>> देशातील 35 वर्षांखालील युवक पात्र; दरवर्षी एक युवक ठरणार 5 लाखांचा मानकरी
गोवा सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नावे युवा शास्त्रज्ञ पुरस्कार योजनेची घोषणा केली असून, पात्र युवा शास्त्रज्ञाला पाच लाख रुपये पुरस्काराच्या स्वरूपात दिले जाणार आहेत.
देशातील 35 वर्षांखालील युवक या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. दरवर्षी एका युवकाला हा पुरस्कार दिला जाणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधन विषयात सदर व्यक्तीने काम केलेले असले पाहिजे, असे सूचनेत म्हटले आहे.
देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवोपक्रमातील प्रतिभेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर दरवर्षी देशातील एका युवा शास्त्रज्ञाला पुरस्कार दिला जाणार आहे. विद्यार्थी, स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स, संशोधन प्राध्यापक, शास्त्रज्ञ या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्यांचे विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधन उत्कृष्ट असले पाहिजे.
या युवा शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी कोण पात्र ठरू शकतो, याबाबत विज्ञान-तंत्रज्ञान खात्याकडून सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक युवकांना सुरुवातीला विज्ञान-तंत्रज्ञान खात्याकडे या पुरस्कारासाठी अर्ज करावा लागणार आहे. तसेच त्या अर्जासोबत स्वत:बद्दल आणि संशोधनाबद्दल 300 ते 500 शब्दांत माहिती जोडावी लागणार आहे. याशिवाय या संशोधनाचे महत्त्व काय, हे संशोधन समाजासाठी कसे पूरक ठरू शकते, त्याचा व्यावसायिक वापर यावर व्हिडिओ तयार करून तो खात्याकडे पाठवावा लागणार आहे. याबरोबरच या पुरस्कारासाठी अन्य काही निकष ठरवण्यात आले आहे. तज्ज्ञ समितीकडून या निकषांची पूर्तता करणाऱ्या देशातील एका युवकाला हा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार दिला जाणार आहे.