मनभुल… श्रावणझुल…

0
229
  • पौर्णिमा केरकर

श्रावणाला रंग आहे, गंध आहे, भक्ती-प्रीतीचे अद्वैतही आहे. टाळ-मृदंगाची धून तर रोमारोमांत, सृष्टीच्या कणाकणांत भिनली आहे. हा सात्विक सोज्वळता प्रदान करणारा मास. तो धीरगंभीर तर आहेच, त्याचबरोबर बासरीच्या धुंदीत भवतालाला मंत्रमुग्धही करतो. ही धुंदी, मुग्धता मनाला अलवार झोके देते… ही श्रावणझुल गुणगुणते, झिणझिणते. शरीर-मनाला व्यापून राहते.

लीला लिम की लिंबोली पाकिजी
सावण फेर आयेगा,
दाऊजी दूर मती दीजो
माता नई बुलावेगी
हरे निम की निबौरी पकी
सावन फिर आयेगा
दाऊजी दूर मती दीजो
माता नई बुलावेगी….
आषाढ तर आताच कोठे हळूहळू सरत चालला आहे. घनदाट पाऊस तरीही कोसळतो. झाडे ओथंबून निथळून स्तब्ध उभी. पानापानांमधून टपोरे थेंब खाली ओघळतात… कुठंतरी दूर तारांवर थेंबांची नक्षी… पंख फडफवीत बसलेले पक्षी… थेंबाथेंबातून दिसणारे इंद्रधनू… कोंबांची लवलव… गडद हिरव्याला पोपटी किनार… धुक्यातून लपेटून खुणावणार्‍या हिरव्या-निळ्या डोंगरकपारी. पिवळी, हिरवी, पांढरी, लाल, गुलाबी, जांभळी रंगरंगांची रानफुले! दूर दूरपार क्षितिजाला स्पर्श करावयाला निघालेली हिरवाई… आणि अगदी मधोमध तो विशाल वटवृक्ष! याच पुराणपुरुषाच्या पारंब्यांशी झोंबाझोंबी करून कोणे एके काळी झुला-झुले झुलायचे. गावागावांत तरुणाई बेहोश होऊन झोके घ्यायची… हे असे श्रावणी झुले फक्त गोव्यातील खेडोपाडी बांधले जायचे असे नव्हे, तर ते देशाच्या इतर राज्यांतील गावागावांतूनही झुलायचे. असेच हे वरील श्रावणी गीत, मालवा गीत. हे झुलागीत परंपरेने चालत आलेले.

लग्नाचे वय झालेली ही नवयौवना वयपरत्वे आलेली आतुर आर्त लालीमा तिच्या मुखकमलावर विलसत आहे. ती धुंद आसमान कवेत घ्यायला निघालेली. क्षितिजावर तिची नजर खिळते… ती रोमांचित होते. गीतातून व्यक्त होत राहाते की बाबूजी, सभोवताली निसर्ग बघ कसा तरारून उठलाय. निंबोणीची निंबं तर आता परिपक्व होताहेत. श्रावणमासाचे आगमन आता लवकरच होणार आहे… तो तर ठरल्या वेळेत येणारच! ही सृष्टी त्याच्या स्वागतासाठी सज्ज होणार… अशावेळी तू मात्र माझे लग्न आपल्या आताच्या गावापासून दूरच्या गावात करून देऊ नकोस. तसं झालं ना तर माझी माऊली श्रावण सणात मला माहेरी बोलावणार नाही. कारण खूप लांबून मुलीला माहेरी आणणे हे तसे कठीणच आहे.

