मुंबई
दीपक मलिकच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने मुंबईत खेळविण्यात आलेल्या दृष्टिहिनांच्या दुरंगी टी-२० क्रिकेट मालिकेतील दुसर्या लढतीत श्रीलंकेवर ३४ धावांनी मात करीत २-० अशी आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षट्कांत केवळ २ गडी गमावत २३६ अशी धावसंख्या उभारली. दीपक मलिकने १०६ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याला चांगली साथ देताना सुनील रमेशने नाबाद ६६ धावा जोडल्या. आर. व्यंकटेश्वराने ४७ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात खेळताना लंकन संघाला ९ गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावांपर्यंत मजल मारता आली. के. सिल्वाने ६० धावा जोडल्या. भारतातर्फे कर्णधार अजय रेड्डीने १८ धावांत २ तर सुनील रमेशने २० धावांत २ गडी बाद केले. तिसरा सामना भोपाळ येथे होणार असून दोन्ही संघांनी प्रस्थान केले आहे.