- अनुप प्रियोळकर
‘त्रिंबक सदन’ ही जुनी झालेली इमारत आता नावीन्यपूर्ण सुखसोयींनी व अत्यंत देखण्या स्वरूपात उभी राहत आहे. त्या इमारतीवर ‘पुलं’चे छायाचित्र, तसेच त्यांच्या सहीच्या स्वरूपात शिल्पही रेखाटले जाणार आहे. परंतु भाईकाकांचे खळखळते हसणे, इतरांनाही मनापासून हसवणे, त्यांच्या आईने कोकणी भाषेत मारलेली ‘आयलो रे पुता?’ ही हाक, हे सर्व काळाच्या पडद्याआड जाणार आहे, ही खंत कायम राहील.
‘त्रिंबक सदन, त्रिंबक को-ऑप. हाउसिंग सोसायटी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई’ हा पत्ता डोळ्यांसमोर येताच कुठल्याही मराठी माणसाच्या चटकन लक्षात येईल की हे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व श्री. पु. ल. देशपांडे यांचे निवासस्थान! बहुतांश सर्वपरिचित असलेल्या साहित्यिक, नाटककार, संगीतकार अशा अवलियांच्या निवासस्थानांमुळे मुंबईतील पार्ले हे ठिकाण लोकांच्या जास्त परिचयाचे. पार्ल्याला पार्लेश्वराचे देऊळ (शंकराचे देऊळ) आहे, पार्ले टिळक विद्यालय आहे, मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे. अशा अनेक वास्तूंमुळे हा परिसर जेवढा परिचित आहे, त्यात किंचित वरचढ म्हणजे ‘पुलं’चे पार्ले येथील निवासस्थान आहे.
सन 1927 साली त्यांचे आजोबा त्र्यंबक देशपांडे यांनी तळमजला व त्यावर एक मजला अशा स्वरूपाचे निवास निर्माण केले. पुढे होत गेलेल्या बदलाने व कौटुंबिक व्यक्तींच्या मागणीमुळे कालानुरूप त्याचे रूपांतर चार मजली इमारतीत झाले. ते वर्ष होते 1984.
आमची व देशपांडे कुटुंबाची पहिली ओळख झाली ती मंगेशी येथे. सन 85-86 च्या दरम्यान एका दुपारी वयाने ज्येष्ठ अशी, किंबहुना माझ्या आजीच्या वयाची स्त्री व तिच्याबरोबर तिचा मुलगा अशी दोघंजणं मंगेशी देवळाच्या प्रांगणात प्रवेश करती झाली. वेळ दुपारची. गावच्या बसस्थानकापासून देवळापर्यंत चालत आल्याने आजींना चक्कर आली. त्यांच्या मुलाने मदतीसाठी प्राकारात उपस्थित असलेल्या आम्हा लोकांना साद घातली. आम्ही तेथे जवळच होतो. लगेच तेथे असलेल्या सर्वांनी प्राथमिक उपचार करून त्यांना योग्य ती मदत केली. घडलेल्या प्रसंगाच्या काही वेळाने त्या दोघांना त्यांचे नाव विचारण्यात आले, त्यावरून ही व्यक्ती कोण हे सर्वांच्या लक्षात आले. आम्ही सर्वजण अचंबित झालो. त्या होत्या ‘पुलं’च्या मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे व त्यांचा मुलगा श्री. उमाकांत देशपांडे. त्या क्षणापासून या कुटुंबाशी नाते अधिक दृढ होत गेले व आज त्यांचा नातू जयंत देशपांडे व कुटुंबीय यांचे आमच्याशी असलेले नाते कौटुंबिक जिव्हाळ्याचे बनले आहे. देशपांडे कुटुंबाचे कुलदैवत श्री. मंगेश. त्यांच्या आईची देवावर फार श्रद्धा. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय मंगेशीला आवर्जून येत असत व अजूनही वार्षिक उत्सवाला यायची प्रथा जोपासून आहेत. ‘पुलं’नी एका गप्पागोष्टीत 1942 मध्ये त्यांच्या लग्नानंतर आईच्या आग्रहाखातर मंगेशीस येऊन पाच दिवसांचा मुक्काम केल्याचे आवर्जून सांगितले होते. त्यावेळचा तिकडचा तो परिसर, पहाटेचा चौघडा, संध्याकाळचे सनईवादन, या सर्व गोष्टींचा त्यांनी मनमुराद आस्वाद घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. श्री मंगेश हे त्यांचे कुलदैवत, त्यानिमित्ताने घडून आलेली उभय कुटुंबाशी ओळख ही आम्हाला मिळालेली एक अनमोल भेट असे मी मनापासून मानतो.
भाईकाकांचे द्वितीय बंधू श्री. उमाकांत देशपांडे हे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत देवदर्शन व हवापालटासाठी मंगेशीला राहायला यायचे. त्यांचा आठ-दहा दिवसांचा मुक्काम असायचा. ते देवळात बसून येणाऱ्या-जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांचे अवलोकन करीत. त्यांचा चेहरा ‘पुलं’शी मिळताजुळता असल्याने लोकांची गफलत व्हायची व ते त्यांना भाईकाका समजून कुतूहलाने बघायचे. त्यांच्याकडे बोलण्याचा प्रयत्न करायचे. उमाकांतजीना लोकांना सांगावे लागायचे की मी ‘पुल’ नसून त्यांचा भाऊ उमाकांत आहे. शरीर साथ देईपर्यंत त्यांनी मंगेशीला येऊन हवापालट करणे व आपले जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे ही प्रथा चालू ठेवली.
सन 1988 ते 94 या काळात मी ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’चा सचिव- विश्वस्त असल्याने संस्थेच्या कामासाठी मला अनेकदा मुंबईला जावे लागे. त्यावेळी माझा हमखास मुक्काम ‘त्रिंबक सदन’मध्ये किंवा माझा अंधेरी येथील मित्र तेजस मुजुमदार यांच्या घरी व्हायचा. अधिक तर मी पार्ल्यालाच राहायचो. तिथून बांद्य्राला नारायण आठवले यांच्या निवासस्थानी जाणे व इतर कार्यालयांच्या भेटीसाठी पार्ले हे ठिकाण मला सोयीस्कर व्हायचे.
‘त्रिंबक सदन’च्या पहिल्या मजल्यावर भाईकाकांची सदनिका होती. भाईकाका पुण्यात राहत असल्यामुळे आई त्या सदनिकेत राहायच्या. त्याच मजल्यावर त्यांचे बंधू चित्रकार श्री. रमाकांत देशपांडे व दुसऱ्या मजल्यावर त्यांचे भाऊ श्री. उमाकांत यांचे कुटुंब राहायचे. माझी राहायची व्यवस्था उमाकांतकडे असायची. मी गेल्या गेल्या आईंना हाक देऊन दुसऱ्या मजल्यावर जायचो. उमाकांतला आम्ही सर्व ‘दादा’ म्हणून हाक मारायचो. दादाकडून मला भाई मुंबईला ‘एनसीपीए’त आहेत की पुण्यात ते कळायचे. जर भाई मुंबईला असले तर सुनिता वहिनींची परवानगी घेऊन मी भेटायला जायचो. मी आलो हे कळल्यावर भाई आपल्या खोलीतून बैठकीच्या खोलीत यायचे. मग आमच्या गोव्यातील अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. गोव्यात त्यांचे साहित्य व संगीत क्षेत्रात आवड असलेले, जिव्हाळ्याचे असे संबंध असलेले मित्र होते, त्या सर्वांची ते आवर्जून विचारपूस करत. थोड्याशा त्यांच्याशी साधलेल्या संवादाची शिदोरी घेऊन व उभयतांना नमस्कार करून मी निघायचो. पार्ल्याला आल्यावर भाईंशी झालेली भेट त्यांच्या आईला सांगितल्यावर त्या प्रफुल्लित व्हायच्या. त्या मूळच्या कारवारच्या असल्याने आमचे दोघांचे संभाषण कोकणीत व्हायचे.
