मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख

0
18

>> केंद्र सरकारकडून हिरवा कंदील; ३० एप्रिलला स्वीकारणार पदभार

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. ३० एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपविण्यात येणार आहे.

सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. नरवणे यांचा २८ महिन्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. नरवणे यांच्यानंतर लष्करात मनोज पांडे सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे लष्कर प्रमुख पदाची सूत्रे नरवणे यांच्याकडून पांडे यांच्याकडे जातील. पांडे लष्करामध्ये इंजिनीयर विभागात कार्यरत आहेत. इंजिनीयर विभागातून आतापर्यंत एकाही अधिकार्‍याला लष्करप्रमुख पदापर्यंत मजल मारता आलेली नाही; मात्र आता तो मान मनोज पांडेंना मिळणार आहे.

नरवणे यांच्यानंतर लष्करात तेच सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे लष्करप्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडेच सोपवली जाईल अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. डिसेंबर १९८२ मध्ये पांडे कोअर ऑफ इंजिनीयर्समध्ये रुजू झाले. त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये हायर कमांड कोर्समध्येही सहभाग घेतला आहे. त्यांनी ३९ वर्षे लष्करात सेवा दिली आहे. ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रममध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

इन्फंट्री, आर्टिलरी, आर्मर्ड, इंजिनीयर असे विविध विभाग लष्करात महत्त्वाची भूमिका बजावतात. या विभागांमधील वरिष्ठ अधिकारी पुढे लष्करप्रमुख होतात. इन्फंट्री, आर्टिलरी, आर्मर्ड विभागातील अनेक अधिकार्‍यांनी आतापर्यंत लष्करप्रमुख पद भूषवले आहे; मात्र इंजिनीयर विभागातून आतापर्यंत एकही अधिकारी लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचलेला नाही. मनोज पांडे यांया रुपात पहिल्यांदाच इंजिनीयर विभागातील अधिकारी लष्करप्रमुख होईल.

अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांची निवृत्ती अन् मनोज पांडे बनले सर्वांत ज्येष्ठ
गेल्या तीन महिन्यांत काही उच्चपदस्थ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर मनोज पांडे हे संरक्षण क्षेत्रात सर्वात ज्येष्ठ अधिकारी बनले आहेत. आर्मी ट्रेनिंग कमांडचे (एआरटीआरएसी) प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल राज शुक्ला ३१ मार्च रोजी निवृत्त झाले. अन्य काही ज्येष्ठ अधिकारी देखील जानेवारीअखेर निवृत्त झाले. त्यात लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती आणि लेफ्टनंट जनरल वायके जोशी यांचा समावेश होता.