गेल्या एप्रिलपासूनचे वेतन न मिळालेल्या गोमंतक मराठी अकादमीच्या कर्मचार्यांनी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आपले वेतन न मिळाल्यास जानेवारीपासून निदर्शने, धरणे, उपोषण आदी मार्गांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदन कर्मचार्यांच्या वतीने गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष श्री. संजय हरमलकर यांना देण्यात आले आहे.गेले नऊ महिने आम्ही अकादमीत वेतन नसताना नित्यनेमाने कामाला येत आहोत. गोव्याच्या वेगवेगळ्या भागांतून यावे लागत असल्याने प्रवास खर्चासाठी रोज ५० ते १०० रुपये खर्च येतो. शिवाय जेवणासाठीही किमान १०० रुपये लागतात. कर्मचार्यांची मुले शाळा – महाविद्यालयात शिकत असून फी, पुस्तके, गणवेश, तसेच पॉकेटमनीसाठी खर्च होत असतो. गेल्या नऊ महिन्यांत वेतनाचा एक पैसाही मिळालेला नसल्याने कर्मचार्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यामुळे अकादमीच्या कार्यकारिणीने आणि आमसभेने कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी विनंती कर्मचार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सरकारने अनुदान दिल्यावर कर्मचार्यांचे वेतन देऊ असे गेले नऊ महिने सांगण्यात येत आहे. अकादमी खुली करा असा सरकारचा आग्रह असून तोवर अनुदान रोखण्यात आले आहे. अकादमी व सरकारच्या या वादात कर्मचारी भरडून निघाले आहेत. आमची सहनशीलता आता संपत आली असून वेतन न मिळाल्यास नाईलाजाने रस्त्यावर यावे लागेल असा इशारा कर्मचार्यांनी दिला आहे.
गोमंतक मराठी अकादमीच्या सर्व आमसभा सदस्यांना समाजात तसेच सरकार दरबारी मान आहे. तरी आपण सर्व सदस्यांनी आपले सरकार दरबारचे वजन पणाला लावून आम्हाला न्याय द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, सरकार स्थापन करू इच्छित असलेल्या गोवा मराठी अकादमीच्या अस्थायी कार्यकारिणीने अकादमीची घटना तयार केलेली असून ती सरकारला सुपूर्द करण्यात आली आहे. दुसरीकडे विद्यमान गोमंतक मराठी अकादमीनेही आपली संस्था काही प्रमाणात खुली करण्याचे ठरवले असून सरकारने आपले अनुदान पुन्हा सुरू करावे असा प्रयत्न चालवलेला आहे.