पणजी महापालिकेच्या कामगारांनी महापौर व सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दि. २४ रोजी संप मागे घेतला तरी महापौरांना शह देण्यासाठी आयुक्त व भाजप नगरसेवकांनी आवश्यक सहकार्य न दिल्याने, महापौर व आयुक्त यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. मात्र, महापालिकेतील भाजप नगरसेवक आयुक्तांच्या बाजूने आहेत.कामगारांनी कचरा गोळा करून तयार ठेवला आहे. परंतु तो उचलण्यासाठी आयुक्तांनी ट्रक उपलब्ध न केल्याचे कामगार नेते अजित सिंग राणे यांनी काल पत्रकारांना सांगितले.या प्रश्नावर कामगारांनी महापालिका क्षेत्रातील व्यापार्यांची भेट घेऊन तसेच घरोनघर जाऊन गैरसोय पटवून देण्याचे ठरविले आहे. कचर्याच्या प्रश्नावर केलेल्या या राजकारणामुळे नववर्षाच्या काळात महापालिका क्षेत्रात कचर्याचे ढीग पडून राहण्याची शक्यता आहे. काल सकाळी महापौरांनी कचर्याच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत महापालिकेतील भाजप नगरसेवक महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्यावर तुटून पडले. त्यामुळे घाईगडबडीत कामगारांनी संप मागे घेतल्यासंबंधिचा ठराव फुर्तादो यांनी संमत करून घेतला. महापौर फुर्तादो जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे.