महागाई भ्रष्टाचार ही भाजपने दिलेली देणगी : चव्हाण

0
38

महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा र्‍हास ही भाजपने आपल्या राजवटीत दिलेली देणगी असून आता भाजपने देशातील जनतेची लूट चालवली असल्याचा आरोप काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, पक्ष प्रवक्त्या अलका लांबा, महिला अध्यक्ष बीना नाईक, सुनील कवठणकर व नौशाद चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे लोकार्पण केले.

यावेळी पुढे बोलताना चव्हाण यानी, यंदा कॉंग्रेस पक्षाला गोव्यात बहुमत प्राप्त होईल व कॉंग्रेस स्थिर सरकार देईल, असा विश्‍वास व्यक्त करतानाच यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नसल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, २०१४ साली कच्चा तेलाचे दर हे प्रती बॅरल १०८ डॉलर होते. तरीही कॉंग्रेस सरकार कमी किंमतीत पेट्रोल देत होते. आता कच्चा तेलाचे दर प्रती बॅरल ७३ डॉलरवर आहेत. परंतु भाजप सरकारने किमती कमी करण्याऐवजी त्या लिटरमागे १०० रु.वर नेल्या आहेत. कॉंग्रेस काळात रेल्वेभाडे ३२ पैसे प्रती कि.मी. एवढे होते. आता ते १.१० रु. प्रती कि.मी. एवढे झाले असून ही वाढ ३४३ टक्के एवढी असल्याचे ते म्हणाले. एटीएममधून आता स्वत:चे पैसे काढण्यासाठीही कर भरावा लागत असल्याचे ते म्हणाले.

दिनेश गुंडूराव यांनी, भाजपशासित राज्ये जनतेची लूट करीत असून त्यांना घरी पाठवायला हवे असे सांगितले. तर अलका लांबा यानीही यावेळी महागाईवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली.