‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरामातील चित्रपट घोषित
परेश मोकाशींच्या ‘एलिझाबेथ एकादशी’ ला सन्मान
परेश मोकाशी यांच्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या मराठी चित्रपटाने यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरामा’ विभागाचा शुभारंभी चित्रपट ठरण्याचा मान पटकावला आहे. गोव्यात पुढील महिन्यात होणार्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पॅनोरामा’ विभागात दाखवल्या जाणार्या चित्रपटांची निवड काल जाहीर करण्यात आली. फीचर फिल्म विभागात २६ चित्रपट तर नॉन फीचर फिल्म विभागात १५ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. बर्लीन महोत्सवात दाखवला गेलेला मराठी चित्रपट ‘किल्ला’ही या विभागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘यलो’ व रजत कपूर यांचा ‘आँखो दिल्ली’ हे दोन्ही चित्रपट यंदाच्या गोव्यात होणार्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पॅनोरामा’ विभागात पाहायला मिळणार आहेत. उत्पल बोरपुजारी यांचा ‘सॉंग्स ऑफ द ब्ल्यू हिल्स’ हा माहितीपट बिगर चित्रपट गटामध्ये निवडण्यात आला आहे.
उडिशातील नामांकित चित्रपट निर्माते ए. के. बीर यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने चित्रपटांची ही निवड केली आहे. सात मराठी, मल्याळी, पाच बंगाली व दोन हिंदी चित्रपट आणि आसामी, कन्नड, खासी, उडिया आणि तामीळमधील प्रत्येकी एक चित्रपट निवडण्यात आला आहे. कौशिक गांगुली यांचा ‘छोटोदेर छोबी’, आसामी चित्रपट ‘ऑथेल्लो’, अनंत नारायण महादेवन यांचा ‘गौर हरी दास्तान’, पी शेषाद्री यांचा कन्नड चित्रपट ‘१-डिसेंबर’ आणि शाजी एन करूण यांचा ‘स्वप्नम्’ हे चित्रपट या विभागात दाखवले जातील. नॉन फीचर फिल्म गटात शबनम सुखदेव यांचा ‘द लास्ट आदेऊस’ हा शुभारंभी चित्रपट असेल, तर कविता बहल व नंदन सक्सेना यांचा ‘कँडल्स इन द विंड’ हा चित्रपटही या गटात निवडण्यात आला आहे.