माहेरची ही ओढ प्रत्येक सासुरवाशिणीची आदिम ओढ आहे. त्याही पूर्वी ती लग्नायोग्य झाली की तिच्या मनात सासर डोकावत असतं. आकुवर मुलीने जन्माला आलेल्या घरी राहाता कामा नये. तिचं सर्वस्व तर तिच्या नवर्‍याच्या, मुलाच्या, एकूणच तिला जेथे लग्न करून दिलेली असते त्याच ठिकाणी गुंतायला हवे. मग ते सासर द्वाड असले… त्याच्या वळचणीचा वासा सासुरवाशिणीला ठसाठसा लागला तरी हरकत नसते. श्रावणाची असीम ओढ तर तिची चिरंतन अशीच. त्या ओढीला बालपण आठवते तसेच तारुण्यही सातत्याने खुणावत राहते. श्रावणझुला तर तिच्या तारुण्य सुलभ भावस्पंदनांचा मनझुला. यावर हिंदोळे घेत घेत तिची स्वप्ने मेंदीच्या पानांतून तळहातावर रंग भरतात… ‘मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते गं’ ही तरलता शरीर मनावर मोरपिशी शहारा उमटवते.

श्रावण तर तिचे नव्या नवलाईचे सारे हट्टं सारे लाड पुरवितो. आषाढ सरताना त्याने श्रावणासाठी त्याच्या सुखकर आगमनाची तयारी करून ठेवलेली असतेच. त्याची घनघोर बरसात झाडांनी तर नखशिखांत सामावून घेतलेली असते. ती तृप्ती, त्यातून आलेली परिपुष्टी तृणपात्यांतून तरारलेली दिसून येते. झाडावर घरासमोर अंगणात, व्हरांड्यावरील लाकडी पाट्याना दोरखंड आणि लाकडी पाट एवढ्या सामग्रीनिशी झोपाळा बांधला जायचा. लहानपणी तर ती गरजच होती. गावागावांचे हे चित्र. गोव्यात तर याच झुल्याना ‘आटो’ असे म्हटले जायचे. हे आटो लहान मुलांसाठी, भावंडांना खेळविण्यासाठी, गाणी म्हणण्यासाठीच होते. घरची मोठी माणसे कुमेरी शेती करण्यासाठी डोंगरावर गेलेली. ती परत खूप दिवसांनी येणारी… काहीजण पावसाळी शेतीत गुंतलेले. अशावेळी लहानग्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या बहिणीची असायची. ती जबाबदारी मात्र ही वयात आलेली मुलगी आत्मीयतेने पार पाडायची. तिच्या सोबतीला त्यावेळी धावून यायची ती अशीच परंपरेने प्रवाहित झालेली गीते. ती आटोवर म्हणजेच झुल्यावर बसून झोके घेत बाळाला झोके देत देत म्हटली जायची म्हणून ती आट्यावयली गीता! शब्दांना आंतरिक लय होती, नादमयताही होती… अर्थाची संगती लागत नसली तरी आपलेपणा ओतप्रोत भरलेला होता.
आराड गे माणके
सान जावनी सान जावनी
आमची आई
घरा येवनी… घरा येवनी
बेडूक ओरडायला लागले की तिन्हीसांजेची चाहूल लागते. ती खूण असते कामाला गेलेले आपले आईवडील परत घरी येण्याची. त्यांच्या येण्यात लहानग्यांचा मोठा आनंद सामावलेला असतो. ही आट्यावरील गीते सगळ्याच नात्यांना सामावून घेतात. त्यात मामा अग्रणी असतो.

