मनोहारी स्वप्नपूर्ती

0
17

(विशेष संपादकीय)

मोप येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची काल स्वप्नपूर्ती झाली. या विमानतळाचे उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या पर्यटनाच्या विकासाचे नवे महाद्वार खुले केले आहे असेच म्हणावे लागेल. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी गोमंतकीयांना दिलेल्या एका अभिवचनाचीही ही पूर्तता आहे. तमाम अडथळे, दाबोळी समर्थक लॉबीकडून सतत झालेला टोकाचा विरोध, पर्यावरणाच्या नावाखाली तथाकथित पर्यावरणवाद्यांनी वेळोवेळी निर्माण केलेले न्यायालयीन अडथळे, प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या नथीतून तीर मारण्याचे झालेले प्रयत्न, मध्यंतरी येऊन जनजीवन ठप्प करून गेलेली कोरोना महामारी, या सगळ्या गोष्टींवर मात करीत अवघ्या सहा वर्षांत या विमानतळाचा पहिला टप्पा कार्यान्वित होणे हे निश्‍चितच गौरवास्पद आहे. गोमंतकीयांनी आपल्याला दिलेल्या स्नेहाची आपण सव्याज परतफेड करू असे वचन आपण दिले होते. मोप विमानतळ हा त्याचाच एक छोटासा भाग आहे असे काल उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या राष्ट्रीय कारकिर्दीच्या प्रारंभाची घोषणा गोव्यातूनच झाली होती आणि त्यामध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे दिवंगत संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे महत्त्वाचे योगदान राहिले होते. त्यांचेच नाव या विमानतळाला मोघमपणे का होईना दिले गेले आहे हा योगायोगही संस्मरणीय आहे. या विमानतळाला मुक्तीनंतरच्या आधुनिक गोव्याचा पाया ज्यांनी घातला, बहुजनसमाजाला ज्यांनी ताठ कण्याने उभे राहायला शिकवले, त्या स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव देणे अधिक औचित्यपूर्ण ठरले असते, परंतु त्यासाठी जे स्वपक्षातीत राजकीय औदार्य लागते त्याची वानवा असल्याने पर्रीकरांच्याच नावावर गोवा सरकारने शिक्कामोर्तब केले आणि त्यावर केंद्र सरकारने केवळ ‘मनोहर’ असे मोघम नाव देत मोहर उठवली आहे. गोव्यासाठी हे केवळ नाव न राहता, खरोखरच ती एक मनोहारी स्वप्नपूर्ती ठरावी या दिशेने काही गोष्टी येणार्‍या काळात व्हाव्या लागतील. गोव्याच्या पर्यटनक्षेत्रात अपेक्षित असलेली अनेक पटींची वाढ विचारात घेऊन वाढीव प्रवासी हाताळणीची क्षमता या विमानतळावर ठेवण्यात आलेली आहे. नवनव्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर थेट विमानसेवा येथून सुरू झाली, तर सध्या गोवा – मुंबई सेक्टरचा जो अतिरिक्त भुर्दंड गोमंतकीयांना विमान प्रवासासाठी सोसावा लागतो, तो टळू शकतो. त्यासाठी नवे थेट हवाईमार्ग उपलब्ध होणे आवश्यक असेल. हा विमानतळ उडान योजनेखाली सध्या म्हैसूरला जोडला गेला असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी काल केले. म्हणजे मोप ते म्हैसूर विमानतिकीट दराला उडाणखालील सवलत मिळणार असल्याने ते दर कमी असतील. अशाच प्रकारे उडान योजनेखालील अनेक उड्डाणे येथून झाली, तर गोमंतकीय मध्यमवर्गाच्याही आवाक्यात येथील विमानसेवा राहील. मोपसाठी ज्या नोकर्‍या सध्या जाहीर झालेल्या आहेत, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ गोव्यात कितपत उपलब्ध आहे हे अद्याप स्पष्ट नाही. या विमानतळाच्या निमित्ताने भूमीपूत्रांना रोजगार उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. विमानतळाच्या पुढील टप्प्यात मालवाहतुकीचा विचार होणार आहे. म्हणजेच गोवाच नव्हे, तर आजूबाजूच्या जिल्ह्यांतील कृषीमालापासून आपल्या औषध उद्योगापर्यंत सर्वांसाठी निर्यातीचे एक मोठे माध्यम मोपच्या रूपाने उपलब्ध होईल. मोप विमानतळ म्हणजे केवळ नवी विमानोड्डाणे एवढाच त्याचा अर्थ नाही. गोव्यासाठीही हे सर्वंकष विकासाचे, प्रगतीचे नवे उड्डाण ठरले पाहिजे. मोप गोव्यालाही मोप म्हणजे भरपूर असे काही देईल अशी अपेक्षा करूया.