- डॉ. सोमनाथ कोमरपंत
मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात मराठीचे नामवंत प्राध्यापक, मराठी विश्वकोशाचे कुशल संपादक, जीवन आणि साहित्य यांचा साकल्याने अनुबंध शोधणारे मर्मज्ञ समीक्षक, विचारवंत, सृजनशील साहित्यिक म्हणून प्रा. रा. ग. जाधवसरांनी ख्याती मिळवली होती.
प्रा. रा. ग. जाधवसरांशी गाठीभेटी तशा फारशा झाल्या नाहीत. पण ज्या झाल्या त्या उत्कट स्वरूपाच्या झाल्या. त्यामुळे ते अत्यंत जवळचे वाटायला लागले. एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थिदशेत त्यांचे समीक्षाग्रंथ क्वचितच वाचनात आले. ऐन आणीबाणीत झालेल्या कर्हाडच्या साहित्यसंमेलनातील एका परिसंवादात त्यांचे व प्रा. नरहर कुरुंदकर यांचे विचार ऐकले. प्रभावित झालो. चौगुले महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करायला सुरुवात केल्यानंतर संदर्भग्रंथ म्हणून प्रा. रा. ग. जाधवसरांच्या ग्रंथांकडे वळलो. त्यांचे लेखन मला आवडायला लागले. ‘फसलेला सृजनशील लेखक समीक्षालेखनाकडे वळतो’ किंवा ‘सृजनशील लेखक व समीक्षक यांचे नाते विळ्या-भोपळ्याचे असते’ असे अपसमज डोक्यात जाऊन बसले होते, ते प्रा. जाधवसरांचे तेव्हाचे आणि त्यांच्या परिणतावस्थेतील विविधांगी लेखन वाचून दूर झाले. एवढेच नव्हे तर सुदैवाने त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांची दीर्घकविता प्राचार्य म. द. हातकणंगलेकर व वसंत वणकुट्रे यांच्या संपादकत्वाखाली निघणार्या ‘उगवाई’ मासिकात प्रसिद्ध झाली होती. म्हणजेच त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेला सृजनात्मक अंग होते. एकांकिका, नाटक आणि ललित निबंध हे वाङ्मयप्रकार त्यांनी हाताळले होते.
अभावग्रस्त परिस्थितीत प्रा. रा. ग. जाधव यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना पहिल्या टर्मपुरती कॉलेजतर्फे त्यांना दरमहा वीस रुपये शिष्यवृत्ती मिळाली. एस.एस.सी.च्या गुणपत्रिकेनुसार त्यांची निवड करण्यात आली होती. पुढे दहा वर्षे त्यांनी एस.टी. महामंडळात कारकुनी केली. शिक्षणासाठी त्यांना खडतर साधना करावी लागली. समांतरपणे त्यांनी साहित्याचा आणि अन्य ज्ञानशाखांचा भरपूर व्यासंग केला. साहित्यसंस्कृतीकडे पाहताना तिच्यातील सामाजिक अन् सांस्कृतिक संदर्भ शोधण्याची संथा त्यांना येथूनच मिळाली. प्रा. जाधवसरांची अध्यापनक्षेत्रातील कारकीर्द उज्ज्वल स्वरूपाची ठरली. दहा-अकरा वर्षे मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये, अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात आणि औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. आमचे एस. एस. नाडकर्णीसर त्यांच्या अध्यापनशैलीविषयी नेहमी गौरवाने बोलायचे. वीस वर्षे वाईच्या विश्वकोशमंडळात मानव्य विद्यांचा प्रमुख संपादक या नात्याने त्यांनी धुरा सांभाळली. २०००-२००२ या काळात ते विश्वकोशमंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख संपादक झाले. पुणे विद्यापीठात एम.ए., एम.फिल.चे एन. एन. डी. टी. विद्यापीठातील अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. पीएच.डी.चेही ते परीक्षक होते.
पुण्यात स्थायिक झाल्यानंतर ‘साधना ट्रस्ट’चे एक विश्वस्त या नात्याने साधना परिवाराशी त्यांचा संबंध आला. हा त्यांचा अत्यंत खडतर कालखंड होता. अशावेळी साधना परिवाराने त्यांना खूप मोठा आधार दिला. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड सातवा’ या ग्रंथाच्या संपादनाचे त्यांनी काम केले. प्रतिकूलतेतही उत्कृष्ट काम कसे करता येते याचा आदर्श त्यांनी या खंडाच्या कामाच्या रूपाने घालून दिला.
मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात मराठीचे नामवंत प्राध्यापक, मराठी विश्वकोशाचे कुशल संपादक, जीवन आणि साहित्य यांचा साकल्याने अनुबंध शोधणारे मर्मज्ञ समीक्षक, विचारवंत, सृजनशील साहित्यिक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होतीच. परंपरेचे परिशीलन केले होते; पण त्याचबरोबर जीवनातील तसेच साहित्यातील प्रवाहांकडे अन् अंतःप्रवाहांकडे स्वागतशीलपणे पाहण्याची दृष्टी त्यांच्यापाशी होती. माणूस म्हणून ते किती मोठे होते हे सांगण्याची आवश्यकता नाही. गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागात ‘आधुनिक परिप्रेक्ष्यातून तुकारामदर्शन’ या विषयावर चर्चासत्र ठेवण्यात आले. त्यात बीजनिबंधाचे वाचन डॉ. जाधवसरांनी केले. त्यावेळी विद्यापीठ परिसरातील माझ्या निवासात ते येऊन गेले. मोठ्या माणसांबरोबर त्यांना संवाद करणे आवडे; त्याचप्रमाणे छोट्या मुलांमध्ये ते रमत असत. माझ्या मुलीला त्यांनी तिच्या आवडत्या छंदाविषयी विचारले. तिने आपल्या चित्रकलेच्या छंदाविषयी सांगितले. त्यांनी तिची चित्रे दाखवायला सांगितले. त्यावेळी ज्या अकृत्रिम शैलीत त्यांनी तिला ज्या ‘टिप्स’ दिल्या, त्या ऐकून मी थक्क झालो. तीदेखील प्रा. जाधवसरांची अजूनही आठवण काढते. असा हा माणसांमध्ये रमणारा साधा माणूस!
प्रा. रा. ग. जाधवसरांची ग्रंथसंपदा विपुल आहे. जवळजवळ चाळीस पुस्तके त्यांनी लिहिली. ती विविधांगी स्वरूपाची आहेत. प्राधान्याने त्यांत समीक्षाग्रंथ आहेत. २००४ साली औरंगाबाद येथे झालेल्या ७७ व्या अ. भा. मराठी साहित्यसंमेलनात त्यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. तेव्हा महाराष्ट्रात तसे महाराष्ट्राबाहेरही त्यांचे प्रचंड स्वागत झाले. पणजीलाही ‘गोमंतक साहित्य सेवक मंडळा’तर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. ‘प्रतिभा प्रकाशन’चे अरुण पारगावकर यांनी त्यांच्यावरचा गौरवग्रंथ संपादित केला. ‘प्रा. रा. ग. जाधव – गौरविका’ ही १९९८ मध्ये प्रकाशित झाली. ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे त्यांच्या निवडक समीक्षालेखांचा संग्रह प्रसिद्ध केला. २०१३ मध्ये त्यांनी आयुष्याच्या सांजपर्वात ‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’ या पुस्तकातून आपल्या असंख्य रसिक वाचकांसमोर हृदयसंवाद केला. त्यात अनौपचारिकता आहे, पण त्याचबरोबर आयुष्यभराच्या चिंतनाचे नवनीतदेखील आहे. अर्थात ते त्यांना वृत्तिगांभीर्याने सांगणे भाग पडलेले आहे. तेही रुक्षता टाळून. आपल्या मनोधर्मातील समाजप्रबोधनाची प्रेरणा ते विसरू शकत नाहीत. चार भागांत विभागलेले त्यांचे हे लेखन वाचणे म्हणजे साहित्याचा चिरंतन उत्सव… त्यांचेच बोट धरून तो अनुभवण्यासारखा आहे. त्यांच्या लेखनसंपदेचा परिचय करून देणे हा खरे पाहता स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. परंतु प्रा. रा. ग. जाधवसरांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे म्हणजे त्यांचा अखंडित ध्यास आणि अभ्यास समजून घेणे. मराठी साहित्यसमीक्षेत सांस्कृतिक पर्यावरणाची संकल्पना त्यांनी पुढे आणली. ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ हा महत्त्वपूर्ण निबंध त्यांनी लिहिला. त्यातून या संकल्पनेचे सूतोवाच त्यांनी केले. सैद्धान्तिक समीक्षेला जवळ जाणारा हा साहित्यविचार आहे. हेच अंतःसूत्र पकडून प्रतिभावंतांची तीव्र तडफड कशासाठी असते याचा प्रा. जाधव यांनी घेतलेला शोध महत्त्वाचा वाटतो.
