>> मेघना सावर्डेकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात होणार सुनावणी
बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित मर्सिडीज कारचालक श्रीपाद ऊर्फ परेश सिनाय सावर्डेकर याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी काल फोंडा येथील न्यायालयाने केली. दरम्यान, मर्सिडीझ कारच्या मालक मेघना सिनाय सावर्डेकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर फोंडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे.
म्हार्दोळ पोलिसांनी बाणस्तारी येथील अपघातप्रकरणी संशयित श्रीपाद ऊर्फ परेश सिनाय सावर्डेकर याला अटक केल्यानंतर त्याला 8 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत पूर्ण झाल्यावर मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी केली. त्याला कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवले आहे.
या प्रकरणातील मर्सिडीज कारच्या मालक मेघना सिनाय सावर्डेकर हिला अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे.
न्यायासाठी जुने गोवेत मेणबत्ती फेरी
बाणस्तारी अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी चुकीची माहिती दिली. या अपघाताचा तपास करण्यासाठी म्हार्दोळ पोलीस निरीक्षक असमर्थ आहेत. त्यामुळे या अपघाताचे तपास काम क्राईम ब्रँचकडे सोपवावे, अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी काल केली. फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली बाणस्तारी अपघातात बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जुने गोवेत काल मेणबत्ती फेरी काढण्यात आली.