- पल्लवी धेंपो
कोट्यवधी भाविक गंगामातेची हाक ऐकून तिच्या पवित्र पाण्यात डुबकी मारताना पाहताना दिसतो तो केवळ आंतरिक शांतता आणि सौहार्दाचा सार्वत्रिक शोध, पूर्वकर्मांची नकारात्मकता दूर सारण्याची आकांक्षा आणि श्रद्धा कोट्यवधी मानवांना एका भावनेने एकत्र आणत असल्याने बळकट होणारे भावबंध आणि निर्माण होणारी एकजूट..
प्रयागराजमध्ये सध्या भरलेल्या महाकुंभमेळ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतल्यानंतर पल्लवी धेंपो यांनी शब्दांकित केलेला तो अनुभव
दि. 13 जानेवारी 2025 पासून, भारतातून आणि जगभरातून कोट्यवधी लोक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी येत आहेत. हा जगातील सर्वांत मोठा भाविकांचा मेळा आहे, ज्याला आजवरचे सर्वांत मोठे मानवी एकत्रीकरण आणि यात्रेकरूंचे जगातील सर्वांत मोठे शांततामय संमेलन संबोधले जात आहे.
कुंभमेळ्याचा काळ हा एका विशिष्ट शुभ ग्रहस्थितीशी संबंधित आहे. बुद्धी, ज्ञान, विस्तार आणि प्रगतीशी संबंधित गुरू ग्रह बारा वर्षांतून एकदा राशीचक्रातून मार्गक्रमण करतो. सूर्याभोवतीचे त्याचे भ्रमण आणि पृथ्वी व इतर खगोलीय पिंडांच्या सापेक्ष स्थिती कुंभमेळ्याची वेळ निर्धारित करीत असते. पूर्णकुंभमेळा हा बारा वर्षांच्याा चक्रात चारवेळा प्रयागराज, हरिद्वार, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन ह्या पवित्र तीर्थक्षेत्रांवर साजरा केला जात असतो. पूर्णकुंभाचा मध्यबिंदू असणारा अर्धकुंभ दर सहा वर्षांनी येतो, जो प्रयागराज आणि हरिद्वार येथे आळीपाळीने साजरा केला जातो. महाकुंभ हा 12 पूर्णकुंभांनंतर म्हणजेच दर 144 वर्षांनी एकदा येतो, त्यामुळे त्याला जीवनातून एकदाच येणारा योग म्हटले जाते.
आयुष्यातून एकदाच येणारा हा योग सूर्य, चंद्र आणि गुरूच्या दुर्मीळ खगोलीय स्थितीशी देखील जुळतो. ह्या खगोलीय स्थितीमुळे पृथ्वीचे विद्युतचुंबकीय क्षेत्र वाढते आणि हवा आणि पाणी ह्या घटकांना चालना मिळते असे मानले जाते. हा तो काळ असतो जेव्हा आपल्या पवित्र नद्या दैवी स्पंदनांनी आणि ऊर्जेने भारलेल्या असतात, ज्यात आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याची, आपल्या कर्मबंधनातून मुक्त होण्याची आणि आध्यात्मिक मुक्ती मिळवून देण्याची शक्ती असते, असे मानले जाते.
कुंभाची उत्पत्ती ही हिंदू पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेली आहे. भगवान विष्णूंनी समुद्रमंथनातून वर आलेले अमृत राक्षसांच्या हाती जाऊ देण्यापासून रोखण्यासाठी लढताना त्याचे काही थेंब प्रयागराज, हरिद्वार, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन येथे सांडले असा समज आहे. ही चार केंद्रे नंतरच्या काळात हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून उदयास आली.
13 जानेवारीपासून आपल्या देशातील तसेच जगभरातील कोट्यवधी भाविक प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्यरूपातील सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाच्या पवित्र पाण्यामध्ये आत्म्याच्या प्रतिकात्मक शुद्धीसाठी स्नान करण्यासाठी जमले आहेत. 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी 45 दिवसांचा हा सोहळा संंपेल तोवर 55 कोटी भाविकांनी संगमाला भेट दिलेली असेल!
