सिरीयल किलर महानंद नाईक याने शिक्षेतून सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायालयाने या याचिकेला अनुसरून राज्य सरकारला नोटीस जारी केली असून, या याचिकेवर 23 जुलैला सुनावणी होणार आहे.
सिरीयल किलर महानंद नाईक हा दोन खून प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरोधात 16 युवतींच्या खून प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले होते. फोंडा येथील वासंती गावडे खून प्रकरणात त्याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. तीन प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा ठोठावण्यात आली, तर इतर प्रकरणांमध्ये पुराव्यांअभावी तो निर्दोष सुटला आहे. शिक्षा ठोठावताना न्यायालयाने त्याला लवकर सोडू नये, असे स्पष्ट केले आहे. महानंद नाईक याला 2009 मध्ये खून प्रकरणात फोंडा पोलिसांनी अटक केली होती. त्याला 2011 मध्ये एका प्रकरणामध्ये शिक्षा ठोठावण्यात आली. या दोन वर्षांचा कोठडीतील काळ शिक्षेत गृहीत धरणाची मागणी महानंद नाईक याने याचिकेत केली आहे.