राज्यात मलनिस्सारण सुविधा उपलब्ध असलेल्या भागात 100 टक्के मलनिस्सारण जोडण्यांसाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना एका उच्चस्तरीय बैठकीत काल दिले. राज्यात अनेक ठिकाणी मलनिस्सारण सुविधा उपलब्ध केलेली आहे. तथापि, मलनिस्सारण जोडण्या घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमीच आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी काल सार्वजनिक बांधकाम खाते, मलनिस्सारण साधन सुविधा विकास मंडळ गोवा आणि जायका प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात सुरू असलेल्या मलनिस्सारण योजनांचा आढावा घेतला. तसेच, सांडपाणी टँकरचे सक्तीने जीपीएस टॅगिंग पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.