनशीलता प्रकट करणारे ग्रंथ लिहिले. ‘हू वेअर दि शूद्राज’ आणि ‘दि अनटचेबल्स्’ हे त्यांतील महत्त्वाचे ग्रंथ होत. लोकमान्य टिळकांप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संशोधनबुद्धीची झेप होती. भाऊ दाजी लाड, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, डॉ. रामकृष्ण गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या मालिकेतील ते महत्त्वाचे विद्वान होते. बेव्हरले निकोल्स नावाच्या पत्रकाराने १९४४ साली भारतातील सहा महत्त्वाच्या विद्वानांत त्यांची गणना केली होती. त्यांचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रेरणादायी ठरले आहे. ठरत आहे. अन्यायाची अनावर चीड त्यांच्या मनात निर्माण होई. कारण ती दाहक अनुभूती त्यांनी घेतली होती. त्यामुळे तीव्र मानसप्रतिक्रिया उमटणे ही अत्यंत स्वाभाविक बाब होती. त्यामुळेच दलितांवरील कलंक पुसून टाकणे हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले.
डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेत आणि कर्तृत्वशक्तीत नेहमीच सुसंवादी स्वर आढळून येत असे. ‘आधी केले आणि मग सांगितले’ असा तो क्रम होता. त्यांच्या वक्तृत्वात वंचितांविषयी तळमळ होती. पण या वाणीत भावविवशता नव्हती. विवेकाची जोड होती. रोखठोकपणा होता. आत्मविश्लेषक वृत्तीचा अवलंब दलित बांधवांनी करावा असे त्यांचे म्हणणे होते.
चातुर्वण्याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. आंबेडकर म्हणतात ः
‘‘मला चातुर्वर्ण्याची अत्यंत घृणा आहे, आणि माझा समग्र समाज त्याविरुद्ध क्रांती करण्यास उभा ठाकलेला आहे. माझा चातुर्वर्ण्याला निव्वळ भावनाधिष्ठित असा विरोध नाही. माझे मुद्दे अगदी स्पष्ट आहेत. या चातुर्वर्ण्यप्रणीत समाजरचनेचा अभ्यास केला असता ही समाजपद्धती अत्यंत घातक, अव्यवहारी आणि अयशस्वी असल्याची माझी खात्री झाली आहे.’’
डॉ. आंबेडकरांचे धर्मचिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे ः
‘‘धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म? हा प्रश्न जरूर विचार करण्यासारखा आणि नीतिशुद्ध आचरण ठेवण्याच्या जबाबदारीच्या दृष्टीने धर्मासाठी माणूस आहे. आणि समाजाच्या हिताचा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हाही धर्मासाठी माणूस आहे, असे म्हणता येईल. परंतु धर्माच्या नावावर खपणार्या अधर्मासाठी, विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरीत खपण्यासाठी, पिढ्यान् पिढ्या अन्याय व जुलूम सोसण्यासाठी माणसाचा जन्म आहे किंवा एखाद्या वर्गाचे अस्तित्व आहे, असे मात्र केव्हाही म्हणता येणार नाही. माणसासाठी धर्म आहे.’’
आपल्या जीवननिष्ठांविषयी डॉ. आंबेडकर निःसंदिग्धपणे उद्गारतात ः
‘‘माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे. ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव- तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले आहे, असे कोणी समजू नये. मी ते उसने घेतलेले नाही. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत; राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध- त्यांच्या शिकवणीपासून ते मी काढले आहे. परंतु अपरिमित स्वतंत्रतेने समतेचा नाश होतो आणि निर्भेळ समानता स्वातंत्र्याला वाव ठेवीत नाही. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांचे उल्लंघन होऊ नये म्हणून, केवळ संरक्षण म्हणून निर्बंधाला स्थान आहे. परंतु निर्बंध हा स्वातंत्र्य नि समता यासंबंधी होणार्या उल्लंघनाविरुद्ध हमी देऊ शकतो, असा माझा विश्वास नाही. माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेला फार उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य नि समता यांच्याविरुद्ध संरक्षण फक्त बंधुभावनेतच आहे. त्याचेच दुसरे नाव मानवता; आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव होय.’’
डॉ. आंबेडकरांच्या जीवनसरणीचा समग्र आशय संक्षेपाने त्यांच्या या विचारांतून व्यक्त झालेला आहे. एक धर्मवेत्ता प्रज्ञावंत, कृतिशील नेता आणि पंडित असे हे त्रिमितीयुक्त व्यक्तिमत्त्व. त्या व्यक्तिमत्त्वाची रूपकळा या विचारांत सामावलेली आहे.