>> समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती
>> तीन हजार भाविकांना प्रयागराजमध्ये नेणार
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेल्या 15 जानेवारीपासून चालू झालेल्या व येत्या 8 मार्चपर्यंत चालू राहणार असलेल्या महाकुंभ मेळ्याला गोव्यातून भाविकांना जाता यावे, यासाठी गोवा सरकारने मुख्यमंत्री देवदर्शन योजना पुनरुज्जीवित केली असून, या योजनेतंर्गत प्रथम येणाऱ्यांस प्रथम या तत्त्वानुसार गोव्यातील एकूण 3 हजार तीर्थयात्रेकरूंना तीन विशेष रेल्वेगाड्यांतून गोव्यातून प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती काल समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याविषयी अधिक माहिती देताना फळदेसाई हे म्हणाले की, राज्यातील 18 ते 60 या वयोगटातील भाविकांचाच या तीर्थयात्रेसाठी विचार केला जाणार आहे. दि. 6 फेब्रुवारी रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरून सकाळी 8 वाजता विशेष रेल्वेगाडी प्रयागराज येथे जाण्यासाठी सुटणार असून, त्यानंतर दुसरी विशेष रेल्वेगाडी 13 फेब्रुवारी रोजी तर तिसरी विशेष रेल्वेगाडी 21 रोजी गोव्यातून प्रयागराजकडे प्रयाण करणार असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक रेल्वेगाडीतून 1 हजार यात्रेकरू याप्रमाणे तीन रेल्वेगाड्यांतून एकूण 3 हजार यात्रेकरू महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणार असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. यात्रेकरूंचा रेल्वे प्रवास हा मोफत असेल. तसेच रेल्वेत त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय करण्यात येणार असल्याचे फळदेसाई म्हणाले.
प्रयागराज रेल्वे स्थानकावरून कुंभमेळास्थळी जाण्यासाठी यात्रेकरूंना पुढील प्रवासाची सोय स्वत:च करावी लागणार आहे. कुंभमेळ्यात दर्शनासाठी या यात्रेकरूंना 24 तासांचा वेळ देण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना विशेष रेल्ववेगाडीतून गोव्यात परत यावे लागणार आहे, असेही फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला जलसंसाधन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर व आमदार आंतोनियो वाझ हेही हजर होते.
हमीपत्र द्यावे लागणार
आपण या यात्रेसाठी जाण्यास शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे, तसेच आपण स्वत:च्या जबाबदारीवर या यात्रेला जात असून, तेथे आपण हरवलो अथवा आपले काही बरे-वाईट झाले तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरले जाऊ नये, असे हमीपत्र यात्रेकरूंना द्यावे लागणार आहे.