मनभावन शांतिनिकेतन

0
7
  • गिरिजा मुरगोडी

अनेकानेक महान व्यक्तींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आणि वास्तव्याने मोहरलेला परिसर पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो. त्या परिसरातल्या वृक्षवल्ली, फुलं, पानं, पाखरं, हिरवाईने वेढलेल्या कलात्मक इमारती, आणि साक्षात रवींद्रनाथांनी साकारलेली वेगवेगळी अतिशय हृद्य अशी निवासस्थानं होती…

कधीकधी आपल्याला एखाद्या गोष्टीची ओढ लागून राहिलेली असते. एखाद्या माणसाची, एखाद्या वस्तूची, एखाद्या घटनेची, तर कधी एखाद्या स्थळाची! अशीच मनाला अनेक वर्षांपासून आस लागली होती शांतिनिकेतनला भेट देण्याची.
शाळेत असताना जेव्हा अशा शाळेबद्दल समजलं होतं तेव्हा तर त्याचं फार अप्रूप वाटलं होतं. अशा शाळेत रोजचं जीवनच आनंदाचं गाणं होत असेल असं वाटून गेलं.
बिन भिंतींची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे वेली पशु पाखरे
यांशी गोष्टी करू….
या ग.दि.मां.च्या ओळी मनात झिम्मा खेळू लागत. पुढे ही संस्था म्हणजे यापेक्षा अधिक खूप काही आहे हे समजत गेलं. जेव्हा जेव्हा शांतिनिकेतनबद्दल काही ऐकलं, वाचलं, त्या-त्या प्रत्येक वेळी भारावल्या मनात ती भेटीची आस पुन्हा जागी व्हायची. मनासमोर त्या परिसराचं एक कल्पनाचित्र साकार व्हायचं आणि त्या उत्कट प्रतिमेचा, त्या प्रतिभाविष्काराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अधिक ओढ लागायची.

मनात कितीही असलं तरी प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो हे तर खरंच; पण खूप मनात असलं की ती इच्छाशक्ती तो योग जुळवून आणत असावी असंही वाटतं. त्याप्रमाणे, खूप वर्षांनी तो योग जुळून आला. आम्ही काही मैत्रिणींनी कोलकाता, शांतिनिकेतन आणि सिक्कीम येथे जाण्याचे नियोजन केले आणि निघालो. हा योग जुळून आला आणि जे पाहिले, अनुभवले त्यामुळे शांतिनिकेतनने मनात घर केले. म्हणूनच या लेखमालेची सुरुवात त्या अनुभवापासूनच करावी असे वाटले.
कोलकात्याला पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शांतिनिकेतनला जाण्यासाठी निघालो. ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस…’ असं या चिरप्रतीक्षित क्षणी मन गुणगुणत होतं. शांतिनिकेतनकडे जाणारा सुंदर रस्ता मोहवत होता. दुतर्फा हिरवीगार झाडं… प्रसन्न, उत्फुल्ल, मोकळं स्वागत करणारी… मन त्या वाटेवर मुक्त सोडूनच द्यावं अशी…
एका उत्तुंग सर्जनशील व्यक्तिमत्त्वाने साकारलेली कलात्मक स्वप्ननगरी पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो, अनेकानेक महान व्यक्तींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आणि वास्तव्याने मोहरलेला परिसर पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो. त्या परिसरातल्या वृक्षवल्ली, फुलं, पानं, पाखरं, हिरवाईने वेढलेल्या कलात्मक इमारती, आणि साक्षात रवींद्रनाथांनी साकारलेली वेगवेगळी अतिशय हृद्य अशी निवासस्थानं… सारं प्रत्यक्ष सामोरं येणार होतं.

शांतिनिकेतनच्या त्या मनभावन परिसरात प्रवेश केल्यानंतर प्रथम भेटलं ते ‘उत्तरायण.’ या आवारात रवींद्रनाथांची उदयन, कोणार्क, श्यामली, पुनश्च, उदिची आणि चित्रभानू ही अतिशय हृद्य घरं जतन केलेली आहेत. प्रत्येक घर वेगळं, अनोखं! त्या-त्या घराची नावंसुद्धा मनात वेगळे तरंग निर्माण करणारी. प्रत्येक घर आत्मीय, उबदार आपलेपण लेवून स्वागत करणारं. आत बोलवणाऱ्या पायऱ्या, दर्शनी दरवाजा, छोट्या छोट्या सुबक खोल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण खिडक्या जणू बाहू पसरून स्वागत करत होत्या. एक वेगळी संवेदना जागवणाऱ्या त्या वस्तू. इथे किती विद्वज्जन, किती आप्त, सुहृद वावरले असतील… किती प्रकारच्या सृजनखुणा तिथे शिवसुंदराचं रूप होऊन लहरत असतील…
या प्रत्येक घराशी त्यांचे खास असे नाते होते. स्वतः लावलेल्या, जोपासलेल्या झाडापेडांनी वेढलेली ही घरं त्यांच्या सर्जनशील वृत्तीसाठी प्रेरक आणि पूरक अशी साकारलेली होती. त्यांच्या निर्मितीचा, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीचा अविभाज्य घटक होती.
उदयनचा प्रशस्त व्हरांडा, नक्षीदार खांब, सुंदर खिडक्या त्यांच्या कलासक्त मनाला साद घालत. त्या व्हरांड्यात वा खिडकीत बसून बाहेरचा निसर्ग न्याहाळताना मनात अनेक चित्रं साकार होत. कोणार्कमध्ये राहत असताना समोरचं क्षितिज न्याहाळत मनातल्या कल्पना, विचार, भावनांना शब्दरूप देणं त्यांना फार आवडत असे. गच्चीवर बसून आकाश न्याहाळणे खूप आनंद देत असे.

