>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुत्र उत्पल पर्रीकर यांनी स्वीकारला बहुमान;
>> १६ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार वितरित
देशातील बहुचर्चित पद्म पुरस्कार वितरण सोहळा काल राजधानी नवी दिल्लीत पार पडला. या सोहळ्यात १६ जणांना मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना जाहीर झालेला मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार त्यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल पर्रीकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकारला.
२०२० सालासाठी जाहीर झालेल्या देशातील मानाच्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा काल नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात ७ मान्यवरांचा ‘पद्मविभूषण’, १० मान्यवरांचा ‘पद्मभूषण’ आणि १०२ मान्यवरांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये २९ महिला आणि एका तृतीयपंथी व्यक्तीचा देखील समावेश होता. तसेच १० व्यक्ती अनिवासी भारतीय (एनआरआय), भारतीय वंशाच्या व्यक्ती (पीआयओ) आहेत.
मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रिपदाची धुरा सांभाळताना अल्पकाळात केलेल्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला होता. पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी काल हा पुरस्कार स्वीकारला. पर्रीकर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले होते. वन रँक वन पेन्शन, राफेल विमान खरेदी व्यवहार यासारखे अनेक निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाले.
मनोहर पर्रीकरांसह आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगाई आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, केशुभाई पटेल, काल्बे सादिक यांना मरणोत्तर पद्मभूषण प्रदान करण्यात आला. क्रिष्णन नायर शांताकुमार चित्रा, चंद्रशेखर कांभारा, सुमित्रा महाजन, नृपेंद्र मिश्रा, रजनीकांत देविदास श्रॉफ, तरलोचन सिंग, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस, भारतीय – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ नरिंदर सिंग कपानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, कर्नाटकचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे, भारतीय इस्लामिक विद्वान आणि कार्यकर्ते मौलाना वहिदुद्दीन खान, पुरातत्वशास्त्रज्ञ बी. बी. लाल आणि कलाकार सुदर्शन साहू यांना पद्मविभूषण पुरस्कार वितरित करण्यात आला.
अभिनेत्री कंगना रनौत, सरिता जोशी, गायक अदनान सामी, आयसीएमआरचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, माजी केंद्रीय मंत्री बिजॉय चक्रवर्ती एअर मार्शल डॉ. पद्मा बंदोपाध्याय, ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक, माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (मरणोत्तर), फादर वलिस (मरणोत्तर), प्राध्यापक चमन लाल सप्रू (मरणोत्तर) यांच्यासह १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुख्यमंत्र्यांकडून पर्रीकरांच्या कार्याला सलाम
स्व. मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत पर्रीकरांच्या कार्याला सलाम केला आहे. पर्रीकरांना प्राप्त झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी जनता आणि देशाप्रती समर्पित व दृरदृष्टिकोनातून केलेल्या कार्याची पोचपावती आहे. संरक्षण मंत्रिपदाच्या कार्यकाळात पर्रीकरांनी मोठे धाडसी निर्णय घेऊन भारताला संरक्षण क्षेत्रात मजबूती मिळवून दिली, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.