- डॉ. सोमनाथ कोमरपंत
ठायी ठायी होणार्या मानखंडनेमुळे अस्पृश्यतेचा मूलभूत प्रश्न हाती घ्यावा अशी टोचणी त्यांच्या मनाला लागली होती. सामाजिक संघर्षाला तोंड कसे द्यावे याविषयीचे संकल्प त्यांच्या मनात होते. त्यानुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची धारणा बनत चालली.
खर्या अर्थाने महामानव कुणाला म्हणावे असा प्रश्न मनात निर्माण होतो तेव्हा भारतीय परंपरेतील महत्त्वाच्या व्यक्ती जशा डोळ्यांसमोर येतात; तशाच विश्वपातळीवरच्या वंदनीय व्यक्ती आदर्श म्हणून उभ्या राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे अजोड व्यक्तिमत्त्व आहे की ज्यांनी शून्यातून विचारांची अभिनव सृष्टी निर्माण केली. तेवढ्यापुरते त्यांनी कार्य मर्यादित ठेवले नाही. आपल्या संघर्षमय जीवनप्रवासात त्या विचारांचे कृतिशीलतेत रूपांतर केले. दीनदलितांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. जो माणूस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयुष्याचा मार्ग आक्रमितो आणि समष्टीच्या कल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवितो तो महामानव या संज्ञेस पात्र होतो. अखिल जगतात दलितांचे उद्धारकर्ते म्हणून डॉ. आंबेडकर ओळखले जातात. जीवन कसे घडवावे, जीवनाचे उन्नयन कसे करावे तर ते बॅ. आंबेडकरांसारखेच, असा असामान्य कर्तृत्वाचा मानदंड त्यांनी निर्माण केला आहे. भारतीय इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला तर असामान्य कर्तृत्व करून दाखविणारी माणसे आपल्याकडे होऊन गेली आहेत. त्यांच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. गौतमबुद्धापासून महात्मा जोतिराव फुले यांच्यापर्यंतच्या कृतिशील प्रज्ञावंतांनी आपल्याला हेच दाखवून दिले. पण जे क्लेशदायी जीवन आपल्या वाट्याला आले ते आपल्या पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याचा होम केला. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान स्वानुभूतीतून आलेले होते.
सामाजिक, धार्मिक आणि राजकीय गुलामगिरीच्या गर्तेत सापडल्यामुळे दलित वर्गाचे शतकानुशतके शोषण होत होते. त्या वर्गात आत्मप्रत्यय, आत्मतेज, आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांचा उदय म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील तेजस्वी व शाश्वत मूल्यांचे दर्शन घडविणारे एक महान पर्व होय. डॉ. आंबेडकरांचे विचार पूर्वसूरींपेक्षा वेगळे होते. अधिक वास्तवाला धरून होते. बुद्धिप्रामाण्यवाद हा या विचारांचा पाया होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मकाळी दलितवर्गाचे जीवन अस्पृश्यतेच्या अमानुष रूढीमुळे कलंकित होते. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास दलितांना बंदी असे. त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश नसे. देवळात देवदर्शनासाठी बंदी असे. चांगल्या सरकारी नोकर्या, प्रतिष्ठित व्यवसाय आणि पोलीस खाते यांत त्यांना प्रवेश नसे. त्यांनी रस्ते झाडावे, संडास साफ करावेत, जोडे शिवावेत, मृत ढोरांची कातडी सोलावी, बांबूच्या वस्तू तयार कराव्यात, शेतीवर नोकर म्हणून राबावे, सरकारी सेवेत अल्पवेतनात काम करावे.
निष्ठुर बांधवांनी दलितांचे जीवन जखडून गेले होते. त्यांचा वेश कसा असावा, आहार-विहार कोणता असावा, त्यांची भांडी कोणत्या धातूची असावीत यावरदेखील बंधने होती. त्यांनी घोड्यावरून नवर्या मुलाची मिरवणूक काढली म्हणून आणि भातावर तूप घेतले म्हणून त्यांच्यावर हल्ले होत असत.
