मलेशियाचे पर्यटनमंत्री 21 पासून गोवा दौऱ्यावर

0
20

>> मलेशिया-गोव्यात पर्यटनासंबंधी करार होणार

मलेशियाचे पर्यटनमंत्री खैरूल फिरदौस बिन अकबर खान हे 21 ते 23 ऑगस्ट अशा तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याबरोबर मलेशिया व गोवा यांच्यात पर्यटनाला चालना देण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा करण्याबरोबरच समझोता करारावरही सह्या करणार असल्याची माहिती पर्यटन खात्यातील सूत्रांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

खैरुल फिदौस बिन अकबर खान हे 19 ते 26 ऑगस्ट या दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी ते गोव्याबरोबरच मुंबई व कोचिनला भेट देऊन तेथील राजकीय नेत्यांशीही पर्यटनासंबंधी चर्चा व समझौता करार करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. खान हे आपल्या गोवा दौऱ्याच्यावेळी 22 अथवा 23 ऑगस्ट रोजी पर्यटनमंत्री रोहन खंवटे व पर्यटन खात्यातील अन्य अधिकारी मंडळीशी पर्यटनाविषयीची चर्चा करणार असून यावेळी दोन्ही देशांमध्ये समझोता करारही होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मलेशियाच्या पर्यटनासाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि दरवर्षी भारतातून 12 हजारांच्यावर पर्यटक मलेशियाला भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर मलेशियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी मलेशियाचे पर्यटनमंत्री 19 ते 26 ऑगस्ट या दरम्यान भारतीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते गोव्यालाही भेट देणार असल्याची माहिती गोवा पर्यटन खात्यातील सूत्रांनी काल दिली. 2019 ते 2022 ह्या काळात 12,19,656 भारतीय पर्यटकांनी मयेशियाला भेट दिली होती.