मराठी साहित्य संमेलनाचे उस्मानाबादमध्ये उद्घाटन

0
127

उस्मानाबाद येथे काल ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ नका अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. मात्र तरीही त्यांनी उद्घाटन केले. मात्र यावेळी संमेलनात कुठेच विरोध दिसून आला नाही. मात्र महानोर यांना धमकी देण्यात आल्याने सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती.

यावेळी ९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी ९३ व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले- पाटील, प्रमुख कार्यवाह दादा गोरे, कवयित्री अनुराधा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अक्षयकुमार काळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले तसेच पिंपरी येथे झालेल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचा विशेष सत्कार उस्मानाबाद येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांच्या हस्ते झाला.

मुख्यमंत्र्यांची पाठ
दरम्यान, या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख सर्वचराजकीय पक्षाच्या नेत्यांना आयोजकांनी निमंत्रण दिले होते. मात्र मुख्यमंत्री, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे आदी मोजकेच राजकीय नेते यावेळी श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.