या सार्या हालअपेष्टा, दुःखे आणि निंदानालस्ती आंबेडकरांना चार-पाच वर्षापासून सोसावी लागली. त्यांची आई भीमाबाई मोठी बोलकी, स्वाभिमानी व सच्छील वृत्तीची होती. आईचे गुण भीमरावांमध्ये उतरले होते. भीमरावांचे वडील रामजी सकपाळ हे तडफदार, महत्त्वाकांक्षी, वाचनप्रिय आणि सुशील वृत्तीचे होते. ते व्यवसायाने लष्करात शिक्षक होते. सुभेदार होते. प्रथमतः ते नाथपंथी होते. त्यांनी शेवटी कबीरपंथाची दीक्षा घेतली. भीमराव हे त्यांचे चौदावे अपत्य.
भीमरावांना अस्पृश्यतेविषयीची अवहेलनात्मक वागणुकीची जाणीव बालपणातच झाली. त्यांच्या आईपुढे दुकानदार दुरून कापड टाकत. झकास कपडे घातलेली मुले दलित आहेत हे कळल्यानंतर कचर्याच्या टोपलीतून कचरा फेकावा तसे निष्पाप मुलांना गाडीतून फेकून देण्यात येई आणि बैलांना पिटाळले जाई. सवर्ण हिंदूंच्या पाणवठ्यावर पाणी पिताना एकदा भीमरावांना लोकांनी पकडले. त्यांना भरपूर चोपण्यात आले. महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा उगम या घटनेत असावा. शाळेत बसण्यासाठी घराकडून त्यांना गोणपाटे न्यावी लागत असत. शालेय वयातील छोट्या मुलांचे अवहेलनेचे फुत्कार भीमरावांच्या कानात तापलेल्या तेलाप्रमाणे क्लेश देत असत.
काळ्या ढगालाही रुपेरी कडा असते असा सुखद अनुभव भीमरावांना आला. आंबेडकर नावाच्या शिक्षकाच्या हृदयात माणुसकीचा, शुद्ध प्रेमाचा झरा वाहताना त्यांनी अनुभवला. या शिक्षकाने भीमरावांना जिव्हाळ्याने वागविले. भीमरावांचे आडनाव सकपाळ नसून आंबावडेकर होते. आंबेडकर हे स्वतःचे आडनाव त्यांनी भीमरावांना देऊन टाकले. संस्कृत वाक्यांची अर्थहीन घोकंपट्टी करणार्या शास्त्रीबुवांनी निष्ठुरपणे त्यांना संस्कृतपासून दूर लोटले तरी उत्तरायुष्यात भीमरावांनी संस्कृतचा अभ्यास करून त्यात नैपुण्य मिळविले.
लहानपणी भीमरावांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नव्हती. परळ वस्तीतील चाळीत त्यांची खोली धुरकट वातावरणात होती. घरगुती वस्तूंनी आणि कळकट भांड्याकुंड्यांनी ती भरलेली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत रामजी सकपाळ मुलाला अभ्यासासाठी उठवीत. रात्री-बेरात्री भीमराव अभ्यास करून पहाटे वाच वाजता पुन्हा झोपत असत.
बालपणीच भीमरावांना वाचनाची गोडी लागली. मुंबईच्या चर्नीरोडच्या बागेत त्यांचे वाचन सुरू झाले. प्रसंगी आपल्या मुलीचे दागिने गहाण ठेवून रामजींनी आपल्या मुलाच्या वाचनाची हौस भागविली. भावी जीवनात मानवतेची सनद शिकविणारा विचारवंत या वाचनातून आणि दृढ प्रयत्नांतून घडला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दलितांविषयी करुणा बाळगणारे सी. के. बोले आणि दलितांचे कैवारी गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी सभेत त्यांचे अभिनंदन केले. केळुसकरांनी आपले मराठीत लिहिलेले बुद्धचरित्र त्यांना बक्षीस दिले. पुढच्या उज्ज्वल भविष्यकाळाची ही पूर्वतयारी होती.
भीमराव एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए. झाले. अजूनही त्यांच्या आयुष्यातील नष्टचर्य संपले नव्हते. प्यायला पाणी घेण्याचीही त्यांना तेथे मुभा नव्हती. या महाविद्यालयातील प्रा. म्युल्लर हे भीमरावांना कपडे व पुस्तके देत असत. पदवीधर झाल्यानंतर थोडे दिवस बडोदे सरकारकडे त्यांनी नोकरी केली.
बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी भीमरावांना अभ्यासासाठी अमेरिकेला पाठविले. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र यांचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. एक वेळचे जेवण चुकवून शिष्यवृत्तीच्या पैशांतून जुनी पुस्तके विकणार्या ग्रंथविक्रेत्यांकडून त्यांनी अनेक ग्रंथ विकत घेतले. कोणत्याही प्रकारची चैन न करता अहोरात्र त्यानी अध्ययनाचा निदिध्यास घेतला. दररोज अठरा तास अध्ययन करून ते आपले भावी आयुष्य घडवीत होते. ‘एन्शंट इंडियन कॉमर्स- प्राचीन भारतातील व्यापार’ हा प्रबंध लिहून त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची एम.ए.ची पदवी संपादन केली. ‘भारतातील जातिसंस्था ः तिची उत्पत्ती आणि वाढ’ हा दुसरा प्रबंध त्यांनी वाचला. जातिसंस्थेमुळे भारताचे विघटन झाले. भारत शक्तिहीन झाला. तिच्यामुळे दलित समाज व कनिष्ट जातींचे जीवन मानसिक व सामाजिक गुलामगिरीत खितपत पडले असे त्यांचे प्रतिपादन होते. अमेरिकेत अध्ययन करीत असताना आंबेडकरांची मते व ध्येय ही आकार घेऊ लागली. पददलित समाजाचा उद्धार करण्यासाठी शिक्षणप्रसार हाच एकमेव उपाय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षणाची संधी प्रत्येकाने साधावी. या संधीचा सदुपयोग करावा असे त्यांना वाटायचे.
‘नॅशनल डिव्हिडन्ट ऑफ इंडिया ः ए हिस्टॉरिक अँड अनॅलिटिक्स स्टडी’- ‘भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा ः एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन’ नावाचा प्रबंध त्यांनी कोलंबिया विद्यापीठास सादर केला. त्यांचे गुरू सेलिग्सन यांनी या ग्रंथाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
डॉ. आंबेडकरांनी लंडन येथील ‘स्कूल ऑफ इकॉनोमिक्स ऍण्ड पॉलिटिकल सायन्स’ या महाविद्यालयात डी.एससी. या प्रबंधाची तयारी व बॅरिस्टरीचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. परंतु शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बडोद्याच्या दिवाणाने त्यांना परत बोलावले.
कराराप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी बडोद्यास नोकरी धरली. पण तेथेही त्यांना कटू अनुभव आले. हिंदुधर्मातील अमानुष रूढी, अज्ञान, निष्ठुर आचार यांची कठोरता कमी होत नाही याची खात्री त्यांना पटली. याचे त्यांना अपार दुःख झाले. सिडनहॅम कॉलेजमध्ये लॉर्ड डिसनहॅम यांच्यामुळे डॉ. आंबेडकरांना प्राध्यापकाची नोकरी मिळाली. तिथेही त्यांची अवहेलना झाली. पण आपला गाढ अभ्यास, सिद्धांताचे सखोल विश्लेषण करण्याची त्यांची हातोटी आणि विचारप्रवर्तक शैली यांमुळे ते यशस्वी प्राध्यापक झाले. प्राध्यापक आंबेडकर काटकसरीने आणि साधेपणाने राहत. आपले बिर्हाड दोन खोल्यांतच ठेवून ते आपल्या पगारातून बचत करीत. त्यांची पत्नी रमाबाई पतिपरायण व मितभाषिणी स्त्री होती. तिने साधेपणाने संसार केला.
प्राध्यापकाचा व्यवसाय हे डॉ. आंबेडकरांच्या जीवनाचे अंतिम ध्येय नव्हते. ठायी ठायी होणार्या मानखंडनेमुळे अस्पृश्यतेचा मूलभूत प्रश्न हाती घ्यावा अशी टोचणी त्यांच्या मनाला लागली होती. सामाजिक संघर्षाला तोंड कसे द्यावे याविषयीचे संकल्प त्यांच्या मनात होते. त्यानुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची धारणा बनत चालली.
(पूर्वार्ध)