महाकुंभ 2025 ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, ह्या भारतीय आध्यात्मिक सोहळ्याच्या बाबतीत सर्व सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक अडथळे देखील ओलांडून भाविकांकडून स्वारस्य आणि औत्सुक्य निर्माण झालेले आहे यात शंकाच नाही.
कोट्यवधी लोक प्रयागराजमध्ये आले आणि प्रसारमाध्यमे ह्या सोहळ्याच्या छायाचित्रांनी भरून गेली, तेव्हा मला ह्या मेळ्यात धाव घेण्यासाठी जणू दैवी हाक ऐकू आली आणि ह्या दैवी आणि आगळ्यावेगळ्या अनुभवाचे साक्षीदार होण्याची अनावर इच्छा झाली.
माझे पती श्रीनिवास आणि मी जेव्हा प्रयागराजमध्ये पोहोचलो, तेव्हा तेथे जे पाहिले आणि अनुभवले ते आमच्या स्वतःच्या अपेक्षांपेक्षा खूपच अधिक होते हे मान्य करावेच लागेल. प्रयागराजमधील विशेष ऊर्जा अगदी स्पष्ट होती. संगम तर भाविकांचा महासागर होऊन गेलेला होता. गंगा आणि यमुना नद्यांच्या वेगवेगळ्या छटा संगमामध्ये एकरूप होऊन एकच प्रवाह बनल्याचे दृश्य नयनरम्य होते. हजारो लोक संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने स्नान करीत असल्याचे पाहणे हा एक नतमस्तक करणारा अनुभव होता.
पहिला प्रश्न माझ्या मनात आला तो म्हणजे प्रयागराजसारखे तुलनेने छोटे शहर ह्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणातील सोहळ्याचे आयोजन कसे काय करू शकले, त्यासाठी आवश्यक सुविधा आणि साधने यांचे व्यवस्थापन कसे करू शकले?
नियोजन आणि अंमलबजावणीचे प्रमाण पाहून आम्ही थक्क होऊन गेलो. संगमाच्या काठावरील भव्य महाकुंभ टेंट सिटी हीच एक मुळात अद्भुत गोष्ट होती. पारंपरिक आकर्षकता आणि आधुनिक साधनसुविधा यांनी परिपूर्ण अशी ही नगरी मेळ्यातील सर्व धार्मिक उपक्रमांचे केंद्र होती. मलनिःस्सारण सुविधा, साफसफाई आणि स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था उच्च दर्जाची होती. स्थानिक प्रशासनाने 45 दिवसांच्या ह्या सोहळ्यात अंदाजे पन्नास कोटी भाविकांचे आतिथ्य करण्याची व्यापक व विस्तृत व्यवस्था काळजीपूर्वक केली असल्याचे प्रतीत होत होते. कोणताही भाविक अन्न किंवा निवाऱ्याविना राहिला नाही. प्रत्येकाने ह्या सोहळ्यास सेवा म्हणून योगदान दिले. हजारो सेवाभावी संघटना मानवतेच्या सच्च्या भावनेतून, सर्व कृत्रिम सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक अडथळे दूर सारून मोफत अन्नदानात गुंतलेल्या होत्या.
आम्ही हजारो सहयात्रींसह संगमाकडे पवित्र स्नानासाठी गेलो. कुंभातील स्नान एक मोठी समानता आणणारे ठरते. येथे, केवळ एकच श्रद्धा राज्य करते. ती सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अडथळे ओलांडते. कोट्यवधी भाविक गंगामातेची हाक ऐकून तिच्या पवित्र पाण्यात डुबकी मारताना पाहताना दिसतो तो केवळ आंतरिक शांतता आणि सौहार्दाचा सार्वत्रिक शोध, पूर्वकर्मांची नकारात्मकता दूर सारण्याची आकांक्षा आणि श्रद्धा कोट्यवधी मानवांना एका भावनेने एकत्र आणत असल्याने बळकट होणारे भावबंध आणि निर्माण होणारी एकजूट.
