>> स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात इलेक्ट्रिक बसगाड्या
स्मार्ट सिटी पणजीअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बसस्टॉप स्मार्ट हायटेक बनविण्यात येणार आहेत. प्रवाशांना बसस्टॉपवर बसगाड्यांचे वेळापत्रकासह बस तिकीट उपलब्ध होणार आहे.
कदंब महामंडळाकडून स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. तर, पणजी परिसरामध्ये सध्या कार्यरत असलेल्या जुन्या खासगी प्रवासी बसगाड्या अन्यत्र वळविण्यात येणार आहेत.
स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट बसस्टॉप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बसस्टॉप स्मार्ट बनविण्यात येणार आहेत. जुने बसस्टॉप हटवून त्या जागी नवीन स्मार्ट बसस्टॉपची व्यवस्था केली जात आहे. कला अकादमीजवळील एका बसस्टॉप स्मार्ट बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बसस्टॉपवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
बसस्टॉपमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत प्रवासी बस वाहतुकीची माहिती देणारा फलक उपलब्ध करण्यात येत आहे. प्रवासी बसगाड्यांचे वेळापत्रक पाहण्यासाठी खास स्क्रीन बसविण्यात येणार आहे. प्रवाशाने बसस्टॉपवर उपलब्ध यंत्रणेच्या माध्यमातून बसगाडीचे तिकिटाचे बुकिंग करून शुल्क भरल्यानंतर तिकिटाची पावती मिळणार आहे. आगामी काळात पणजी परिसरात कदंबाच्या इलेक्ट्रिक बसगाड्या विनावाहक चालविण्यात येणार आहेत. ही व्यवस्था अजूनपर्यंत कार्यान्वित करण्यात आलेली नाही.