मलेरियाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद गोव्यात आजपासून

0
105

तापमान वाढीमुळे जगभरात संबंधित रोगांत बदल
तापमानवाढीमुळे जगभरात मलेरिया व अन्य साथींच्या रोगांत बदल होऊ लागला असल्याचे इंडियन सोसायटी फॉर मलेरिया ऍण्ड अदर डिसिजिस या संघटनेतील तज्ज्ञ डॉक्टर शिवलाल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.वरील संघटनेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजिस या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ‘मलेरिया व अन्य साथींचे रोग’ या विषयावरील एक आंतरराष्ट्रीय परिषद शुक्रवारपासून (आज) गोव्यात सुरू होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पणजीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यानी वरील माहिती दिली.
गेल्या १० वर्षांच्या काळात देशातील मलेरिया रुग्णांची सरासरी संख्या २० लाखांवरून १० लाखांवर आली आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले. देशात झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ व अरुणाचल प्रदेश येथे मलेरियाचा खूपच फैलाव असल्याचे ते म्हणाले.
मलेरियाविषयी अधिक माहिती देताना यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चच्या डॉ. नीना वालेचा म्हणाल्या की पूर्वी फाल्सिपेरम मलेरिया हाच घातक मानला जायचा. पण आता वायवेक्स मलेरिया झालेले रुग्णही दगावू लागले आहेत. पण हा बदल आता झालेला आहे की पूर्वीही वायवेक्सने रुग्ण मृत्युमुखी पडायचे हे नक्की कळू शकले नसल्याचे त्या म्हणाल्या. पूर्वी आतासारख्या अचूक निदान करण्यासाठीच्या चाचण्या नव्हत्या. आता त्या उपलब्ध असल्याने कुठल्या रुग्णाला फाल्सिपेरम व कुठल्या रुग्णाला मलेरियाची बाधा झालेली आहे ते तात्काळ कळू शकते. त्यामुळे तेव्हा मृत्यू पावलेल्या रुग्णाला नेमका कुठल्या प्रकारचा मलेरिया झाला होता ते कळू शकत नव्हते असे त्या म्हणाल्या. २००४-२००५ पर्यंत भूतान व नेपाळ या देशांत डेंग्यु नव्हता. पण आता तापमान वाढीनंतर त्याचा त्या देशातही फैलाव झाल्याचे यावेळी डॉ. शिवलाल यानी सांगितले. वरील परिषदेला ४०० प्रतिनिधी येणार असून सात देशांतील ३० प्रतिनिधींचाही त्यात समावेश असणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले. गोव्यातील मलेरिया केंद्राचे डॉ. अश्‍विनी कुमार हेही पत्रकार परिषदेला हजर होते.