मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार

0
2

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने काँग्रेस पक्षात तसेच देशाच्या राजकारणातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात 92 व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आज (दि. 28) सकाळी 11.45 वाजता त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी, काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शन आणि त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या अनेक राजकीय पक्षांचे नेते व मान्यवरांनी सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

गुरुवारी सायंकाळी घरी अचानक बेशुद्ध पडल्यानंतर मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर रात्री 9.51 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर देशभरात शोककळा पसरली होती.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काल त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी राजकीय नेत्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शनिवारी सकाळी 8 वाजता त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात नेले जाईल. त्यानंतर सकाळी 8.30 ते 9.30 दरम्यान सर्वांना मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. यानंतर सकाळी 9.30 वाजता काँग्रेस मुख्यालयातून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या कन्या शुक्रवारी रात्रीपर्यंत अमेरिकेतून दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यामुळे शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दिल्लीतील निगमबोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मृतिस्थळांवर केले जातात. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर दिल्लीतील राजघाट संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधी स्थळेही बांधली आहेत. असे असले तरी, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार आहे.
सामान्यतः माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीत होतात, परंतु त्यांचे अत्यंसंस्कार त्यांच्या गृहराज्यात देखील होऊ शकतात. त्यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि देशातील इतर मान्यवर उपस्थित असतात.

भारतात माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विशेष प्रोटोकॉल पाळला जातो. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आणि पदाचा सन्मान करणे हा त्यामागचा उद्देश आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांचे पार्थिव भारताच्या राष्ट्रध्वजात म्हणजेच तिरंग्यात गुंडाळले जाते. याशिवाय अंत्यसंस्कार करताना 21 तोफांची सलामीही दिली जाते. याशिवाय लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही अंत्यसंस्कारात सहभागी होतात.

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीत संपूर्ण देशात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. तसेच, शुक्रवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शोक ठराव मंजूर करण्यात आला.

राज्य सरकारकडूनही 7 दिवसांचा दुखवटा जाहीर
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राज्य सरकारने 26 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात येणार आहे. तसेच, सरकारी पातळीवर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

जिथे अंत्यसंस्कार होतील, तिथे स्मारक बांधा : खर्गे
मनमोहन सिंग यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या ठिकाणाबाबत पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) निर्णय घेणार आहे. त्यांच्यावर जिथे अंत्यसंस्कार होईल तिथे स्मारक बांधणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी विनंती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी व अमित शहांना एक पत्र पाठवून केली आहे. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्यात आली होती, त्या बैठकीत याविषयीचा ठराव संमत करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. खुल्या आणि उदारमतवादी अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताच्या परिवर्तनीय प्रवासात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या विकासात डॉ. सिंग यांचे अतुलनीय योगदान नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.