कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही खटल्यांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. काही दिवसांपूर्वी कनिष्ठ न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर आता सिसोदिया यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना 9 मार्च 2023 रोजी ईडीकडून अटक झाली होती, तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. सिसोदिया हे प्रभावशाली आहेत. जामीन मिळाल्यास ते पुराव्याशी छेडछाड करू शकतात. तसेच ईडी आणि सीबीआयकडे सबळ पुरावे असल्याचे दिसून येत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.