>> पणजीत गोवा काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे देशाच्या जलदगतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे जनक होत. त्यांनी अर्थमंत्री व नंतर पंतप्रधानपदी असताना देशात ज्या आर्थिक सुधारणा घडवून आणल्या त्यामुळेच आज देशाची अर्थव्यवस्था उच्चांकी म्हणजे पाच ट्रिलिएन डॉलरच्या दिशेने घोडदौड करू लागली असल्याचे मत काल पणजीत डॉ. मनमोहन सिंग यांच्या शोकसभेतून बोलताना काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी, भारत हा सध्या जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे आणि लवकरच तो मुसंडी मारून तिसऱ्या स्थानी येणार आहे. कालांतराने तो आणखी पुढे जात अमेरिकेलाही मागे टाकून जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहे. दिवंगत काँग्रेस नेते व दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या देशाचे अर्थमंत्री व पंतप्रधान बनले नसते तर भारत देश एवढी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून पुढे येऊ शकला नसता.
मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री बनण्यापूर्वी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. मात्र, डॉ. सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री बनल्यानंतर अर्थव्यवस्था खुली करतानाच काही क्रांतीकारी असे निर्णय घेतले व देशाची अर्थव्यवस्था बळकट बनवली, असे खलप म्हणाले.
जागतिक मंदीच्या काळात सिंग यानी देशातील राष्ट्रीयकृत बँकांना 13 लाख कोटी रु.ची मदत दिली व बुडणाऱ्या मार्गावर असलेल्या या बँकांना नवसंजीवनी दिल्याचे खलप म्हणाले. मनमोहन सिंग यांची राजवट हा खऱ्या अर्थाने देशासाठीचा सुवर्णकाळ होता, असे खलप म्हणाले.
माजी खासदार व माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, डॉ. सिंग यांनी आर्थिक धोरणे राबवतानाच वेगवेगळ्या जनकल्याणकारी योजनाही सुरू केल्या. त्यापैकी कित्येक योजना अजूनही सुरू असून या योजनांची फक्त नावे तेवढी बदलण्यात आली आहेत. देशाच्या आर्थिक विकासाची कोनशीलाच एक प्रकारे सिंग यानी बसवल्याचे ते म्हणाले.
ऑक्सफोर्ड व केंब्रिज या जगातील सर्वांत मोठ्या विद्यापीठातील पदव्या त्यांनी मिळाल्या होत्या. त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले. मात्र, त्याचा कधीही गाजावाजा केला नसल्याचे सार्दिन म्हणाले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी, मनमोहन सिंग यांनी देशाला माहिती हक्क कायदा, मनरेगा, शिक्षण हक्क कायदा यासह कित्येक लोकोपयोगी योजना दिल्या. सर्वांत जास्त मान असलेले असे ते पंतप्रधान होते, असे सांगितले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लुस फेरैरा, विजय भिके, अमरनाथ पणजीकर, प्रमोद साळगावकर, राजन घाटे आदींनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे केली.