– विदुषी डॉ. अलका देव मारूलकर
ज्येष्ठ गायक संगीततज्ज्ञ तसेच थोर गुरु पं. राजाभाऊ देव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘निनादिनी’ या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला समर्पित संस्थेमध्ये अनेक सांगीतिक उपक्रम सादर केले गेले व सादर होणार आहेत. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका तसेच पं. राजाभाऊ देव यांच्या कन्या व शिष्या पंडिता अलका देव मारूलकर यांच्या प्रतिभावंत शिष्य परिवाराचे गायन ‘गुरुगौरव’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या २९ व ३० जुलै रोजी सादर होणार आहे. पं. राजाभाऊ देव यांच्या संगीत साधनेचा आवाका प्रचंड असून ग्वाल्हेर, किराना व जयपूर गायकीच्या समायोगाने त्यांनी समग्र गायकी निर्माण केली आहे. त्यांनी जी ही सर्वसमावेशक रागाधिष्ठित गायकी निर्माण केली त्यामागच्या त्यांच्या सौंदर्यसंकल्पनांचे संक्षिप्त विवरण प्रस्तुत लेखातून जाणकार रसिकांना वाचायला मिळेल…
दादा, माझे पिता, गुरु, मित्र, समीक्षक, एक शिशुहृदय असलेले निरागस व्यक्तिमत्व! कधी कधी आपल्या प्रखर धाकाने आतंकित करणारे, तर कधी निरामय वात्सल्याच्या पाझराने मला सुरक्षित करणारे! संगीत आणि संगीत याशिवाय दुसरा ध्यास नसलेले दादा, तितक्याच उत्कटतेने क्रिकेटच्याही प्रेमात होते. उत्तम प्राध्यापक, आवडते गुरू व विनोदाची उत्कृष्ट जाण असणारे, किंबहुना कधी कधी स्वतःवरच हसणारे हे एक रसील, मनस्वी व्यक्तिमत्व होते.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनेक संगीत विचार, अनेक सौंदर्याभिव्यक्ती तसेच अनेक शैलींची निर्मिती अविरत चालू आहे. अगदी सामवेदाच्या काळापासून ‘राग’ व त्याची अनंत घटकमूल्ये, सौंदर्य संकल्पना, अभिव्यक्ती व भाव परिपोष यांचं विश्लेषण करून समस्त संगीत साधक शेवटी एकाच बिंदूवर येऊन थांबतात आणि ते म्हणजे प्रत्येक रागाच्या अनादी स्वरुपाचा एकाच संगीत-विचार कक्षेत समावेश करणे केवळ असंभव आहे. आधुनिक हिंदुस्थानी ख्याल गायनातही या सर्वसमावेशी सौंदर्यरचनेची म्हणजेच रागतत्त्वाची साधना करताना मानवी क्षमतेनुसार त्याच्या विविध घटकांची अर्थात् आलाप, बोलबॉंट, ताना इत्यादी उपांगांची एकत्र व वेगवेगळी आत्मसात करणे हीच साधकाची आजीवन महत्त्वाकांक्षा असते. आवाजाच्या वैविध्यपूर्ण गुणधर्मानुसार ही या साधनेची दिशा ठरत असते. रागविस्ताराच्या सर्व अंगउपांगाना हाताळताना एक किंवा दोन उपांगांवरच संपूर्ण लक्ष एकाग्र करणे मग त्याच उपलब्धीवर समाधान मानून साधनेला आकुंचित करणे कितपत् योग्य आहे; यावर माझ्या गुरुंनी सखोल चिंतन-मनन करून एका सर्वसमावेशक रागदृष्टीकडे आम्हा शिष्यांना वळविले. त्यामुळेच रागाचा आवाका केवळ बंदिश किंवा आलाप-तानांपुरता मर्यादित नाही, तो सुरुवातीच्या आलापापासून – अर्थात् आरंभ बिंदूपासून सुरू होऊन स्वाभाविक गति व प्रवाह सांभाळत बंदिशाची नेटकी मांडणी, विस्तृत आलाप, बोलआलाप, बोललयकारी, बेहेलावे, ताना (रागाकृतीनुसार होणार्या त्यांच्याही क्रमबद्ध विस्तारासहित) – इत्यादी सर्व सूक्ष्मातिसूक्ष्म तत्त्वांमधून प्रवास करीत (अर्थात् – मध्यबिंदू गाठत गाठत) उच्चतम बिंदुवर आरूढ होण्यासाठी सहजता, विनम्रता व हमखासपणाची आवश्यकता आहे हे त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ प्रशिक्षणातून मला व अन्य सर्व शिष्यांना पटवून दिले. त्यामुळेच एखाद्या रागाचे विश्वरूप कसे पाहायचे, अनुभवायचे हे ही शिकता आले.
