>> गोवा बुद्धिबळ
संघटनेचा निणर्य
गोवा बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारी समितीची काल प्रथमच झूम प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन बैठक घेण्यात आली. सुमारे दोन तास बैठकीस सर्व तालुका सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देेशाचे माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तिसरी ग्रँडमास्टर स्पर्धा यंदा ऑनलाइन आयोजित करून तिला स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे ऑफलाइन ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा घेण्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्याच प्रमाणे संघटनेकडून सर्व बाराही तालुक्यांसाठी ऑनलाइन लीग मालिकाही खेळविण्याचे ठरविण्यात आले. त्यातील सर्व १२ तालुक्यांतील स्पर्धांमध्ये एकत्रित कामगिरीच्या आधारे विजते घोषित करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीला संघटनेचे अध्यक्ष तथा राज्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी विशेष वेळ काढून आपल्या कार्यालयातून ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यांनी कोविड-१९च्या बिकट परिस्थितीतही खेळाडूंना कार्यरत ठेवण्यासाठी संघटनांनी ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी कोविडच्या सद्य परिस्थितीचा संदर्भही दिला आणि तालुका सदस्यांना जनतेला सुरक्षिततेचा संदेश देण्याचे आवाहन केले.