मर्सिडीजचालकाची जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धावाधाव

0
22

>> अर्ज दाखल; लवकर सुनावणीची विनंती

बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी श्रीपाद ऊर्फ परेश सिनाई सावर्डेकर याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल जामिनासाठी अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती त्याने न्यायालयाला केली आहे.

बाणस्तारी पुलाजवळ गेल्या रविवारी संध्याकाळी आठच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात तिघांचा बळी गेला होता, तर तिघे गंभीर जखमी झाले होते.

म्हार्दोळ पोलिसांनी या अपघात प्रकरणी परेश सावर्डेकर याला सोमवारी पहाटे अटक करून दोन दिवसांचा रिमांड घेतला होता. त्यानंतर फोंडा येथील न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ बुधवारी केली. त्याचा जामीन अर्ज फोंडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे त्याने आता मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला असून, या अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे.