मये कस्टोडियन मालमत्ताप्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य देणार ः मुख्यमंत्री

0
127

मये येथील स्थलांतरित (कस्टोडियन) मालमत्तेचा प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आझाद मैदानावर काल आयोजित गोवा क्रांतिदिन सोहळ्यात बोलताना दिले.

गोवा प्लॅस्टिक मुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, आपल्या आजारपणामुळे प्लॅस्टिक मुक्तीच्या उपक्रमाला विलंब झाला आहे. यापुढे प्लॅस्टिक आणि कचरा विल्हेवाटीच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी दमदार पाऊल उचलण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून १९६१ साली मुक्त झालेला असला तरी गोवा मुक्तीचा लढा अद्याप पूर्ण झालेला नाही. मये गावातील स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्‍न हा सुद्धा मुक्ती लढ्याचा भाग आहे. स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्‍न सुटल्यानंतर गोवा खर्‍या अर्थाने मुक्त होणार आहे. स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून या प्रक्रियेला गती दिली जाणार आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले.

कचराप्रश्‍नी नागरिकांना
मार्गदर्शनाची गरज
कचरा विल्हेवाटीच्या प्रश्‍नाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शिक्षित लोकांकडून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये कचरा भरून मांडवी नदी किंवा उघड्यावर टाकला जातो. या शिक्षित लोकांकडे ज्ञानाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. यासाठी ज्ञानाची क्रांती घडवून आणण्याची नितांत गरज आहे. ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आवश्यक ः राज्यपाल
गोवा मुक्तीसाठी बलिदान देणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि स्वातंत्र्य सैनिकांबाबत युवा पिढी अनभिज्ञ आहे. गोवा क्रांती, स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची पाठ्य पुस्तकातून युवा पिढीला माहिती देण्याची गरज आहे, असे आवाहन राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी यावेळी केले.

गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पेडणेकर यांनी आपल्या भाषणात मये येथील स्थलांतरित (कस्टोडियन) मालमत्तेचा प्रश्‍न मांडला. गोवा मुक्त होऊन ५६ वर्षे उलटली तरी मये गावातील कस्टोडियन मालमत्तेचा प्रश्‍न आजही प्रलंबित आहे. सरकारच्या प्लॅस्टिक मुक्त उपक्रमाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही पेडणेकर यांनी सांगितले.
राज्यपाल सिन्हा, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोवा क्रांतिदिनानिमित्त आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा व इतरांची उपस्थिती होती.