‘‘प्रतिभावंत आपल्या कलहांना वाचा फोडतो आणि ते वाङ्मय ठरते. सामाजिक मानव एखाद्या विचारप्रणालीच्या रूपाने, संघटनेच्या किंवा कार्यक्रमाच्या रूपाने आपल्या अंतःकलहाला व्यक्त करतो. हे दोन मानव असे आहेत की ज्यांना आविष्काराच्या गूढ शक्तींचा लाभ झालेला आहे. आणि म्हणून त्यांच्या कृती या त्यांच्यापुरत्या मर्यादित न राहता समाजापुढे येतात, त्यात मग समाजाला उलथापालथ दिसते, प्रस्थापिताला उद्ध्वस्त करण्याची प्रक्षुब्धता दिसते. या आविष्कारांना यथार्थ दृष्टीने पाहावयाचे तर त्यांना नीटपणे समजावून घेता आले पाहिजे. यासाठी ज्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर अराजकी आविष्कार प्रकट होतात, त्या सांस्कृतिक परिस्थितीचे भान ठेवावे लागते. एखाद्या देशात एखादा ज्ञानेश्वर, एखादा तुकाराम, एखादा कुशवसुत, एखादा सॉल्झिनित्सिन, एखादा नामदेव ढसाळ का निर्माण होतो, हे केवळ त्यांच्या साहित्याचा साहित्य म्हणून अभ्यास करून कळणार नाही, तर ज्या अंतःकलहाला हे प्रतिभावंत सामोरे गेलेले त्या अंतःकलहाची बाजूची लक्षात घ्यावी लागेल.’’
(साहित्य आणि सामाजिक संदर्भ/अराजक आणि साहित्य)/पृ. ७/कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, १९७५)
‘ललित वाङ्मयाची सुखदायकता’ आणि ‘ललित साहित्याची क्रांतिप्रवणता’ कोणत्या प्रकारची असते हे त्यांच्या या दोन लेखांतून त्यांच्याच शब्दांत समजून घ्यायला हवे. ‘आनंदाचा डोह’मधून त्यांनी तुकारामांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध अभ्यासनीय आणि अंतर्मुख करणारा आहे. ‘निळी पहाट’ या ग्रंथातून त्यांनी साठोत्तरी कालखंडात जन्मास आलेल्या दलित साहित्यातील सशक्त जीवनानुभूतीची मर्मदृष्टीने मीमांसा केली आहे. दलित संवेदनशीलतेच्या आविष्कारामुळे आधुनिक भारतीय साहित्यातील मानवताधर्माची कक्षा विस्तृत होण्यास सहाय्य झाले ही वस्तुस्थिती आहे.
प्रा. रा. ग. जाधव यांच्या अभ्यासदृष्टीला कोणताही विषय वर्ज्य नाही. ‘साठोत्तरी मराठी कविता व कवी’ हा त्यांचा ग्रंथ नवकवितेच्या अंतःप्रवाहांचे आकलन होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. सुरुवातीला त्यांनी साठोत्तरी मराठी कवितेतील नव्या जाणिवांचे स्वरूप विशद केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अरुण कोल्हटकरांच्या आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितेतील अन्वयार्थ उलगडून दाखविला आहे. चित्रे यांच्या कवितेवरील दोन लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. एक लेख त्यांच्या दुर्बोध वाटणार्या कवितांचा परामर्श घेणारा आहे. शेवटचा लेख मराठी कवितेतील महानगरीय संवेदन समजावून देणारा आहे. ‘आगळीवेगळी नाट्यरूपे’ या ग्रंथात स्वातंत्र्योत्तर कालखंडातील लक्षणीय नाट्यकृतीतील आशयसूत्रांचा परामर्श प्रा. जाधव यांनी घेतला आहे. चि. त्र्यं. खानोलकरांच्या ‘एक शून्य बाजीराव’ या नाटकापासून व्यस्ततावाद मराठी रंगभूमीवर अस्तित्वात आला म्हणून त्यांनी मराठी रंगभूमीवरील या बदलत्या प्रवाहाचा परामर्श घेतला आहे. ‘शोकात्म आणि विनोदात्म’ या लेखात मात्र पूर्वीच्या कालखंडातील ‘एकच प्याला’ या नाटकाविषयीचे विवेचन केले आहे.