या उत्तरायणने सर्वपल्ली राधाकृष्णन, शरच्चंद्र चॅटर्जी, सुभाषचंद्र बोस, या आणि अशा अनेक थोरामोठ्यांचे स्वागत केले. त्यांचे वास्तव्य, विचार-कल्पनांचे आदान-प्रदान, चर्चा-संवाद हे सर्व अनुभवले.
‘उत्तरायण’मधल्या घरांपैकी ‘श्यामली’ हे रवींद्रनाथांच्या मनाच्या खूप जवळ असणारे विशेष प्रिय घर. हे मातीचे सुंदर घर साकारताना त्यांचे मनही एक आनंदाचे घर बनून गेले होते. मातीचे छप्पर, मातीच्याच भिंती आणि भिंतीवर मातीची चित्रे. त्या मृण्मय घराचं त्यांना फार अप्रूप होते. याच घरात रवींद्रनाथांनी महात्मा गांधींना प्रेमाने, मानाने काही काळ वास्तव्यासाठी बोलावून घेतले होते. या महान व्यक्तींच्या वावराने पुनीत झालेल्या त्या घरासमोर काही क्षण स्तब्ध उभे राहताना मनात वेगळेच भाव दाटून आले.

शांतिनिकेतनमध्ये ध्यानमंदिर, कल्पक कलाभवन, सुरेख संगीतभवन, वेगवेगळी कुटिरं, अनेक कलाकृती, जिथे पदवीदान सोहळा साजरा होतो ती खुली जागा, मनोवेधक बाइशे श्रावण साजरा होतो ते पटांगण, झाडांखाली प्रशस्त पारावर निसर्गसान्निध्यात जिथे आनंददायी शिक्षण किलबिलणाऱ्या बालगोपालांना दिले जाते त्या जागा… हे सर्व पाहताना, त्याबद्दल समजून घेताना मन अचंबित आणि आनंदित होत राहिले.

शांतिनिकेतनमध्ये ‘विचित्र’ नावाच्या संग्रहालयामध्ये टागोरांच्या वस्तूंचे जतन केलेले आहे. पाठभवनामध्ये वेगवेगळ्या भाषांचा, साहित्य-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळी भवनं आहेत. ‘विश्वभारती’ची संकल्पना आणि या विद्यालयाची उद्दिष्टं म्हणजे आदर्श शिक्षणाचं प्रात्यक्षिक आहे. एका संवेदनशील द्रष्ट्या माणसाची स्वप्नपूर्ती आहे. शांतिनिकेतनच्या परिसरात आम्ही मनमुक्त फिरलो, रमलो, मुग्ध करणारं खूप काही अनुभवलं, पाहिलं आणि खूप काही पाहायचं राहूनही गेलं. तिथून पाय निघेना म्हणून एक दिवस मुक्कामही वाढवला. पण इतक्या थोड्या वेळात खरंतर या स्वप्नग्रामाचं ओझरतंच दर्शन घेऊ शकलो. ‘शांतिनिकेतन’ म्हणजे अल्पावधीतच नव्हे तर दीर्घावधीतही अनुभवून पूर्ण होऊ न शकणारी अनोखी दुनिया आहे. पु. ल. देशपांडेंनी शांतिनिकेतनमधील अनेक दिवसांच्या वास्तव्याचा विस्तृत संवेदनशील आढावा ‘मुक्काम शांतिनिकेतन’मध्ये घेतला आहे. आपले गोमंतकीय लेखक सचिन कांदोळकर यांनी या स्वप्नसुंदर दुनियेचं सुरेख वर्णन ‘गोड बंगाल’ या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते वाचताना वाटतं फारच ओझरतं अनुभवलं आपण. पण तरीही एक समाधान लाभलं हेही खरंच. असे स्मरणीय आणि हृद्य अनुभव खरंच आपल्या मनाला वेगळं समाधान देत असतात, ऊर्जा पुरवत असतात. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाच्या खुणा पाहायला मिळणं, त्या परिसरात काही क्षण वावरायला मिळणं हेही मोठं भाग्यच असतं. ते समाधान, एक अनोखी तृप्ती आणि एक अनामिक हुरहुर सोबत घेेऊन त्या काव्यनगरीहून परतलो. ते सारं मनात मात्र रेंगाळत राहिलं.