मराठी शिक्षक ः संस्कृतिसंरक्षक

0
18
  • प्रा. दिलीप वसंत बेतकेकर

मराठीच्या शिक्षकाचं एक आगळं-वेगळं स्थान आहे. त्याची जबाबदारी खूप वेगळी आणि महत्त्वपूर्ण आहे. मराठी ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतीची भाषा आहे. त्यामुळे मराठी शिक्षक स्वाभाविकच संस्कार आणि संस्कृतीचा रक्षक, वाहक ठरतो.

‘माझी माय मराठी डोक्यावर रत्नजडित मुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे लेवून मंत्रालयाच्या दारात उभी आहे.’ मराठीतील साहित्यरत्न कुसुमाग्रज यांचे हे विधान. त्यात खंत, खेद, चीड आहे. मराठीची अवस्था आजही खूप बदलली आहे असं नाही. मराठीच्या शिक्षकाची देहबोली (काही सामान्य अपवाद वगळता) कशी असते? शाळेतील सर्व विषयांच्या शिक्षकांच्या गोतावळ्यात मराठी विषय शिकवणारा शिक्षक कोठे आणि कसा उभा असतो हे बघितल्यावर ही खंत वाटते. गणित, इंग्रजी शिकवणारे शिक्षक स्वतःकडे कसे बघतात आणि इतर लोक त्यांच्याकडे कसे बघतात, तुलनेने मराठी शिकवणारा शिक्षक स्वतःकडे कसा बघतो आणि इतर त्याच्याकडे कसे बघतात? यात खूप फरक जाणवतो.

मराठीचा शिक्षक खूप वेळा ‘बिचारा-बापुडा’ असतो. एक प्रकारचा न्यूनगंड त्याच्या मनात असतो. सगळेच मराठीचे शिक्षक असे नसतात. ‘आपल्या संमतीशिवाय कोणीच आपल्याला कमी लेखू शकत नाहीत, आपला अवमान करू शकत नाहीत’, या विचारातलं मर्म समजून घ्यायला हवं.
मराठीच्या शिक्षकाचं एक आगळं-वेगळं स्थान आहे. ते त्याने नीट समजून घ्यायला हवं. त्याची जबाबदारी खूप वेगळी आणि महत्त्वपूर्ण आहे. मराठी ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतीची भाषा आहे. त्यामुळे मराठी शिक्षक स्वाभाविकच संस्कार आणि संस्कृतीचा रक्षक, वाहक ठरतो. एकदा भाषा गेली म्हणजे पाठोपाठ संस्कार आणि संस्कृतीही जातात. भाषा संस्कृतीचं संवर्धन करते, संस्कृती श्रीमंत आणि समृद्ध करते. आणि संस्कृती समाज समृद्ध करत असते.
त्यामुळे मराठीचा धडा किंवा कविता वाचणे, कठीण शब्दांचे अर्थ सांगणे आणि पाठ अथवा कवितेखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून, पाठ करून घेऊन पेपरमध्ये गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे, एवढं सीमित काम मराठीच्या शिक्षकाचं नाही याची जाणीव ठेवायला हवी.
गणित, विज्ञान, भूगोल विषयाचे शिक्षक आणि मराठीचा शिक्षक यांच्यामध्ये खूप अंतर आहे. इतर विषयांचे शिक्षक आपल्या विषयांशी अधिक बांधील असतात. त्यांच्या विषयातूनही मानवी मूल्ये, संस्कृती या विषयांना स्पर्श होतच असतो. पण त्यांना अनेक मर्यादा येतात. मराठीच्या शिक्षकाला संपूर्ण जीवन कवेत घेण्याची संधी असते, वाव असतो. मराठीचा शिक्षक जीवनाशी बांधील असतो. संपूर्ण जीवनाचा विचार घेऊन मराठीचा शिक्षक वर्गात प्रवेश करत असतो.
शिक्षकाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, ‘अ ढशरलहशी ीर्हेीश्रव ज्ञपुे ेीाशींहळपस रर्लेीीं र्शींशूीींहळपस; रपव र्शींशूीींहळपस रर्लेीीं ेीाशींहळपस!’ (प्रत्येक विषयातलं थोडं थोडं आणि एका विशिष्ट विषयातलं सगळं शिक्षकाला माहीत असायला हवं.) हे सर्वच शिक्षकांना आवश्यक आहे. पण भाषेच्या शिक्षकाला हे अधिक लागू पडते. ‘भाषेचा शिक्षक हा मनुष्याच्या अस्तित्वाचा शिक्षक असतो,’ असे प्राचार्य गोपाळराव मयेकर एकदा म्हणाले होते.

मराठीच्या पुस्तकात व्यक्तीचं चित्रण असतं. त्या व्यक्ती वैज्ञानिक, खेळाडू, गणितज्ज्ञ असू शकतात. त्यांच्यासंबंधी सांगताना, शिकवताना त्यांच्या क्षेत्राची (विज्ञान, खेळ, कला इ.) किमान काही माहिती असल्याशिवाय धडा शिकवणे योग्य होणार नाही. तो त्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांवरही मोठा अन्याय ठरेल.
पद्य विभागात ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशा थोर संतांच्या रचना असतात. या रचना शिकवण्याच्या निमित्ताने आपल्या संतपरंपरेची निदान धावती ओळख करून देण्याची संधी मराठीच्या शिक्षकाला मिळालेली असते. ज्ञानेश्वर केवळ दोनतीन गुणांसाठी शिकवायचे नसतात; त्यांच्या गुणांच्या अनुकरणासाठी शिकवायचे असतात.

भाषेचं अध्यापन इतर विषयांच्या अध्यापनाला पूरक असतं. भाषेवर जितकं अधिक प्रभुत्व, जितकी अधिक पकड, तितकं इतर विषय समजणं आणि समजावणं सुलभ आणि परिणामकारक. भाषाच कच्ची असेल तर अध्ययनही अवघड बनतं. अध्ययन-अध्यापनाच्या पलीकडे पुस्तकाच्या आधाराने मराठी शिक्षक विद्यार्थ्याला खूप देत असतो. त्यातून विद्यार्थ्याची जडण-घडण होते. ‘भाषा माणसाचं असं अदृश्य अंग आहे ज्यातून माणूस आरपार दिसतो’ असं म्हणतात.
श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन या भाषा शिकण्याच्या चार पायऱ्या, चार सोपानं. श्रवण आणि वाचनातून स्वीकारलं जातं, घेतलं जातं. तर भाषण आणि लेखनातून प्रक्षेपित केलं जातं. ही भाषेची कौशल्येही आहेत. श्रवण, वाचनाद्वारे माणूस घेतो. भाषण, लेखनाद्वारे देतो. या देण्या-घेण्याचे संस्कार होतात. संस्कृती फुलते, फळते. हे काम खूप सूक्ष्म आणि नाजूक आहे. भाषा-शिक्षकाला हे नाजूक काम करायचं असतं.
आपल्या पूर्वजांकडून आपल्याला भरपूर मिळालं आहे. त्यातून आपलं जीवन सुखद, समृद्ध झालं आहे. त्या सर्वांबद्दल मनात कृतज्ञता जागवणं ही पहिली पायरी आणि त्यात मौलिक भर घालून पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं, हस्तांतरित करणं ही दुसरी पायरी. मराठीच्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना यासाठी तयार करणं ही त्याच्याकडून अपेक्षा आहे.
साहित्य संगीत कला विहीनः
साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः।
असं म्हटलं जातं. ज्याला साहित्य, संगीत, कला यांत रूची नाही, रस नाही तो खरं तर माणूसच नाही. शिंगं आणि शेपूट नसलेला तो पशूच आहे.
साहित्य, संगीत, कला ही संस्कृतीची अंगे आहेत. यांचा आस्वाद घेण्याची दृष्टी आणि क्षमता भाषेचा शिक्षक करत असतो. रसिकतेने हा आस्वाद घेता घेता विद्यार्थ्याच्या मनातही सृजनशीलता अंकुरते. तोही हळूहळू भर घालू लागतो. संस्कार आणि साहित्यातून त्याची जडणघडण होते आणि त्याच्यातील सृजनशीलतेमुळे तोही संस्कृतीत भर घालू लागतो. आणि सृजन म्हणजे केवळ कथा, कविता लिहिणे एवढेच नाही. नवे मांडण्याची वृत्ती म्हणजे सृजन. प्रसिद्ध भाषा वैज्ञानिक पद्मश्री अशोक केळकर म्हणतात, ‘भाषेचा विकास आणि ती ऐकणाऱ्या आणि बोलणाऱ्या मंडळींचा बौद्धिक, भावनिक, नैतिक विकास हातात हात घालून होत असतो.’ तो विकास तुटक आणि एकांगी असत नाही.
आजची मुलं खूप बुद्धिमान आहेत. त्यांचा बुद्ध्यांक मागच्या पिढीपेक्षा अधिक आहे असं मत या विषयावर संशोधन करणारे मानसशास्त्रज्ञ मांडतात. पण आज बुद्ध्यांकापेक्षाही भावनांक अधिक महत्त्वाचा आहे असे दिसून येत आहे. आणि दुर्दैवाने भरपूर बुद्ध्यांक असलेली मुलं भावनांकाचा विचार करता मागे पडतात असा अनुभव येतो.

भावनिक वाढीसाठी भाषा, संगीत हे विषय अधिक उपयुक्त ठरतात. भावनाविरहित माणूस म्हणजे यंत्र, रोबोट. भाषेचा शिक्षक हळुवारपणे भावनांचे प्रशिक्षण देत असतो. पुस्तकातील धडा, कविता उलगडत असताना त्याला ही मुलांच्या मनाच्या या कोमल कप्प्याला अलगद स्पर्श करण्याची खूप मोठी संधी आणि शक्ती मिळत असते. हे मराठी भाषेच्या शिक्षकाचं मोठं भाग्यच म्हटलं पाहिजे.
आपला प्रत्येक विद्यार्थी कवी, कथाकार, कादंबरीकार, लेखक होईल असं नाही. तशा भ्रमातही शिक्षकाने राहू नये. पण वर्षामागून वर्षे अनेक विद्यार्थ्यांच्या ज्या तुकड्या आपल्या हाताखालून जातात त्यांपैकी कोणापाशी हे कवी, लेखक होण्याचे बीज सुप्तावस्थेत असेल हे वरकरणी दिसत नाही, भासत नाही हे खरे. पण असतच नाही असे ठामपणे सांगता येणार नाही. काहींच्या बाबतीत ते अनेक वर्षं सुप्तावस्थेत असतं आणि अचानकपणे केव्हा तरी सृजन पावलं. तो क्षण सोन्याचा. आणि कवी, लेखक झाला नाही तरी विचार आणि संवेदना तरी नक्कीच जाग्या होऊ लागतात. निदान उपेक्षा करणं तरी नक्की थांबू शकतं. तानसेन एखादाच असतो, पण कानसेन (श्रवण करून आस्वाद घेणारा) खूप असतात.

स्वतःच्या मन आणि बुद्धीवर संस्कार करून स्वतःमध्ये बदल घडवून आणता येतो. संस्कृती या शब्दात हा बदलही अभिप्रेत आहे. हे घडवून आणण्यात मराठी भाषेच्या शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण बनू शकते.
गुरुदेव टागोर म्हणतात, ‘आपण चांगल्या कामाची निवड करत नाही, तर चांगलं काम आपली निवड करत आपल्यापर्यंत येतं.’
संस्कृती संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम खूप श्रेष्ठ आहे, आणि त्या कार्याने ते कार्य करण्यासाठी ‘माझी’ निवड केली असं ज्या शिक्षकांना वाटतं ते शिक्षक खरोखरच भाग्यवान.