महत्त्व नित्य सूर्योपासनेचे

0
30

योगसाधना – ५३४
योगमार्ग – राजयोग
अंतरंग योग – ११९

  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधनेत इतर तंत्रांबरोबर आसने, कपालभाती, प्राणायाम- सूर्यनमस्कार करणे हितावह आहेच, पण वेळेअभावी हे सर्व शक्य नसेल तर फक्त सूर्यनमस्कार नियमित घातले तर सर्व पैलूंनी आरोग्य सांभाळले जाईल.

वैश्‍विक समाजात प्रत्येक क्षेत्रात पुष्कळ विविधता असते. त्यामुळे लोक विखुरतात. या जनतेला एकत्र आणण्यासाठी विविध व्यक्ती निरनिराळे उपाय करतात- धर्म, वर्ण, वंश, शिक्षण, राजकारण, संस्कृती… अनेकवेळा असे करणार्‍याचा स्वार्थ असतो. त्यामुळे थोडे जण जरी एकत्र आले तरी संपूर्ण समानता दिसत नाही. सुसूत्रता येत नाही.

जंगलात राहणार्‍या जंगली समुदायाला निःस्वार्थपणे एकत्र आणण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आपल्या भारतीय ऋषी-महर्षींनी योजिला तो म्हणजे ‘पंचायतन पूजा’.

  • गणपती (बुद्धी), शिवोपासना (आत्मज्ञान), विष्णू (प्रेम), सूर्य (तेज), अंबा (शक्ती).
    पहिल्या तीन विषयांवर सविस्तर चिंतन आपण मागील अंकात केलेले आहे. आता तेजाची म्हणजे सूर्याची उपासना बघुया. आधी थोडी माहिती, विस्ताराने अभ्यास व सखोल चिंतन करुया.
    सूर्य – म्हणजे भास्कर. त्याची उपासना म्हणजे तेजोपासना. सूर्याकडे पाहिले तर त्याच्या तेजाची कल्पना येते. म्हणून सूर्याकडे बघायचे असेल तर पहाटे व तिन्हीसांजेला ज्यावेळी तेज कमी असते. सुंदर सुंदर रंगसुद्धा त्यावेळीच दिसतात. म्हणून सकाळी तांबडे फुटते तेव्हा त्याची पूजा करायची असते, असे शास्त्रकार सांगतात. त्याचवेळी सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे.
    ज्यांनी या सुंदर सूर्योदयाचा अनुभव घेतला त्यांच्याकडूनच अशा हृदयगम्य घटनेची माहिती मिळेल. एक-दोन वेळा असा प्रातःकाळी उठून सूर्योदय बघितला तर प्रत्येकजण अगदी सकाळी उठून सूर्यदर्शन घेण्यास आतुर बनेल. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी ब्राह्ममूहूर्ताची संकल्पना दिली होती- प्रातःकाळी (३.३० ते ५.००वा.) त्याप्रमाणे उठायचे असा प्रेमळ आग्रह ठेवला होता.
    दुर्भाग्याने अनेकांना याबद्दल माहीत नाही अथवा या गोष्टीचे महत्त्व समजत नाही.
    प्रातःकाळी उठण्याचे फायदे अनेक आहेत…
    १. मन मोहीत करणारे दृश्य सभोवताली दिसते.
    २. स्वतःची सर्व कामं व्यवस्थितरीत्या करण्यास विपुल वेळ मिळतो.
    ३. धार्मिक कार्ये, पूजा अर्चा शांतपणे प्रसन्न वातावरणात संपन्न होतात.
    ४. आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगसाधना, व्यायाम, खेळणे, पोहणे, फिरायला जाणे अशा गोष्टी सहज करू शकतो.
    ५. वाचन करण्यास ही वेळ सर्वांसाठीच अत्युत्तम आहे. विद्यार्थी वर्गाने तर याच वेळात जास्तीत जास्त अभ्यास करायला हवा. यावेळी चित्त एकाग्रता उत्तम असते.
    ६. आजच्या संगणक युगातसुद्धा फायदा आहे कारण सकाळी नेटवर्क तेवढे व्यस्त नसते. दिवस उजाडला व सर्वजण संगणक वापरायला लागले की नेटवर्क मिळणे कठीण होते.
    ७. गृहिणींना सकाळी उठल्यामुळे सर्व कामं घाईविना करणे शक्य होते- स्वयंपाक, न्याहारी, मुलांचे टिफीन्स, वृद्धांची सेवा….
    असे विविध फायदे आहेत ब्राह्ममूहूर्तावर उठण्याचे! ही गोष्ट अगदी सहज शक्य आहे म्हणून शास्त्रकारांनी सूर्योपासनेचा आग्रह धरला.
    सकाळी सूर्याला नमस्कार करताना एक सुंदर प्रार्थना भावपूर्ण रीतीने म्हणायची असते.-
    आदिदेव! नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर |
    दिवाकर! नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते ॥
  • हे आदिदेवा सूर्यनारायणा! मी तुला नमस्कार करतो. हे भास्करा! तू प्रसन्न हो. हे दिवाकरा ! मी तुला नमस्कार करतो. हे तेजस्वी प्रभाकरा! तुला नमस्कार असो.
    सूर्याची विविध नावे- आदिदेव, सूर्यनारायण, भास्कर, दिवाकर, प्रभाकर
    मंत्राचा गर्भितार्थ जाणून घेऊन प्रार्थना म्हटली की विविध पैलूंनी फायदा होतो. सूर्यनमस्काराची फलश्रुती सांगणारीसुद्धा एक प्रार्थना आहे-

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने |
जन्मान्तरसहस्त्रेषु दारिद्य्रं नोपजायते ॥

  • जे लोक सूर्याला दररोज नमस्कार करतात त्यांना हजारो जन्मात दारिद्य्र प्राप्त होत नाही. याचे कारण देवाच्या कृपेने माणसाचे आरोग्य चांगले राहते. व्यक्ती उद्योगी राहते.
    भगवान सूर्याच्या उपासनेत एक मुख्य कार्यक्रम म्हणजे ‘सूर्यनमस्कार’. हे नमस्कार फक्त व्यायाम म्हणून न करता साधना म्हणून केले तर विविध फायदे आपोआप होतात- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व आध्यात्मिक. म्हणून योगसाधनेत सूर्यनमस्कारांना अतिशय महत्त्व आहे.
    सर्वप्रथम सूर्यनमस्कार मंत्र म्हणायचा असतो…

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं |
तत् त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्ट ये ॥

  • हे सूर्यदेवा, जसे भांड्याला झाकण असते, तसे तुझे सोनेरी मंडळ सत्याकडे जाणार्‍या दरवाजावर आहे. ती वाट उघडी कर व मला सत्याकडे ने.
    हा अर्थ साधासोपा झाला. सर्वांना सहज समजण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे व ती म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रत्येक मंत्राला गर्भितार्थ व आध्यात्मिक अर्थ असतो. त्यामागे विशिष्ट हेतू व उच्च तत्त्वज्ञान असते. ते समजून घेणे गरजेचे आहे. थोडा सखोल विचार केला तर लक्षात येईल तो अर्थ म्हणजे – * सत्याचे तोंड सुवर्णाच्या झाकणाने झाकलेले आहे. त्या सत्याचे दर्शन व्हावे म्हणजे सत्याचा अनुभव यावा म्हणून मी सत्यधर्मी (सत्यसाधक), तुला पूषणाला (बुद्धीचे पोषण करणारा सूर्य) प्रार्थना करीत आहे. या अर्थावर चिंतन केले असता लक्षात येते की सूर्य ही तेजाची देवता आहे. जो कुणी सत्याच्या मार्गाने जाण्याची इच्छा ठेवतो त्याला तेजाची म्हणजे सामर्थ्याची अत्यंत गरज असते.
    आपण अनेकवेळा ऐकतो, वाचतो…* सत्यमेव जयते.
    पण तत्त्ववेत्त्यांच्या मताप्रमाणे * सत्य सामर्थ्यमेव जयते… हे जास्त तर्कशुद्ध आहे.

याचे कारण म्हणजे विश्‍वाचा इतिहास बघितला तर सत्याने वागणार्‍या सर्वांना सामर्थ्याची गरज पडलेली आहे. भारतातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे – सत्यवादी राजा हरीश्चंद्र.
महर्षी विश्वामित्रांना सामोरे जाण्यासाठी राजाने सत्याचाच आश्रय घेतला व शेवटी विजयी झाले. विश्वाच्या इतिहासातसुद्धा अशी विविध उदाहरणे आहेत. त्यासाठीच सूर्यनमस्कारांच्या रूपाने सूर्यसाधना करायची असते.

आपल्या भारतमातेचे, भारतीय संस्कृतीचे हेच दुर्भाग्य आहे की असा अभ्यास आपण करत नाही. त्यामुळे सत्य मार्गाने जाण्याची हिम्मत आपल्याला नसते आणि सहज आपण असत्याचा आसरा घेतो. दररोजच्या व्यवहारात अशी उदाहरणे पावलोपावली सापडतात. उलट जे सत्याने जाण्याचा प्रयत्न करतात त्यांची आपण मस्करी, उपेक्षा, अवहेलना करतो. त्यांना नकारात्मकतेकडे वळवतो व असत्य मार्गाने जाण्यास भाग पाडतो. तसा आग्रह धरतो.

सूर्यनमस्कारामध्ये सर्व प्रकारची आसने येतात- उभे राहून, खाली बसून, पोटावर झोपून तसेच शरीराचे विविध भाग व्यवस्थित ताणून धरायचे असतात. त्यामुळे स्नायूंना फायदा होतो. सर्व बाजूंनी हालचाल केल्यामुळे सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच रक्ताभिसरण सर्व शरीरात सुंदर रीतीने प्रवाहित होते. हृदयाचे ठोके थोड्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.

शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कारामध्ये श्‍वासावर लक्ष देण्याची सूचना असते. त्यामुळे पूरक (श्‍वास आत), रेचक (श्‍वास बाहेर)- आलटून पालटून करायचा असतो- अगदी थोडा वेळ. त्यामुळे दोन्ही फुप्फुसे कार्यरत होतात. प्राणवायू भरपूर प्रमाणात रक्तात मिसळतो. प्राणशक्ती वाढते.

योगसाधनेत इतर तंत्रांबरोबर आसने, कपालभाती, प्राणायाम- सूर्यनमस्कार करणे हितावह आहेच पण वेळेअभावी हे सर्व शक्य नसेल तर फक्त सूर्यनमस्कार नियमित घातले तर सर्व पैलूंनी आरोग्य सांभाळले जाईल. असे हे सूर्यनमस्कार १२ ते १४४ पर्यंत घातले जातात.
अनेक योगसाधक सूर्यनमस्कार घालतात पण या पद्धतीने घातले तर जास्त फायदेशीर ठरेल.