महान स्वातंत्र्यसैनिक, थोर लेखक पं. जवाहरलाल नेहरू

0
165

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
जवाहरलाल नेहरू सन १९१२ च्या सप्टेंबरमध्ये आपले शिक्षण संपवून विदेशातून हिंदुस्थानात परतले. त्यावेळचा हिंदुस्थान म्हणजे एक थंड गोळा होऊन पडला होता. लोकमान्य टिळक तुरुंगात होते. जहाल पुढार्‍यांची मुस्कटदाबी करण्यात आली होती. नेमस्तांनी सरकारशी सहकार्य केलेले होते. कॉंग्रेसमध्येही नेमस्तांचा वरचष्मा असून जहालांना त्यांनी जणू नेस्तनाबूत केले होते. त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये भरलेल्या बंकीपूर कॉंग्रेसला जवाहरलाल एक प्रतिनिधी म्हणून हजर राहिले व कॉंग्रेस पक्ष बळकट केला पाहिजे, असा एकूण सूर त्यांच्या मनात घर करून गेला.नंतर त्यांनी अलाहाबाद न्यायालयात वकीलीस प्रारंभ केला खरा. पण त्या कामात त्यांना रस वाटेना. देश पारतंत्र्यात आहे, देशवासियांना स्वातंत्र्य पाहिजे या विचारांनी ते अस्वस्थ झाले आणि ते मग राजकारणाकडे आकृष्ट झाले. अलाहाबादमध्ये त्यांनी पहिले जाहीर भाषण केले आणि तेही इंग्रजीत. कारण होमरूल चळवळीच्या डॉ. ऍनी बेझंट त्या सभेत हजर होत्या. ते भाषण ऐकून तेजबहाद्दर सप्रू या नेमस्त पुढार्‍याने व मोतीलाल नेहरू यांच्या स्नेह्याने आनंदाने जवाहरलाल यांना मिठी मारून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर जवाहरलालांनी कधी मागे वळून पाहिले नाही. हळूहळू त्यांनी वकिलीकडे दुर्लक्ष केले व ते पूर्ण वेळ राजकारणाकडे – विशेषतः देश स्वातंत्र्याच्या कार्यात मग्न राहिले.
१९१६ मध्ये भरलेल्या लखनौ कॉंग्रेस अधिवेशनाच्यावेळी जवाहरलाल यांची प्रथमच महात्मा गांधींशी भेट झाली. दक्षिण आफ्रिकेत दिलेल्या तेजस्वी लढ्यामुळे जवाहरलाल यांना गांधीजींविषयी आदर वाटत होता आणि नंतर नंतर तो आदर वाढत जाऊन जवाहरलाल हे गांधीजींचे एक नंबरचे पट्टशिष्यच बनले व देश जवाहरलालजींच्या हातात सुरक्षित राहील असे भाकित महात्माजींनी केले. अशा या जवाहरलालना पहिला तुरुंगवास हा गांधीजींच्या असहकार चळवळीतून झाला तो फेब्रुवारी १९२२ साली.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जवळच असलेल्या चौरीचौरा खेड्यात कॉंग्रेसचे पुढारी, स्वयंसेवक व काही शेतकरी यांचा पोलिसांशी संघर्ष झाला. यात अनेकांना पकडून तुरुंगात डांबण्यात आले. त्यात एक जवाहरही होते. तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी परदेशी मालावरील बहिष्काराच्या चळवळीत लक्ष घातले. सरकारचे जवाहरलालच्या गोष्टींकडे लक्ष होतेच. मग त्यांना मे १९२२ मध्ये दुसर्‍यांदा अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. स्वातंत्र्य चळवळीत महात्माजी, मोतीलाल नेहरू, त्यांचे सहकारी व जवाहरलालजींचे मित्र तुरुंगात होते. जेव्हा खटला चालू झाला, तेव्हा जवाहरलालना विचारण्यात आले, ‘तुम्हाला बचावप्रित्यर्थ काही बोलायचे?’ तेव्हा जवाहरलाल ताड्‌कन म्हणाले,‘नाही, मला बचावासाठी काहीही बोलायचे नाही. तुरुंगात मी खुषीने व आनंदाने राहीन. पुन्हा पुन्हा तुरुंगात जाईन. आमच्या ज्येष्ठ व साधुतुल्य नेत्याला तुरुंगात पाठविल्यापासून तुरुंग हेच आमचे नंदनवन आहे, तेच आमचे तीर्थक्षेत्र आहे.’
कधी आई आणि वडील तुरुंगात, तर कधी बहीण, कधी मुलगी इंदिरा तुरुंगात असे जवाहरलालजींचे सर्व कुटुंबच देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले. सुख – चैनीवर लाथ मारून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुरुंगात हाल-अपेष्टा सोसणारे नेहरू कुटुंब म्हणूनच सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. जवाहरलाल नेहरूंनी तर आपल्या आयुष्यातील ऐन उमेदीची वर्षे निरनिराळ्या तुरुंगांत कधी काही दिवस, कधी काही महिने तर कधी काही वर्षे घालवली. त्यांची एकूण वर्षे एका तपापेक्षाही जास्त भरतात. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व झोकून देणार्‍या जवाहरलाल नेहरूंसारख्या अव्वल दर्जाच्या स्वातंत्र्यसैनिकापुढे आपण नकळत नतमस्तक होतो, यात काय संशय?
नेहरूंनी तुरुंगातील आपली सारी वर्षे वाचन, मनन, चिंतन आणि लेखनामध्ये घालवली. मग ती ‘इंदिरेस पत्रे’ असोत, मोतीलाल नेहरूंना असोत, पत्नीस असोत किंवा विजयालक्ष्मी, कृष्णा या बहिणींना असोत किंवा गांधीजीं आणि इतर नेत्यांना असोत. बराचसा पत्रव्यवहार त्यांनी तुरुंगातूनच केला.
९ ऑगस्ट १९४२ ते १५ जून १९४५ या कालावधीत जवाहरलाल यांनी १०४० दिवसांची कारावासाची शिक्षा भोगली. हा त्यांचा शेवटचा तुरुंगवास होता. याच कारावासातल्या कालावधीत त्यांनी आपला (डिस्कव्हरी ऑफ इंडिया) ‘भारताचा शोध’ हा जगत्मान्य ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी अहमदनगरच्या तुरुंगातल्या सहकारी बंदिवानांना व सहकार्‍यांना अर्पण केलेला आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत जवाहरलाल म्हणतात,‘‘अहमदनगरच्या किल्ल्यात बरोबरच्या सहकार्‍यांशी जी अनेक संभाषणे होत, चर्चा चालत, त्यांचा हिंदुस्थानाचा इतिहास आणि संस्कृतीची अनेकविध अंगे समजून घ्यायला फार उपयोग झाला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे भागच आहे. अगाध कुलवैभव, परमोच्च संस्कृतीप्रेम आणि क्षणिक भावनांनी विचलित न होण्याइतकी विश्वकल्याणाची वृत्ती असलेल्या थोरांच्या निकट सहवासात मला राहायला मिळाले. या सार्‍या सहकार्‍यांचा मी आभारी असलो, तरी त्यातल्या त्यात मौलाना अबुल कलाम आझाद, पं. गोविंदवल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, बॅ. असफ अली यांचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. ‘भारताचा शोध’ या ग्रंथाबाबत टिप्पणी करताना नामवंत समीक्षकांनी म्हटले, ‘भारताचा शोध हा इतिहासग्रंथ जवाहरलाल नेहरू यांनी अवघ्या दहा प्रकरणांत लिहिला असला तरी तो अतिशय डौलदार इंग्रजी भाषेत लिहिलेला असून त्यांच्या आत्मचरित्राप्रमाणेच जगातल्या प्रमाण इतिहास ग्रंथात त्या ग्रंथाचा समावेश करण्यात येतो.’ त्यांच्या ‘भारताचा शोध’ व त्यांच्या आत्मचरित्राचा उल्लेख करून नामवंतांनी म्हटले, ‘कदाचित राजकारणी नेहरू विसरले जातील, पण ग्रंथकार नेहरू यांची कीर्ती चिरकाल टिकणारी आहे. ‘पुढे तर एका समीक्षकाने असेही म्हटले, ‘मंडाले’च्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहून जगन्मान्यता मिळविली, तशीच कीर्ती या ग्रंथाने जवाहरलालना लाभली. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली…