मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा

0
9

>> केंद्र सरकारचा मोठा निर्णय

>> पाली, प्राकृत, बंगाली व आसामी भाषांनाही अभिजात दर्जा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या गेल्या दोन दशकांपासून करण्यात येत असलेल्या मागणीला अखेर काल केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेसोबतच पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत या भाषांनादेखील अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे.

केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनीदेखील ही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या काल गुरूवारी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. आजवरच्या अनेक सरकारांनी केंद्राकडे यासाठी प्रयत्न केला होता.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, आमच्याकडे आतापर्यंत ज्या सूचित केलेल्या अभिजात भाषा होत्या. त्यात कन्नड, तेलगू, मल्याळम होत्या. नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे असे सांगितले.

आणखी चार भाषांचा
यथोचित सन्मान

दोन दशकांपासून याबाबत केल्या जाणाऱ्या मागणीला अखेर काल केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. याबरोबरच मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषांना अभिजात दर्जा देऊन या भाषांचाही केंद्राने यथोचित सन्मान केला आहे. आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला होता. त्यात आता मराठी, बंगाली, पाली, प्राकृत व आसामी या भाषांचा समावेश झाला आहे.

चळवळीला यश ः श्रीपाद जोशी
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीच्या चळवळीला पहिला वेग आम्ही दिला असे श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाच लाख पोस्टकार्डस्‌‍ पंतप्रधानांना पाठवण्याची जी मोहीम हाती घेतली व पंचवीस हजार पोस्टकार्ड एकाच दिवशी आम्ही सातारा येथून पोस्ट केली तेव्हापासून आल्याचे जोशी यांनी सांगितले.

श्री. जोशी यांनी, मराठीच्या व्यापक हितासाठी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीमार्फत सर्व पातळ्यांवर आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. माध्यमांनी उत्तम साथ दिली, मराठीसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या व आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व विरोधी पक्षांचे ही मोठे सहकार्य हा विषय संसदेत लावून धरण्यात मिळाले.
या साऱ्याचा परिणाम म्हणून केंद्राने आजवर रोखून धरलेला हा अभिजात दर्जा जाहीर केला यासाठी केंद्र सरकारचे विशेष अभिनंदन आणि आभार मानत असल्याचे सांगितले. मराठीला दर्जा लाभणे म्हणजे महाराष्ट्री प्राकृतला लाभणे आहे. म्हणूनच मराठीसोबतच तो पाली आणि प्राकृतलाही दिला गेला आहे. सोबत बंगाली आणि आणि आसामीदेखील असल्यामुळेही आनंद होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

महत्वपूर्ण निर्णय ः नितीन गडकरी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.

फायदा काय?

भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा अभ्यास, केंद्र, सरकारकडून अनुदानात वाढ, भाषा प्रसाराला चालना, त्या भाषांतील विद्वानांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार, प्रत्येक विद्यापीठात त्या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष केंद्र प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाईल.

लढ्याला यश ः मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. एका लढ्याला यश आले आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार मानत असल्याचे म्हटले आहे.

ऐतिहासिक दिवस ः फडणवीस

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मायमराठीला अभिजात भाषेचा बहुमान मनाला सुखद अनुभूती देणारा आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12कोटी जनतेच्या वतीने मनापासून आभार मानत असल्याचे आपल्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.