गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) ‘बांधा, वापरा आणि परत करा’ या तत्त्वावर मये येथील १ लाख ६७ हजार चौरस मीटर जागेत थीम पार्कसह तीन तारांकित किंवा उच्च गटातील हॉटेल उभारण्यासाठी व्यावसायिक, यांच्याकडून इच्छा प्रस्ताव मागविले आहेत.
मये येथील प्रसिद्ध तलावाजवळ महामंडळाची १ लाख ६७ हजार चौरस मीटर जमीन आहे. मये तलावाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. मये तलावाला देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. या ठिकाणी उच्च दर्जांची बोटींगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे महामंडळाने या ठिकाणी थीम पार्कसह हॉटेल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बांधा, वापरा आणि परत करा या तत्त्वांवर उभारला जाणार आहे. महामंडळातर्फे या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध केली जाणार आहे. हॉटेलमालक किंवा इच्छुकाला ठराविक वर्षासाठी जमीन भाडेपट्टीवर दिली जाणार आहे.