1994 हे भाईंचं अमृतमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने मुंबई व पुण्यात त्यांच्या नावलौकिकाला साजेसे अनेक कार्यक्रम झाले. एका कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिलो. दुसऱ्या दिवशी त्यांच्या आईने मला आपल्या खोलीवर बोलावून काल झालेल्या कार्यक्रमात भाई काय बोलला हे वाचून दाखवायला सांगितले. हे ऐकताना त्या अधिक आनंदी व समाधानी दिसत होत्या. मी तेथून गोव्याला येण्यासाठी निघालो की त्यांचा पहिला प्रश्न, ‘आता कधी?’ ‘त्रिंबक सदन’मधल्या अशा अनेक आठवणी माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात अढळ स्थान प्राप्त करून बसल्या आहेत व त्या कायम राहतील.
संकुलांची वाढलेली मागणी व जुन्या इमारतींना नवीन साज देण्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतात नवीन वास्तुरचनेची कामे जोरात चालू आहेत. त्यामध्ये नामांकित व्यक्तींची निवासस्थाने नव्या निर्मितीसाठी पुनर्बांधणीचा एक भाग बनलेली आहेत. नव्या रूपात व सर्व सुखसोयींनी युक्त अशा इमारती आता उभ्या राहणार आहेत. 1927 साली ‘पुलं’चे आजोबा त्रिंबक देशपांडे यांनी उभ्या केलेल्या लहानशा वास्तूत ‘पुलं’सारख्या मराठी विश्वाला गवसणी घालणाऱ्या एका महान व्यक्तीचा जन्म झाला. कालांतराने झालेला बदल व संकुलांची मागणी यामुळे याच भूमीवर चार मजली इमारत उभी राहिली. ‘पुलं’च्या अलौकिक व अद्वितीय अशा वेगवेगळ्या कलांमुळे ही वास्तू व तो परिसर अनेकांना आनंद द्यायचा. एकंदरीत त्यांना प्राप्त झालेल्या विद्वत्तेमुळे ‘त्रिंबक सदन’ हे हसतं-खेळतं संकुल म्हणून दिमाखाने उभं आहे. या परिसराचे चैतन्यमय स्वरूप अनुभवण्याची संधी अधिकाधिक मराठी माणसांना प्राप्त झाली. ही जुनी झालेली इमारत आताच्या नावीन्यपूर्ण सुखसोयींनी व अत्यंत देखण्या स्वरूपात उभी राहत आहे. त्या इमारतीवर भाईकाकांचे छायाचित्र, तसेच त्यांच्या सहीच्या स्वरूपात शिल्पही रेखाटले जाणार आहे. किंबहुना नवीन तयार होणाऱ्या वास्तूचे नाव ‘पुलकित त्रिंबक सदन’ असेही होईल. ही वास्तू देशपांडे कुटुंबाला व इतर रहिवाशांना सुखसमृद्धीचा वर्षाव करणार यात तीळमात्र शंका नाही. परंतु भाईकाकांचे खळखळते हसणे, इतरांनाही मनापासून हसवणे, त्यांच्या आईने कोकणी भाषेत मारलेली ‘आयलो रे पुता?’ ही हाक, घडलेले प्रसंग मानवी स्वरूपात परत घडून येणार नाहीत, ही खंत कायम राहील. या सर्व गोष्टींचा साक्षीदार होण्यासाठी व त्या इमारतीला डोळे भरून पाहण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह दोन दिवस श्री. जयंत देशपांडे व त्यांची पत्नी सौ. दिपा यांच्याबरोबर घालविले. या इमारतीला डोळे भरून साठवून घेतले व आम्ही उभयतांनी ‘त्रिंबक सदन’चा निरोप घेतला. जड पावलांनी निघताना कंठ दाटून आला होता… डोळे पाणावले होते. कालाय तस्मै नमः।