महाकुंभ मेळ्यासाठी तिसरी रेलगाडी शुक्रवारी गोव्यातून प्रयाण करणार

0
4

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी गोव्यातून जाणार असलेल्या तीर्थयात्रेकरूंना घेऊन तिसरी रेलगाडी शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी गोव्यातून प्रयागराजकडे प्रयाण करणार आहे, अशी माहिती काल समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

गोव्यातील तीर्थयात्रेकरूंना घेऊन पहिली रेलगाडी 6 फेब्रुवारी रोजी मडगाव येथून प्रयागराजकडे गेली होती. या रेलगाडीतून गोव्यातील 1200 तीर्थयात्रेकरू महाकुंभ मेळ्यासाठी गेले होते. या तीर्थयात्रेकरूंना घेऊन 9 फेब्रुवारी रोजी ती रेलगाडी गोव्यात परतली होती. तर दुसरी रेलगाडी 13 फेब्रुवारी रोजी मडगाव येथून प्रयागराजकडे गेली आहे. या रेलगाडीतून 1500 तीर्थयात्रेकरू महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला गेलेले आहेत.

आता तिसरी रेलगाडी शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी गोव्यातून प्रयागराजला जाणार आहे. गोव्यातून महाकुंभमेळ्यासाठी जाण्यास भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारने दर एका रेलगाडीतून 1 हजार तीर्थयात्रेकरूंना पाठवण्याची योजना तयार केली होती. मात्र, यात्रेकरूंचा वाढता आकडा लक्षात घेऊन पहिल्या रेल्वेतून अतिरिक्त 200 जणांना मिळून 1200 तीर्थयात्रेकरूंना महाकुंभ मेळ्यासाठी पाठवण्यात आले. या यात्रेसाठीच्या दुसऱ्या रेल्वेच्या वेळी तीर्थयात्रेकरूंचा आकडा आणखी वाढला. त्यामुळे आणखी 500 अतिरिक्त यात्रेकरूंना समावून घेऊन 1500 जणांना पाठवण्यात आले. 21 रोजीच्या यात्रेसाठी आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली या तीर्थयात्रेचे सरकारने आयोजन केलेले आहे.