मये मुक्तीचा मार्ग मोकळा

0
104

राज्यपालांकडून विधेयकावर स्वाक्षरी : मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
मये भू-विमोचन विधेयक राज्यपालांनी मंजूर केल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहमंत्री या नात्याने विधानसभेत बोलताना सांगितले. त्यासंबंधी अधिसूचना लवकरच प्रकाशित होणार असल्याचे ते म्हणाले.
पर्रीकर यांनी सांगितले की, राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांनी विधेयकावर १५ ऑगस्ट रोजी स्वाक्षरी केली. सरकारने त्यासंबंधी अधिसूचना राजपत्रात छपाईसाठी पाठविली आहे. ती एक-दोन दिवसांत प्रकाशित होईल. मयेतील भूधारकांना जमिनीचे हक्क प्रदान करण्यास हे विधेयक मदत करेल. या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा काळ लागू शकतो, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
येत्या मार्चपर्यंत कोलवाळ तुरुंग पूर्ण
कोलवाळ तुरुंगावर १६० कोटी रु. खर्च करण्यात आले असून तुरुंगाचे बांधकाम आर्थिक वर्ष अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ६५० कैद्याची तेथे सोय होणार आहे. कारागृह सुधार समिती स्थापन करण्याची मागणीही त्यांनी यावेळी मान्य केली.
पोलीस विधेयक लांबणीवर
पोलीस विधेयकात काही त्रुटी आहेत हे दिसून आल्याने ते एवढ्यात मांडण्यात येणार नाही, असे गृहमंत्री म्हणाले. बॉडी बिल्डरना उंच उडी मरता येत नाही. त्या परीक्षेत ते नापास होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी पात्रता परीक्षा ठेवावी की काय याबाबत विचार करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही पोलिसांच्या बाबतीत कडक कारवाई सुरू केली आहे. मात्र, पोलिसांवर विनाकारण आरोप करणारेही लोक आहेत. पोलीस खात्यात जसे चारित्र्यावर डाग असलेले लोक आहेत तसेच चांगले लोकही आहेत. पोलीस खात्याने धोरण ठरवणे हे सरकारचे काम आहे, असे ते म्हणाले.
१२ पोलीस बडतर्फ
गेल्या वर्षी १२ पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गैरवर्तनासाठी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे ते म्हणाले. एक-दोन पोलिसांनी दुधाच्या पिशव्यांची चोरी केली होती. त्यांनाही निलंबित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. ७० पोलिसांना निलंबित करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. चोरट्यांना एका दिवसाच्या आत न्यायालये जामीन देत असल्याने पोलिसांना तपासच करता येत नसल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
वास्को बलात्कार प्रकरणी त्या विद्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी अक्षम्य गुन्हा केला. पीडित मुलीला आंघोळ घातली. तक्रार करण्यासही विद्यालयाने तीन तासांचा विलंब लावला. १५ पोलिसांच्या पथकाने तपासकाम हाती घेतले होते. १९ संशयितांना ताब्यात घेऊन त्यंाची पूर्ण चौकशी केल्यानंतरच त्यांना मुक्त करण्यात आले. विद्यालया सभोवताली असणार्‍या ६०० घरातील लोकांची चौकशी करण्यात आली. देशाबाहेर असलेल्या मोंटी नावाच्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली. विरोधकाना त्या आरोपीविषयी माहिती असेल तर द्यावी. आताच आरोपीला अटक करू असे ते म्हणाले.
सायबर गुन्हे विभाग अधिसूचित
सायबर गुन्हे विभाग अधिसूचित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तीन अभियंत्यांची त्यासाठी निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सेरूला कोमुनिदाद प्रकरणी १४ जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे आहे. ३ कोटींचे अमली पदार्थ जप्त
गेल्या वर्षी प्रचंड प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ३ कोटी ८० लाख एवढ्या किमतीचे ते होते. दारू पिऊन गाडी चालवणार्‍या ७७२ जणांना पकडण्यात आले. दारू पिऊन गाडी चालवणार्‍यांवरील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. उशिरा दारू विक्री करणार्‍यांना रात्री बारजवळ टॅक्सी ठेवणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
फक्त ३६ खून
गेल्या वर्षी फक्त ३६ खुनांची नोंद झाली असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. महिलांवरील गुन्हे नोंद करण्यास हयगय करणार्‍या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, यावेळी बोलताना काही आमदारांनी काही महिला पुरुषांवर खोट्या तक्रारी नोंदवत असल्याचे सभागृहाच्या नजरेत आणून दिले. त्यावर उत्तर देताना त्याबाबत काय करता येईल त्याचा अभ्यास करण्याचे आश्‍वासन पर्रीकर यांनी दिले. गृहखाते, तुरुंग, पोलीस, गृहरक्षक, अग्निशमन व अग्नीसेवा आदी खात्यांवरील मागण्यांवरील चर्चेस पर्रीकर काल उत्तर देत होते.

मयेत आनंदोत्सव
डिचोली (न. प्र.) : गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मयेवासीयांच्या लढ्याला यश आल्यामुळे मयेंत आनंद व्यक्त करण्यात आला. उपसभापती व मयेचे आमदार अनंत शेट तसेच वीणा चोडणकर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर तसेच सरकारचे अभिनंदन केले. मये भू विमोचन समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर यांनीही सरकारने आभार व्यक्त केले.
श्रीराम सेनेवर गोव्यात बंदी
प्रमोद मुतालिक यांच्या श्रीराम सेनेवर गोवा सरकारने बंदी घातली असल्याचे काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत गृह खात्यावरील मागण्यांवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले. प्रमोद मुतालिक यांच्या श्रीराम सेनेच्या गोवा प्रवेशावरून गेले काही दिवस बराच वाद चालू होता, त्याला पर्रीकर यांच्या निर्णयानंतर पूर्णविराम मिळाला आहे.