प्रस्तावित मरिना प्रकल्पाला विरोध करणार्या नावशी, ओशेल, काणका, बांबोळी येथील ग्रामस्थांनी काल उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे मरिनासाठी येत्या २ नोव्हेंबर रोजी बांबोळी येथे आयोजित केलेली जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी केली. ही जनसुनावणी रद्द न केल्यास २ नोव्हेंबर रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालय ते दोनापावला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
रामराव वाघ, अरुणा वाघ व रामा काणकोणकर यांच्या नेतृत्वाखाली नावशी, ओशेल, काणका व बांबोळी येथील ग्रामस्थांनी काल उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात येऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
ग्रामस्थांना आपल्या गावात हा मरिना प्रकल्प नको असल्याने जनसुनावणीचा विचार सरकारने सोडून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने विकास गावणेकर यांना निवेदन सादर करताना रामराव वाघ, अरुणा वाघ व रामा काणकोणकर यांनी केली.
सरकार ज्या ठिकाणी हा मरिना प्रकल्प आणू पाहत आहे त्या परिसरात राहणारे ९० टक्के लोक हे अनुसूचित जमातीतील आहेत. तेथे मरिना प्रकल्प आल्यास या स्थानिक लोकांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम होणार असल्याने या लोकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे रामराव वाघ म्हणाले. या प्रकल्पासंबंधी सरकारने स्थानिक लोकांशी तसेच स्थानिक पंचायत व लोकप्रतिनिधी यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही, असेही वाघ यांनी सांगितल्याचे गावणेकर म्हणाले. किनारी आराखडाही अजून तयार झालेला नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. जेथे हा मरिना प्रकल्प येणार आहे तो विभाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे, असे गावणेकर म्हणाले.
आपण शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी कार्यालयाचे काम हे फक्त जनसुनावणी घेणे यापुरतेच मर्यादित असल्याचे त्यांच्या नजरेत आणून दिल्याचे गावणेकर यांनी सांगितले. प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी द्यावी की नाही याचा निर्णय गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ घेणार असल्याचेही आपण शिष्टमंडळाला सांगितल्याचे गावणेकर यांनी स्पष्ट केले.