दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाईश रहे |
जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो ॥
बशीर बद्र यांचा यांच्या या प्रसिद्ध शेरात म्हटल्याप्रमाणे जुने वैर विसरून भाजप आणि नितीशकुमार पुन्हा एकत्र आले आहेत. दोहोंनी एकमेकांच्या साथीने आधी सरकार बनवले, मग वेगळे झाले, एकमेकांना पाण्यात पाहू लागले, पण आता पुन्हा एकत्र आले आहेत. प्रत्येकवेळी पाहिली गेली आहे ती निव्वळ राजकीय सोय. भारतीय राजकारणामध्ये स्वहित पाहूनच निर्णय घेतले जातात असे नुकतेच राहुल गांधी म्हणाले, परंतु हे सत्य तर जगजाहीर आहे! नितीशकुमार यांच्यासाठी भाजपने कधीपासून गळ लावला होता. त्याला प्रतिसाद देत ते लालूप्रसाद यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी गेले अनेक महिने निमित्त शोधत होते, त्यामुळे त्यांचा राजीनामा ही काही आश्चर्याची बाब नव्हे. सगळे काही जुळवून आणल्यावर उचललेले ते पाऊल आहे. ‘संघमुक्त भारत’ करण्याची घोषणा देणार्या आणि त्यासाठी बिगर भाजपाई पक्षांना एकत्र येण्याची हाक देणार्या नितीशकुमार यांच्या आकांक्षा पंतप्रधानपदाच्या होत्या, परंतु विरोधी पक्षांची कधीच एकजूट होऊ शकणार नाही आणि ते आपल्यामागे उभे राहू शकणार नाहीत आणि २०१९ ची हवा कोणत्या दिशेने वाहते आहे हे पुरते उमगल्याने त्यांनी यांनी हळूहळू भाजपाकडे ओढा दाखवायला सुरूवात केली होती. ज्यांच्यासमवेत व्यासपीठावर बसण्याचीही एकेकाळी नितीश यांची तयारी नसे, त्या मोदींविषयी नितीश यांना एकाएकी प्रेम वाटू लागले. त्यांच्या नोटबंदीच्या निर्णयाचे नितीश यांनी समर्थन केले, अठरा विरोधी पक्षांनी मिळून राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार उभा करायचे ठरवले, तेव्हा शेवटच्या क्षणी नितीश यांनी त्या बैठकीला टांग मारली. राजीनामा देऊन भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन करण्याचे त्यांचे सध्याचे पाऊल मोदी विरोधकांवर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे. केवळ बिहारपुरतेच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये त्याचे पडसाद उमटतील. सन २०१९ च्या निवडणुकीसाठी बिगर भाजपा पक्षांची एकजूट निर्माण करण्याच्या चाललेल्या प्रयत्नांना नितीश यांनी अलविदा केल्याने जबर धक्का बसला आहे. बिगर भाजप आघाडीचे एक महत्त्वाचे नेते मुलायमसिंह यादव आणि पुत्र अखिलेश यादव यांच्यातील दुफळीमुळे समाजवादी पक्षाची वाताहत झाली. आता संयुक्त जनता दलानेही विरोधकांची साथ सोडली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत घेरले गेले आहेत, एकेकाळी देशावर अधिराज्य गाजवणारी कॉंग्रेस दिवसेंदिवस गाळात रुतत चालली आहे. त्याचे सुकाणू हाती घेऊन समर्थपणे पक्षाला पुनरुज्जीवित करण्याची धमक राहुल गांधींमध्ये नाही हे आतापर्यंत वेळोवेळी दिसले आहे. पर्यायी नेतृत्वही पक्षापाशी नाही. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जीही घेरल्या गेल्या आहेत. अशा वेळी २०१९ च्या निवडणुकीत भाजपला आव्हान देणार कोण? जो तो रणमैदान सोडून पळून जाताना दिसतो आहे नाही तर तडजोडीचे राजकारण करू लागला आहे. भाजपच्या बाहेरून पाठिंब्यावर पुन्हा सरकार घडवणार्या नितीशकुमार यांना आता सर्वप्रथम आपला पक्ष संघटित ठेवावा लागेल. सध्याच्या कोलांटउडीमुळे डागाळलेली आपली प्रतिमा सावरावी लागेल. मागील निवडणुकांत ज्या मोजक्याच राज्यांमध्ये भाजपेतर पक्षांना मतदारांनी कौल दिला, त्यापैकी बिहारही विरोधकांच्या हातून आता निसटले आहे. महाआघाडीत मोठी बिघाडी झाली आहे. एकेका विरोधी नेत्याच्या अंतरात्म्याच्या आवाजाला कंठ फुटू लागलेला दिसतो आहे. विरोधकांमध्ये निर्माण होणारी नेतृत्वाची ही पोकळी आता कोण भरून काढणार आहे?