दादांनी समग्र गायकीचे विचार वेळोवेळी जाहीरपणेही मांडले आहेत, पण काही संगीतविचारकांनी ‘समग्रते’चा अर्थ सर्व घराण्यांच्या गायकींची सरमिसळ व ती करण्यामागचा ‘भोळा आशावाद’, एक प्रकारचा हटवाद असा लावून दादांच्या तळमळीचे अवमूल्यन केले आहे. ‘प्रतिमा’ ही प्रतिभेपेक्षा श्रेष्ठ नाही, प्रतिभा दैवी देणगी आहे तर प्रतिमा मानवनिर्मित आहे. स्वतःवर खुश होऊन रसिकांच्या मनात स्वतःविषयीची एक (फक्त एकच) ‘सकारात्मक स्वीकृती’ (पॉझिटिव्ह ऍक्सेप्टॅबिलिटी) रुजविणे हाच ध्यास कलाकाराला जर असेल तर तो रागाविषयीची सूक्ष्म, तरल व अमूर्त ‘प्रतिमा’ संगीतरसिकांच्या हृदय व बुद्धिवर अंकित करू शकणार नाही! स्व-अभिव्यक्तिपेक्षा स्वरहित वस्तुनिष्ठ रागाभिव्यक्ती अधिक श्रेयस्कर आहे असे त्यांना जे वाटत होते ते त्यांच्या गहन संगीत चिंतनातून व्यक्त होत होते.
दादा, माझे पिता, गुरु, मित्र, समीक्षक, एक शिशुहृदय असलेले निरागस व्यक्तिमत्व! कधी कधी आपल्या प्रखर धाकाने आतंकित करणारे, तर कधी निरामय वात्सल्याच्या पाझराने मला सुरक्षित करणारे! संगीत आणि संगीत याशिवाय दुसरा ध्यास नसलेले दादा, तितक्याच उत्कटतेने क्रिकेटच्याही प्रेमात होते. उत्तम प्राध्यापक, आवडते गुरू व विनोदाची उत्कृष्ट जाण असणारे, किंबहुना कधी कधी स्वतःवरच हसणारे हे एक रसील, मनस्वी व्यक्तिमत्व होते.
कुठलीही पारिवारिक पृष्ठभूमी संगीताला अनुकूल नसतानाही लहानपणीच दादांना संगीताची नुसती गोडीच नव्हे, तर अनावर ओढ लागली होती. इतकी की या गाण्याच्या मैफली रात्रभर ऐकून दरवाजाऐवजी पाईपवरून चढून घरात शिरण्याची पाळी आल्यावर आपल्या कर्मठ आणि प्रखर संगीतविरोधी वडिलांकडून लोखंडी स्प्रिंगचा मार खाण्याचं मनोबलही त्यांना देणगीस्वरूप मिळालेलं होतं. अभ्यासात उत्तम प्रगती असूनही, ‘गाणे ऐकायचेही नाही’ या वडिलांच्या आदेशाला एक दिवस धुडकावून त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी घर सोडून दिले आणि पं. जगन्नाथबुवा पंढरपूरकर यांच्याकडे पंढरपूरला जाऊन माधुकरी मागून संगीताचे धडे घेतले. अर्थात् बुवांकडे शिकणार्या रुप-गुण-यश संपन्न अभिनेत्री गायिका शांता आपटे यांच्या घरी नोकराची कामे करून, त्यांना चालू असलेल्या तालमीतून कानावर पडेल ते घेण्याची चिकाटी दादांनी दाखवल्यावरच गुरू प्रसन्न झाले आणि पुढे दोन वर्षे मनापासून त्यांनी दादांना तालीम दिली.
पुढे ज्ञानाच्या कक्षा वाढविण्यासाठी ग्वाल्हेरला ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पं. राजाभैय्या पूंछवाले या गुरुंचं मार्गदर्शन सात वर्षे मिळाले आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी एक उत्तम, होतकरू गायक म्हणून दादांनी मान्यता मिळविली. कलाकाराच्या कलंदर प्रवासाची अव्याहत वीस वर्षे अनेक मैफली, अनेक संगीत संमेलने यशस्वी करून अक्षरशः गाजविली. एका अत्युच्च शिखराकडे दादांची मोठ्या जिद्दीने वाटचाल चालू होती. कुठल्याही गुरुच्या नावाचं वलय त्यांच्यामागे नसतानाही! तरीपण उस्ताद अल्लाउद्दीन खॉं साहेबांसारख्या नादमहर्षीकडून स्नेहल आशीर्वाद, पं. रातंजनकरांकडून प्रोत्साहन, पं. सुरेशबाबूंची पेटीवर अनेकवेळा साथसंगत, गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकरांचे भगिनीवत् वत्सलप्रेम, पं. भीमसेनजी व स्व. पं. डी.व्ही. पलुस्करांसारख्या समकालीन गायकांशी उत्तम मैत्री, अशा सर्व अमूल्य खजिन्यांचा धनी हा भणंग फकीर! लोकसंग्रह एवढा दांडगा, की त्यांचे वेगळे किस्से तयार व्हावेत व त्यांना एक प्रचंड ग्रंथाचे रूप यावे! त्यांच्या अनेकांशी असलेल्या मैत्रीचा मलाही फायदा होतो. कुठेही एकटी मैफलीसाठी गेले की त्यांचे त्या गावचे घनिष्ट मित्र माझा पूर्ण पाहुणचार, मदत करतात आणि वर ‘राजाभाऊंच्या मुलीने त्यांच्या कीर्तीची शान राखली हो’ असे म्हणत पोटभर आशीर्वाद देतात.
त्यांच्या अद्वितीय गायनाचे अनेक रसिक चाहते आजही अचानक भेटतात, त्यांनी गायिलेल्या रागांची नावेही त्यांना आठवत असतात आणि परत त्या मैफलींची आठवण ताजी होते.
‘दादा’ हे असे विलक्षण अवलिया होते की त्यांनी आपल्या गुरुंना गुरुदक्षिणाही अतिशय वेगळ्या पद्धतीने दिली. मध्यप्रदेशच्या देवासचे राजगायक, आपल्या पेचदार गायकीनं स्वतःचा दरारा निर्माण करणारे उस्ताद रजब अली खॉंसाहेब, दादांचे तिसरे गुरू! (हा उल्लेख केवळ संख्यात्मक नसून गुणात्मकही आहे.) दादांना त्यांच्या तालमीचा लाभ मिळाला; पण केव्हा? खॉंसाहेब वयोवृद्ध झाले तेव्हा. कफ व दम्याच्या विकारानं खॉंसाहेब जर्जर झाले होते तरी नागपूरला ते स्वतः दादांकडे दोन वर्षे राहूनही रात्री १२ ते सकाळी ६ अशी अविश्रांत तालीम देत होते. खॉंसाहेब गात असताना अनेकदा त्यांना खोकल्याची उबळ येई. जवळ तस्त नसलं तर दादांनी स्वतः ओंजळीत त्यांचा कफ घ्यावा आणि गाणं अविरत चालू रहावं, अशी जगावेगळी ती तालीम होती. खॉंसाहेब या शिष्याची तळमळ, चिकाटी आणि आत्मसात करण्याची अपूर्व क्षमता पाहून अक्षरशः रडत आणि म्हणत, ‘‘राजा, तुमने मेरे पास आने में बहुत देर कर दी’’ पण नियतीनं दादांच्या बाबतीत दरवेळी देरच केलेली आहे. जयपूरला वनस्थळी विद्यापीठात प्राध्यापक असताना संगीत विभागाचे प्रमुख प्रा. बी. आर. देवधर, दादांचे चौथे गुरु. त्यांनी दादांना दुर्मिळ राग व बंदिशी दिल्या. ते म्हणत, ‘‘देवसाहेब, तुमच्या गळ्यात आणि गाण्यात तुमचा आत्मा आहे.’’ या थोर गुरुंचा लाभही फार थोडा काळ दादांना मिळाला.
या नादमहर्षीची जन्मशताब्दी साजरी होत असून अशा या थोर कलावंताची कन्या होण्याचं भाग्य मला लाभलं. ते गुरु व पिता या दोन्ही नात्यानं माझ्या अणुरेणूंचे शिल्पकार ठरले. याचा मला सार्थ अभिमान आहे.
‘गुरुगौरव’ हा कार्यक्रम फोंडा येथील विश्वहिंदू परिषदेच्या सभागृहात सादर होणार असून सर्व रसिकश्रोत्यांना हार्दिक आमंत्रण!