- – माधव बोरकर
गोमंतकीय मराठी कवितेला काही शतकांची परंपरा आहे. या काळात अनेक गोमंतकीय कवींनी काव्यलेखन केले. हे लेखन विपूल म्हणता येत नाही. या कवितेचा प्रभाव एकूण मराठी कवितेवर झालेला दिसत नाही. ‘मराठी कविता ः प्राचीन कालखंड’ (११५०-१८४०) या वा. रा. ढवळे व व. दि. कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या संकलनात एकाही गोमंतकीय कवीचा अंतर्भाव केलेला दिसत नाही. अपवाद फक्त सोहिरोबानाथांचा. ‘गोमंत शारदा’ (१५२६-१९६५) या महत्त्वाच्या गोमंतकीय मराठी कवितेचे संकलन-संपादन रामदास प्रभू यांनी केले आहे. आपल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेत ते लिहितात ः ‘गोमंतकातील मराठीची परंपरा थेट ज्ञानेश्वरीच्या काळापर्यंत मागे जाते.’ तथापि, या दीर्घ परंपरेची नोंद म्हणावी तशी मराठी कवितेच्या इतिहासात घेतलेली दिसत नाही. गोमंतकीय मराठी कवितेचे संकलन प्रसिद्ध व्हायला १९३० साल उजाडावे लागले. ‘काव्यकुंज’ हा शिवा फटू पै आंगले यांनी संपादित केलेला गोमंतकीय कवींच्या निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्या काळच्या ज्येष्ठ कवींबरोबर बा. भ. बोरकर व दामोदर अच्युत कारे या विशीत असलेल्या कवींच्या कविता या संग्रहात वाचायला मिळतात. बोरकर अखंड कविता लिहीत राहिले, मात्र कारे यांचे काव्यलेखन मंदावत गेले.
कारे, बोरकर व शंकर रामाणी यांच्यामध्ये एका पिढीचे अंतर आहे. या दोन कविद्वयानंतर रामाणी यांचे नाव घ्यावे लागते. त्यांच्या काव्यलेखनाची सुरुवात १९३७ साली झाली. ‘आठवतेय सारे अजून- कवितेचा पहिला झटका… निमित्त साधेच… पण त्यानेच माझे समग्र आयुष्य पिळून काढले…’ आणि या कवीच्या बाबतीत अक्षरशः खरे आहे. ‘आव्हे मारिया’ ही त्यांची आत्मचरित्राचा सूर असलेली कविता त्यांच्या एकूण काव्यसंभाराच्या संदर्भात महत्त्वाची ठरते. १९३७ ते २००२ या प्रदीर्घ कालखंडात त्यांचे एकूण पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांची पहिलीवहिली उपलब्ध मराठी कविता म्हणजे ‘सवंगडीण’ होय. या कवितेच्या काही ओळी उद्यृत कराव्याशा वाटतात. ती एका काल्पनिक प्रेयसीला उद्देशून लिहिलेली आहे.
तू माझी सवंगडीण जीवाची| तशी ग मैत्रीण मायेची
सुंदर बघ गे तर हे गाल| दिसती पहा गे किती लाल
कुणी कुणी तरी कुंकू फेकिली| गाली गुलालाची
वदन किती तरी नाजूक दिसते| का तव रसना हळू हळू हलते
आली का आली गे तुजला| लहर बोलण्याची
माधव जुलियन, यशवंत प्रभृतींच्या कविता वाचनातून रामाणींना ही कविता स्फुरलेली दिसते. त्यांची शेवटची प्रसिद्ध झालेली कविता म्हणजे ‘मौज’ दिवाळी २००३ अंकातली ‘परतण’ ही होय. तोपर्यंत त्यांच्या कवितेने फार मोठा पल्ला गाठला होता. त्यांच्या कवितांच्या बाडात पहिल्या पाच वर्षांच्या काळात लिहिलेल्या कविता नाहीत. त्या त्यांच्याच हातून नष्ट केल्याचे त्यांनी एका आत्मकथनात्मक लेखात लिहिल्याचे स्मरते. १९५९ साली त्यांचा ‘कातरवेळ’ हा संग्रह प्रसिद्ध झाला. कवी आपल्या कवितेबद्दल पूर्ण असमाधानी होते व हा संग्रह प्रसिद्ध होऊ नये असे त्यांना वाटत होते. ‘कातरवेळ’ प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर प्रतिकूल अभिप्राय आले. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेल्या परीक्षणात परीक्षणकर्त्याने पुढील निरीक्षणे नोंदवली आहेत- ‘ही कविता पु. शि. रेगे यांच्या कवितेची नक्कल आहे. पाडगावकर व करंदीकर यांच्या कवितेची गाढ छाया या कवितेवर आहे.’ श्री. पु. भागवतांसारखे विचक्षण आणि साक्षेपी संपादक आपल्या पत्रांतून आपला अभिप्राय कळवायचे ते उत्साहवर्धक नसायचे. कविता साभार परत करताना एका पत्रात त्यांनी लिहिले होते- ‘तुमच्या कविता टीपकागदासारख्या अनेकाचे रंग घेतात. ती नुसती उत्कटतेचा आभास निर्माण करते… स्वतःचे वैशिष्ट्य तिने अजून जोपासलेले नाही…’ अरुणा ढेरे यांना लिहिलेल्या एका पत्रात रामाणी लिहितात- ‘खरे म्हणजे श्री.पु.नीच माझ्या कवितेत जो साचलेपणा आला, त्याची तीव्र जाणीव करून दिली. त्यांची त्यावेळची पत्रे वाचून अक्षरशः रडू फुटायचे. पण सच्चा आविष्कारासाठी नवे शब्द फुटायचे नाहीत. मला मनस्वी चीड यायची.’ आपल्या अभिव्यक्तीच्या मर्यादा ओलांडण्याच्या ध्यासातून त्यांची कविता नव्या अवतारात प्रगट झाली.
प्रत्येक कलावंताच्या आयुष्यात साक्षात्काराचे क्षण येऊन जातात. डिसेंबर १९६० च्या अखेरीस फुटबॉल मॅच पाहण्यात दंग असताना ‘अंधारात विराट विश्व विरते’ अशी ओळ त्यांना स्फुरली, आणि आपण काहीतरी वेगळे लिहितो अशी त्यांना तीव्र जाणीव झाली. आणि ‘चुळकाभर जीवन विशाल करणारा महान क्षण/ अवेळीच येतो लखलखत विराटात न्हाऊन’ अशी अनुभूती त्यांना आली. इथून त्यांच्या कवितेला नवनवीन धुमारे फुटत गेले. ‘पानगळणीचे सगळे मोहोर झडून गेले तरीही मरणगंधाने बागा घमघमतात आणि निष्पर्ण पहुडलेल्या झाडीत एक विवस्त्र वासंतीक सूर शिशीर पक्ष्यांना आकळतो व शिशीर गुन्हा घडल्यावर राघूंचा कळप दडतो’ असा हा अनुभव.
रामाणी यांच्या कवितेत निसर्ग दिसतो. तथापि, त्यांनी लिहिलेल्या कविता रूढार्थाने निसर्गकविता नाहीत. त्यांच्या नजरेला हिरवा सूर भिडतो. तंद्रीचे पिंपळपान हलते तेही मनवार्याने… त्यांच्या मनात माती भिजते आणि गंधाला मत्त लकैर फुटते. या कवीला काळोखाचे आकर्षण आहे, तसेच त्यांच्या कवितेत हिरवा रंग वेगवेगळ्या रूपाने आलेला दिसतो.
हिरवें हिरवें मळें मनाचें हिरवा पक्षी उडे,
हिरवें हिरवें नेसून काही नजर नभाला भिडे
यांसारख्या निसर्गाची अनोखी वर्णने करणार्या ओळी हा कवी लिहून जातो तेव्हा एक हिरवा लँडस्कॅप डोळ्यांसमोर उलगद उलगडला जातो. ‘कविता ः पावसाच्या’ या कवितेत निसर्ग येतो तोही आगळेवेगळे रूप घेऊन. त्यात हिरवे पंछी उनाड होतात आणि अबोलही… या कवीला आकाश आवडते. तेही संध्याकाळचे. एका आठ ओळींच्या कवितेत हा भाव व्यक्त झालेला दिसतो.