कुंभमेळा ही एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. असे मानले जाते की मध्ययुगीन कालखंडामध्ये, विशेषतः गुप्त आणि मौर्य राजवंशांच्या काळात कुंभमेळ्याला राजाश्रय मिळाला आणि हा सोहळा अध्यात्म आणि ज्ञानाचा एक मोठा सोहळा म्हणून उदयास आला.
काहींच्या मते, राजा हर्षवर्धन (इ. स. 590 – 647) ने कुंभमेळ्याला संस्थात्मक स्वरूप देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या दानधर्माने आणि धार्मिक आश्रयाने प्रयागराजमधील मोठ्या धार्मिक मेळ्यांचा पाया घातला, असा समज आहे.
कालांतराने, कुंभमेळ्याने विविध संप्रदायांच्या संतांना आणि भाविकांना आकर्षित केले, ज्यामुळे आखाड्यांची (आध्यात्मिक आणि धार्मिक) स्थापना झाली, जी आजही भारताच्या धार्मिक परिप्रेक्ष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आहे. आखाडे हे ज्ञान, साधना आणि साधूसंतांच्या प्रेरक प्रवचनांची केंद्रे म्हणून ओळखले जातात. हे आखाडे प्राचीन भारतीय धार्मिक परंपरांच्या जतनात मोठी भूमिका बजावताना दिसतात.
आखाड्यांची व त्यांच्या पारंपरिक विधींची मोठी उपस्थिती कुंभमेळ्यातील चैतन्यमयी दृश्यात भर घालते. आखाड्याला भेट देणे हा ह्या सोहळ्याचा एक आवश्यक भाग मानला जातो. प्रयागराजमधील 13 आखाड्यांपैकी आम्ही केवळ दोन आखाड्यांना भेट देऊ शकलो – किन्नर आखाडा आणि जुना आखाडा. जुना आखाडा हा आदि शंकराचार्यांनी सातव्या शतकात स्थापन केला, जो सर्वांत जुना आणि सर्वांत आदरणीय मानला जाणारा आखाडा आहे. उपनिषदांच्या शिकवणीच्या प्रसारात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. जुना आखाडा बहुतेक साधू संतांना आकर्षित करतो आणि साधू, विद्वान आणि भाविक यांचा एक चैतन्यमय समुदाय तयार करतो.
जुन्या आखाड्यात आम्हाला त्यांचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरी यांचे प्रवचन ऐकण्याचे भाग्य लाभले, ज्यांनी कुंभमेळ्याची उत्पत्ती, इतिहास आणि त्याच्याशी संबंधित परंपरेचा मंत्रमुग्ध करणारा वृत्तांत सांगितला. आखाड्याला भेट दिल्याने आमचा कुंभानुभव खरोखरच संस्मरणीय ठरला.
महाकुंभ हे भारताची परंपरा आणि संस्कृती यांचे एक अद्भुत दर्शन आहे, जे केवळ श्रद्धा आणि परंपरेने प्रेरित झालेल्या कोट्यवधी भाविकांना आकर्षित करते. 2017 मध्ये कुंभमेळ्यास युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.
महाकुंभमेळ्यातील दृश्ये आणि त्यांचे दैवी स्वरूप ही प्रत्यक्ष पाहण्याची आणि अनुभवण्याची गोष्ट आहे. त्या सोहळ्याबद्दल आणि तेथील आध्यात्मिक अनुभूतीबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतील. कॅमेऱ्यात कैद केलेली छायाचित्रे फार तर कार्यक्रमाचा चित्रमय वृत्तांत सांगू शकतील, परंतु तुम्ही तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून सखोल आध्यात्मिक कायाकल्प अनुभवत नाही, तोवर महाकुंभमेळ्यासारख्या प्रसंगी जी अनुभूती येते ती येऊच शकत नाही आणि ह्या अनुभूतीची तुलना कशाशीच करता येत नाही.
आयुष्यात एकदाच येणाऱ्या ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकले ह्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.