९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक काल वर्ध्यात पार पडली. याच बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. ३, ४, ५ फेब्रवारी २०२३ रोजी वर्ध्यातील स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात होईल. विदर्भ साहित्य संघाचे यावर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे ९६ वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्त केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचवले होते. साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत हे संमेलन वर्धेला दिले.
वर्धा-सेवाग्राम-पवनार ही गांधी-विनोबांची कर्मभूमी आहे. त्यामुळे येथे होणार्या संमेलनासाठी गांधी विचारांवर लेखन करणार्या लेखकाची अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, असा एक मतप्रवाह होता. त्यातूनच विदर्भ साहित्य संघाकडून जेष्ठ लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवारांचे नाव पुढे करण्यात आले होते. महामंडळाच्या इतर घटक संस्थांचेही द्वादशीवारांच्या नावाला समर्थन असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच बैठकीत द्वादशीवारांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता साहित्यवर्तुळात व्यक्त केली जात होती; परंतु बैठकीच्या एक दिवसाआधी नावाचे गणित बदलले व ऐनवेळी चपळगावकर यांचे नाव पुढे करण्यात आले. चपळगावकर यांच्याशिवाय दुसरे नाव चर्चेलाच न आल्याने अखेर अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या संमेलनाचे उद्घाटन दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. त्यापूर्वी महामंडळाचे ध्वजवंदन करण्यात येईल. ग्रंथप्रदर्शनात साधारण ३०० गाळे असतील, त्याचे उद्घाटन २ फेब्रुवारीला पूर्वाध्यक्षांच्या हस्ते होईल. प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि यांच्या सोयीसाठी हा बदल करण्यात आला आहे. संमेलनाची सुरुवात प्रथेनुसार ग्रंथदिंडी दि. ३ रोजी सकाळी ८.३० वाजता होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनाचा समारोप दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होईल.
कोण आहेत नरेंद्र चपळगावकर?
नरेंद्र चपळगावकर हे वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील लेखक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश असून, न्यायाधीश होण्यापूर्वी ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा आणि माणूस यांसारख्या पुस्तकांचे लेखन केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मराठी भाषा, मराठी साहित्य यांच्याबद्दल आपले मत मांडण्याची मोठी संधी आहे. ही संधी दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आभार मानतो.
- नरेंद्र चपळगावकर