दुरात झडलें
रंगाचें रान
भिर्यांचे भान
आभाळ ल्याले
हा अनुभव घेताना आपल्या उदासीचे पक्षी निगूढ नक्षी कोरून जातात असे त्यांना म्हणावेसे वाटते. श्रावणाला बिलगून स्वप्नातले गाव येते. ते भासातच भेटायला येते तेव्हा काय त्याचे नाव असा प्रश्न ते स्वतःलाच विचारतात. सुरांचे गंध होतात आणि घन झांजावतात. हा संपूर्ण निसर्गानुभव अत्यंत तरल पातळीवरून व्यक्त होतो. ‘दिशा दिशांत फाकली/मुग्ध मोगरीची धून/ गूढ तंद्रीत तळ्याच्या/ चंद्र राहिला बुडून’ अशी एक शब्दापल्याडची भावावस्था कवी अनुभवतो.
किंवा
तळ्यावर
पक्षी पिसावले तेव्हा
असंथ
धुकें धकेंच होतें
या ओळी म्हणजे इंप्रेशनिस्ट शैलीत रंगवलेले एक निसर्गचित्र आहे. क्लॉद मोने हा रामाणींचा अत्यंत आवडता चित्रकार होता. द. ग. गोडसे यांनी या दृष्टिकोनातून रामाणींच्या कवितेची चिकित्सा केलेली अनेक पत्रे लिहिली. दुर्दैवाने आज ती उपलब्ध नाहीत. ती पत्रे मिळाली असती तर त्यांच्या कवितेच्या या पैलूवर प्रकाश पडला असता. आज बव्हंशी चर्चा होते ती त्यांच्या ‘दिवे लागले’ या कवितेवरच. या कवितेच्या पलीकडे त्यांनी अत्यंत भावस्पर्शी कविता लिहिल्या आहेत, त्याकडे समीक्षकांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसते. माधव आचवल त्यांच्या कवितेवर दीर्घ समीक्षा लिहिणार होते, पण आचवलांच्या अकाली मृत्यूमुळे ते राहून गेले. त्यांच्या कवितेचा सांगोपांग अभ्यास करणारे एकमेव समीक्षक म्हणजे डॉ. म. सु. पाटील होय.
बा. भ. बोरकरांप्रमाणे रामाणी एक द्विभाषी कवी. हे द्विभाषिकत्व ही गोमंतकीय साहित्याची परंपरा. याची अनेक उदाहरणे दाखवता येतील. मराठीबरोबर रामाणींनी आशयसंपन्न अशा कोंकणी कविता लिहिल्या. त्या कविता ‘जोगलांचे झाड’, ‘निळें निळें ब्रह्म’, ‘ब्रह्मकमळ’, ‘निरंजन’ या चार संग्रहांतून संग्रहित झाल्या आहेत. तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या दोन्ही भाषांतल्या कविता एकत्रित वाचल्या तर त्या एकमेकांपासून किती भिन्न आहेत याचा प्रत्यय येतो.
त्यांचे अनुभवविश्व काळवंडलेले वाटत असले तरी त्याला लख्ख उजेडाची किनार आहे. म्हणूनच तमाच्या तळाला दिवे लागतात. हे दिवे त्यांच्या आत्मसाक्षात्काराच्या खुणा आहेत. त्यांनी आपले एकटेपण प्राणापल्याड जपले. ‘मम एकलेपण प्राशुनी सजलें कुंवार पिसें उरीं’ अशी संवेदना ती व्यक्त करते. उदासी असली तरी ती जीवनाच्या उषःकालासारखी. त्यांच्या दारात काळोखाचे झाड डोहाळते अशी ही विलक्षण शब्दकळा लाभलेली ही तिची अभिव्यक्ती. ही कविता म्हणजे माथा गगन माळणारे अलक्ष कळ्यांचे झाड. तंद्रित वाहताना ते शीव ओलांडून महाशून्यात निळी निरभ्र नेणीव पेरते. रामाणी कवितेला उद्देशून म्हणतात ः
एक निनावी व्रत घेतलंय
ठाऊकाय ना तुला?
ते जपायला
जोगवायला हवें
अग,
आतला अंगारगर्भ आकळणारे
कधीतरी
लागतील ना दिवे!