ढवळ्या-पवळ्या बैलांची जोडीही असते. आईने कडेकुशीला लावलेले दोडक्या-पडवळाचे वेल असतात. नागोबा सर्वांचा लाडका, गणोबाही. सगळीच झुल्यावरून मस्त झुलत झुलत श्रावणसख्याच्या आगमनाची तयारी करतात. श्रावण सर्वांच्या आवडीचा जिवाभावाचा!
गारेगार गारवा देणारा हा महिना सण-उत्सवांची मांदियाळी घेऊन येतो. सृष्टीचा हा पाचवा महिना… चेहर्‍यावर तजेला, चैतन्य पसरविणारा. लहानपणी तो अल्लड हासरा-नाचरा श्रावण भरभरून निरागस आनंद पुरवितो… तारुण्यात त्याची धुंदी ती काय वर्णन करावी! या वयात तर गुलाबी स्वप्नांचे झुलेच अवतीभवती बांधलेले असतात. त्यावरचे झोके स्वैर विहारात गढून जातात. नवपरिणीत विवाहिता तर सासर-माहेरच्या ओढीने आरक्त झालेली. तिच्या लग्नानंतरच्या पहिल्याच श्रावणी सणासाठी ती माहेरी आलेली असते. नाही म्हटलं तरी प्रत्येक क्षणी तिला पतीची आठवण सतावत असते. ती हुरहूर सर्वांगाला व्यापून राहते. इकडे तिच्या सासरहून तिला न्यायला तिचा दीर-सासरा येतो. पण तिला त्यांच्याबरोबर सासरी जायचे नसतेच. परंतु न्यायला आलेल्यांना परतवून लावणार तरी कसे? त्यावेळी तर ती चक्क आपले डोके दुखत आहे असेच सांगून त्यांना माघारी जायला लावते. एरव्ही या मालनी सासरची माणसे काय सांगतात ते निमूटपणे ऐकणारी. असे असतानाही ही नवविवाहिता पतिसहवासासाठी आतुरलेली… म्हणून ती हे धाडस करते… मालवा लोकगीतामधून तिची मनस्पंदने जाणवतात. श्रावणात म्हणण्यात येणारे हे झुलागीत स्वप्नील गुलाबी गारवा प्रदान करते. श्रावण आणि झुला यांचे अनुबंध तर हे गीत जतन करतेच, शिवाय सासुरवाशिणीची नवी नवलाई, हुरहुर, घालमेल, आरक्त असोशीही आविष्कृत होते.

माता आपल्या मुलीला जी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेली असते, ती सांगते की तुझ्या सासरची माणसे तुला न्यायला आली आहेत. त्यात सासरा, सासू, जेठजी वगैरे असतात. ती म्हणते-
ससुराजी लिवाने आये है
माता मेरा तो माथा दुख राहा है
जेठजी लिवाने आये है
माता मेरा तो माथा दुख रहा है
पियुजी आणे आविया
घर जा रे बेटी
माता म्हारो माथा हो गुथो
पाटी पडाव
पियुजी आणे आविया
एकूणच नवरा न्यायला आला आहे हे ऐकूनच तिचं डोकं दुखायचं थांबतं. ती मातेला माथाभर फुले माळायला सांगून झुला नसतानाही मनझुल्यावर हिंदोळे घेते… श्रावणमासाची हीच तर नजाकत आहे. नव्या नावलाईचे दिवस संपले तरीही सासुरवाशिणीला तो व्रत-वैकल्यांतून दिलासा देतो.

आषाढ सोपलो मामजी, शिरवाण लागलो,
मिया तरी आयतार धरीतूय.
तेल ना गे सुने तूप…
तिया तरी कैसलो आयतार धरीतूय?
तेल म्हूणान मिया पानी सा घालीतूय,
मामजी मिया आयतार धरीतूय
असे म्हणून ती घरच्यांनी विरोध केला तरीही व्रत करते. श्रावणाला रंग आहे, गंध आहे, भक्ती-प्रीतीचे अद्वैतही आहे. टाळ-मृदंगाची धून तर रोमारोमांत, सृष्टीच्या कणाकणांत भिनली आहे. हा तत्त्वचिंतक विचारवंत, सात्विक सोज्वळता प्रदान करणारा मास. तो धीरगंभीर तर आहेच, त्याचबरोबर बासरीच्या धुंदीत भवतालाला मंत्रमुग्धही करतो. ही धुंदी, मुग्धता मनाला अलवार झोके देते… ही श्रावणझुल गुणगुणते, झिणझिणते. शरीर-मनाला व्यापून राहते. मनभुल श्रावणझुल…!